छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : भारतीय रेल्वेने देशातील सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी बहुतांश ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग सुरू केले खरे, परंतु चुकीच्या ‘डिझाईन’मुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी इतर वेळी मलनिस्सारण वाहिनीचे पाणी या मार्गावर साचत असल्याने नागरिकांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.
औरंगाबाद रेल्वे अभियंता कार्यालयांतर्गत करमाड ते अंकाईपर्यंतचा भाग येतो. या भागात अनेक ठिकाणी मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग सुरू शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग तयार करण्यात आले. यासाठी ७८ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला होता. यात करमाड आणि शेंद्रा भागातील भुयारी मार्गाचा समावेश आहे. याशिवाय रेल्वे स्टेशनहून मनमाडकडे जाताना रेल्वे गेट ५१च्या पुढील रेल्वे क्रॉसिंगही बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे.
औरंगाबाद मार्गावरील रेल्वे वाहतूकीची गती वाढविण्यासाठी रेल्वे रुळाखाली वाहनांना जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले. त्यानुसार सटाना, शेंद्रा, करमाड, टाकळी शिंपी, चिकलठाणा (झाल्टा शिवार) कुंभेफळ, संग्रामनगर, मिटमिटा, लासूर नदीजवळील रेल्वे क्रॉसिंग, दौलताबाद ते पोटूळ दरम्यानचे रेल्वे क्रॉसिंग यासह रोटेगाव रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आले. यापैकी काही ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल तर बऱ्याच ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यात आले आहेत. हे अंडरपास चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या निचरा होत नाही. हे पाणी भुयारी मार्गाच्या मधोमध साचत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील लोकांना रेल्वे भुयारी मार्गातून जाणे कठीण झाले आहे. राज्यात इतरत्रही असेच चित्र उद्भवले असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
ज्या ठिकाणी रेल्वेमार्गावर भुयारी मार्गाचे (अंडर पास) बांधकाम केले आहे. त्याठिकाणी रेल्वे रुळ ओलांडून रस्ते कायमचे बंद केले आहेत. पण या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने हे भुयारी मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. तिसगाव-मिटमिटा या मार्गावर बांधण्यात आलेल्या अंडरपासमध्ये बारमाही पाणी साचल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात दरवर्षीच अशी स्थिती उद्भवत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वेने भुयारी मार्गातील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, असेही ते म्हणाले.
यासंदर्भात साऊथ सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कार्यालयाकडे विचारणा केली असता कमी जोराचा पाऊस अथवा अतिवृष्टीमुळे पाणी साचले असेल, अथवा कुणी ड्रेनेजचे पाईप सोडले असतील तर आमच्याकडून पाणी काढण्याची व्यवस्था केली जाते. गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू पुलाच्या खाली राहत असल्याने पाणी तेथे साचते, असेही त्यांनी स्पष्ट केले.साचलेले पाणी काढण्यासाठी गँगमन तैनात करण्यात आलेले असतात. पम्प लावून पाणी काढण्यात येते. ही मोहीम सातत्याने सुरू असते, असा दावा तेथील अधिकाऱ्यांनी केला आहे. मग इकडे अशी मोहीम का राबवली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.