Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेच्या पैशाची उधळपट्टी

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : वीजेच्या तुटवड्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भारनियमन (Load Shedding) करावे लागते असून, त्याचा फटका औरंगाबाद शहरालाही बसला आहे. वीजेची वाढती मागणी आणि निर्मितीमध्ये तूट यामुळे अनेक ठिकाणी दोन दोन तास वीज गायब होताना दिसते आहे. अशा परिस्थितीतही औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector Office Aurangabad) खणीकर्म विभागात मात्र वीजेची उधळपट्टी सुरू असल्याचे पाहणीत दिसून आले. सरकारी कार्यालयांतील वीजेच्या उधळपट्टीला संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईची मागणी होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील खणीकर्म विभागात एकही कर्मचारी आणि अधिकारी जागेवर नसतानाही पंखे, वीजेचे दिवे चालू असल्याचे पाहणीत दिसून आले. वीजेचा तुटवडा निर्माण झाल्याचे ऊर्जामंत्री सांगत असतानाच सरकारी कार्यालयातच गरज नसतानाही वीजेचा वापर सुरू असल्याचे दिसते आहे.

सरकारी कार्यालये जनतेच्या खिशातून कर रुपाने मिळणाऱ्या पैशावर चालतात. गरज नसतानाही कार्यालयातील पंखे, वीजेचे दिवे सुरू ठेवून संबंधित अधिकारी, कर्मचारी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत. त्यामुळे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडे केली आहे.