Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद बसस्थानकाला खड्ड्यातून बाहेर काढणारा आहे का कोण?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : येथील मध्यवर्ती बस स्थानकाला खड्ड्यांनी विळखा घातला आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने बसचालकांसह प्रवाशांचेही हाल होत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने स्मार्ट बसस्थानकाचा तिढा मिटेल तेव्हा मिटेल निदान त्वरित खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे कोणी मायका लाल आहे का या औरंगाबाद बसस्थानकाला खड्ड्यातून बाहेर काढणारा? असा प्रश्न देखील प्रवाशी उपस्थित करत आहेत.

पर्यटनाची राजधानी, मराठवाड्याची राजधानी, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्या हबपाठोपाठ आता शिक्षणाची आळंदी होत असलेल्या औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात चाैफेर खड्डेच खड्डे पडले आहेत. हे खड्डे बोटावर मोजण्याइतके नसून, प्रत्येक फुटांवर खड्डेच खड्डे पडल्याने दयनीय परिस्थिती आहे.

वर्षानुवर्षे खड्ड्यांची समस्या कायम

दरवर्षी पावसाळ्याच्या आधी डांबरीकरण अथवा मुरुम टाकून खड्डे बुजविणे अपेक्षित आहे. परंतु, दरवर्षी खड्ड्यांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला की, या बसस्थानकाची आज नाही तर उद्या इमारत पाडून नव्या बसस्थानकाची निर्मिती होणारच आहे. त्यामुळे आता मुख्यालयाने देखभाल दुरूस्तीसाठी निधी देण्याचे बंद केले आहे, असे म्हणत विभाग नियंत्रक आणि विभागीय अभियंता बसस्थानकातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहेत.

अतिवृष्टी नंतरही काणाडोळा

परंतु, गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने बसस्थानकाच्या जुन्या इमारतीसह रस्त्यांना मोठ्या प्रमाणात छती पोहोचली. असे असताना दुसऱ्या पावसाळ्याच्या आधी डांबरीकरण करणे किंवा तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून खड्डे बुजविणे आवश्यक होते. परंतु, एसटी महामंडळाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

सरकारचा आदेश खड्ड्यात

विशेषत: पावसाळ्याच्या आधी रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याच्या सूचना सरकारने सर्व विभागांना दिल्या होत्या. विशेष म्हणजे एसटी महामंडळाचा स्वतंत्र बांधकाम विभाग असताना देखील बस स्थानकात आजही खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे बसचालकांना बस चालविणे अडचणीचे ठरत आहे. तसेच प्रवाशांना पायी चालणे देखील त्रासदायक झाले आहे. बसची चाके खड्ड्यात गेल्यावर साचलले पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते आणि त्यांचे कपडे खराब होतात. लहान बालके खड्ड्यांमध्ये पडतात. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.