Road Tendernama
मराठवाडा

Paithan : दीड कोटींच्या नव्या रस्त्यावर उगवले गवत; अधिकाऱ्यांनी दिली 'ही' कारणे

टेंडरनामा ब्युरो

पैठण (Paithan) : येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात भर पावसाळ्यात दीड कोटीचा डांबरी रस्ता दोन महिन्यांपूर्वी तयार केला. मात्र त्यावर झाडे उगवल्याने सदर काम निकृष्ट असल्याने याकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या एका नेत्याने केली आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने ठेकेदार संजय भंडारी व उपअभियंता दिपक डोंगरे यांच्याशी संपर्क केला असता उद्यानात वाहतूक नसल्याने झाडावरून बी पडली की झाडे उगवली असतील, जर रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ सुरू असली की टायराने बिया दबल्या जातात, रानटी झाडीझुडपी उगवत नाहीत, यासाठी ठेकेदार व अधिकाऱ्यांनी घरे आणि पुलांच्या कठड्यांची उदाहरणे दिली. तिथेही झाडी उगवतात, वाहतुकीची वर्दळ नसलेल्या सिमेंट रस्त्यावर देखील असे प्रकार होतात, अशी कारणे त्यांनी पुढे केली आहेत. मात्र, सदर रस्त्याच्या कामाची थर्ट पार्टी तपासणी करून दोषींवर कारवाई करावी व अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याचे नव्याने काम करून घ्यावे, अशी मागणी संबंधित नेत्याने केली आहे.  मात्र रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणेच झाले आहे, आम्ही कोणत्याही चौकशी समितीसमोर जायला तयार असल्याचे डोंगरे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

संत एकनाथांच्या भूमीत माथा टेकवण्यासाठी आलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना नाथसागर (जायकवाडी धरण) व संत ज्ञानेश्वर उद्यान नेहमीच आकर्षण ठरले आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून उद्यान बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून जलसंपदा विभागाचा महसूलही बुडत आहे. गेल्या काही वर्षात कायम "कधी खुले तर कधी बंद" अशी अवस्था या उद्यानाची झालेली आहे. अनेक वर्षांपासून संगीत कारंजेही बंद करण्यात आल्याने या उद्यानाकडे पर्यटक येणे बंद झाले आहे. पैठण येथे नाथसागर जलाशयाच्या पायथ्याशी बांधण्यात आलेले संत ज्ञानेश्वर उद्यान हे पर्यटकांसाठी कायम आकर्षण राहिले आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता व जायकवाडी प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांनी बर्याच वेळेला उद्यानाच्या स्थितीची पाहणी केली. मात्र अनेकदा पाहणी करूनही निधी अभावी उद्यानाचा विकास होऊ शकत नसल्याने या उद्यानाची मरणासन्न स्थिती बदलू शकत नाही. परिणामी उद्यान खुले करण्यात आले नाही.

म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर गेल्या ४५ वर्षांपूर्वी या उद्यानाची मांडणी करण्यात आली होती. याशिवाय त्याच धर्तीवर संगीतावर आधारित कार्यक्रमही ठेवण्यात येत असत.  परंतु गेल्या सात-आठ वर्षांपासून उद्यानाला प्रशासकीय वाळवी लागली आणि त्यातील सारेच काही होत्याचे नव्हते होत उद्यानच बंद करत नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. उद्यानाची जबाबदारी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जलसंपदा विभागातील जायकवाडी प्रकल्पाकडे देण्यात आली आहे. सध्या हा विभागच कारभार पाहत आहे. नाथसागरामुळे पर्यटनाच्या नकाशावर आलेल्या पैठणमधील हे उद्यान देश-विदेशातून अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत नसल्याने शासनाने २००३ मध्ये उद्यानाचे खासगीकरण केले. राम सातव यांच्या ग्लास फायबर इंडस्ट्रीजला (मोशी, पुणे) ११ वर्षांच्या करारावर उद्यान चालविण्यास देण्यात आले. हा करार पूर्ण होण्याआधीच महसूल विभागाने करमणूक कराचा मुद्दा काढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यानालाच सील ठोकले. परिणामी, उद्यान एक वर्ष बंद राहिले. यानंतर ग्लास फायबर इंडस्ट्रीजचा करार रद्द ठरवून उद्यानाचा ताबा पाटबंधारे विभागाच्या गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाकडे देण्यात आला. कधी बंद तर कधी चालू अशा पद्धतीने हे उद्यान चालू राहिले हे उद्यान पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरू राहावे यासाठी जायकवाडी प्रकल्प मंडळाकडून लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले, पण त्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. संगीत कारंजेही बंद झाल्याने उद्यानात पर्यटकांचे येणे एकदमच कमी झाल्याने आता उद्यानाचे द्वार कायम बंद असते.

या मरणासन्न उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्यस्तरिय अनेक बैठका झाल्या. मुंबईतील फुट्रींक्स  या जागतीक स्तरावरच्या सल्लागाराची उद्यानाच्या सविस्तर प्रकल्प विकास आराखड्यासाठी नियुक्ति करण्यात आली. शेवटी उद्यानाच्या विकासासाठी पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (पाटील) यांनी दहा कोटीचा निधी मंजूर करून आणला. यातील साडेतीन कोटीतून उद्यानातील रस्ते, पार्किंग , कार्यालयीन इमारत व नवीन संगीत कारंज्यासह लहाण मुलांसाठी खेळण्या , विद्युत उपकरणांची दुरूस्ती व सीसीटीव्ही कॅमेरे व इतर कामांचा १९ मे २०२३ रोजी भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता. परंतु  गत गुरूवारी राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी नागरिकांसह उद्यानात दहा कोटी खर्च करून होत असलेल्या विकास कामांची पाहणी केली. दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच तयार केलेल्या डांबरी रस्त्यावर झाडे उगवल्याचा आरोप करत त्यांनी सदर निकृष्ट कामाची थर्ड पार्टी तपासणी करून दोषींवर कारवाई व्हावी,   अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याचे दर्जेदार काम व्हावे , अशा मागण्या केल्या. यासोबतच ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना अंदाजपत्रकाप्रमाणे न करता अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच डांबराचा पातळ थर टाकून रस्त्या सारवल्यासारखे डांबर शिंपडले , रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे, हाताने डांबरीकरण उखडले जात आहे, काही ठिकाणी डांबर वाहून गेल्याचा आरोप देखील गोर्डे यांनी केला आहे.

हे आहेत जबाबदार

उद्यानाच्या विकासासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून मिळालेल्या दहा कोटीच्या निधीतून थातूरमातूर कामे केली जात आहेत. जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर (उत्तर) चे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप अभियंता दिपक डोंगरे व शाखा अभियंता तुषार विसपुते यांच्या निगराणीत सुरू असलेल्या या कामात त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप गोर्डे यांनी केला आहे. 

ठेकेदार म्हणतात ट्राॅफीक नाही...

रस्त्याच्या शोल्डरमध्ये झाडी उगवली आहेत. रस्त्यावर नाही. रस्त्यावर वाहतूक नाही, उद्यानातील झाडांच्या बिया पडल्याने झाडे उगवली आहेत. आपण बांधलेल्या घरांवर आणि पुलाच्या कठड्यांवर देखील झाडी उगवतात. वाहतूक सुरू असली की टायरने बीया दबल्या जातात. रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसारच केलेले आहे. याकामात दीड किलोमीटरच्या रोडसह एक मोठा पुल व सहा ठिकाणी इतर अंडरग्राऊंन्ड सुविधांसाठी पाईप टाकून पुल तयार करण्यात आले आहेत. याशिवाय मुख्य प्रवेशद्वारापासून दीड किमी रस्त्यासह स्वच्छतागृहाकडे व नर्सरीकडे जाणारे दोन रस्त्यांची देखील कामे केली. अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा ०.७ इतक्या कमी टक्के दराने मी टेंडर स्विकारले होते. काम अंदाजपत्रकातील नमुद असलेल्ये  ॲटमनुसारच केले आहे. तक्रारीत काहीही तथ्य नाही. अद्याप कामाचा डीएलपी (देखभाल दुरूस्ती कालावधी ) संपला नाही. नव्याने काम मलाच निःशुल्क करायचे आहे. कूठलाही ठेकेदार काम निकृष्ट करत नाही. आजकाल स्पर्धा वाढल्याने काळजीपूर्वकच कामे केली जातात. निकृष्ट कामे केली , तर पुन्हा काम मिळेल काय ? आधी पदरातला पैसा खर्च करून कामे करावी लागतात. नंतर निधी मिळतो. मग निकृष्ट कामे केल्यावर निधी देणार कोण ? या सगळ्या प्रश्नांचा विचार करताना कामे चांगलीच करावी लागतात.

अधिकारी म्हणतात चौकशीला आमची हरकत नाही

रस्त्यावर वाहतूक नाही. डांबरी रस्त्यात नव्हे, शोल्डरमध्ये  झाडी उगवली  आहेत. काम अंदाजपत्रकानुसारच झाले आहे. याकामाचे सर्व तपासणी अहवाल योग्य आहेत. याकामाची चौकशी झाली तरी आमची काहीच हरकत नाही. अगोदरचा डांबरी रस्ता होता. आधीचा सब बेस तयार असल्याने व फाऊंडेशन चांगले असल्याने त्यावर ७५ , ८० व ४० एमएमची जाड बारीक खडी अंधरली. त्यावर बीटूमिन्सचा ॲटम घेतला. अर्थात मानकाप्रमाणे खडीकरण व डांबरीकरण केलेले आहे. २२ नोव्हेंबर २०२२ ला पर्यटन विभागाकडून दहा कोटी मिळाले.त्यात रोड पार्किंग , तिकीट घर , दारा खिडक्या, स्वच्छतागृहे, खराब टाईल्स, रंगकाम, सीसीटीव्ही कॅमरे ही सगळे कामांचे अंदाजपत्रक इतक्या कमी निधीत कसे होणार. पाईपलाईनचे टेंडर एक कोटी ८३ लाखाचे काढत आहोत. कॅमेर्यांसाठी ८० लाखाचा खर्च आहे. सव्वाकोटीच्या खेळण्या आहेत.

- दिपक डोंगरे, उप अभियंता.

सोमवारी १५० कोटीच्या प्रस्तावाचे सादरीकरण

जवळपास तीनशे एकर विस्तीर्ण पसरलेल्या या उद्यानात दहा कोटीत कसा कायापालट करणार ? उद्यान कसे असावे ? कोणत्या धर्तीवर असावे या प्रश्नांची सोडवनुक करण्यासाठी किमान १५० कोटी हवेत. यासाठी मुंबईच्या फूट्रीक्स या जागतिक स्तरावरच्या प्रकल्प सल्लागाराकडून सविस्तर उद्यानाचा दिडशे कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय तसेच पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासमोर सादरीकरण केले जाणार आहे. अंदाजपत्रकीय रकमेच्या ३ . २५ टक्के रक्कम प्रकल्प सल्लागाराला दिली जाईल. अद्याप एक रूपयाही त्यांना दिला नाही. जेव्हा प्रस्ताव मंजुर होईल, निधी मिळेल , सविस्तर प्रकल्प विकास आराखड्यात काही बदल सूचविल्यास त्यात फेरबदल केले जातील. सोमवारी सादरीकरण केल्यानंतर प्रस्ताव जलसंपदामार्फत राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडे पाठवला जाईल. लाॅनसाठी निधी नाही. आता दीडशे कोटीत उद्यानात मीनीट्रेन, सायकल ट्रॅक, प्रवेशद्वार , सुशोभिकरण, लॅन्ड स्केपिंग, फुटपाथ, पार्कींग, सोलरदिवे, रेस्टाॅरंट, उद्यानातील संत ज्ञानेश्वर मंदिराचा विकास, वाॅटरपार्क, खेळण्या,लेझर शो, मिनी थिऐटर, पैठणी हब, प्रेक्षागृहे, परिक्रमा मार्ग, आंबेनाला ते डॅमपर्यंत बोटींग, स्वच्छतागृहे, विद्युतीकरणाची अनेक कामे, वाॅटर फाऊंटन, सीसीटीव्ही कॅमेरे व  इतर अनेक कामांचा समावेश असल्याचे उप अभियंता दिपक डोंगरे यांनी सांगितले.