beed bypass Tendernama
मराठवाडा

Aurangabad : सातारा-देवळाईकरांची मागणी योग्यच; पुलाखाली खोदकाम का?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : बीड बायपासवर संग्रामनगर येथील सदोष उड्डाणपुलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा-देवळाई तसेच बीडबायपासकरांसह समाजमाध्यमांना पुन्हा चुकीची माहिती देत तो 'उड्डाणपुल' नव्हे भुयारी मार्ग असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हेतर चुकीच्या माहितीच्या आधारावर राजकारण्यांनी देखील त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर टेंडरनामाने एका खास स्थापत्य अभियंत्यामार्फत व्हेईकल अंडरपाससचा अभ्यास केला. त्यात डिझाईन चुकीचेच असल्याचा नकाशासह अहवाल त्यांनी सादर केला आहे, त्याचा खास रिपोर्ट. दुसरीकडे चुक लक्षात आणून दिल्यावर दुरूस्ती करण्याऐवजी सातारा-देवळाई आणि बीडबायपासकरांसह लोकप्रतिनिधी आणि समाजमाध्यमांना खोटे ठरवत त्यांच्या जखमेवर वारंवार मीट चोळण्याचा प्रकार होत आहे. यासंदर्भात सातारा-देवळाई कृती समितीच्या वतीने मुख्य अभियंत्यांना निवेदन देणार असल्याचे बद्रीनाथ थोरात यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

संग्रामनगर चौकात तो 'उड्डाणपुल' नाही, भुयारी मार्ग आहे, असे म्हणत सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी (ता. २१) न्यायालयात खुलासा केला. दरम्यान काही समाजमाध्यमे चुकीची माहिती देत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. धक्कादायक म्हणजे बीड बायपासवर संग्रामनगर चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला उड्डाणपुल औरंगाबादकर उघड्या डोळ्याने पाहत असताना 'उड्डाणपुल' नव्हे तो तर भुयारी मार्ग! असा खुलासा कसा काय करण्यात आला हा संशोधनाचा विषय आहे. एवढेच नव्हेतर समाजमाध्यमांनी चुकीची माहिती छापल्याने राजकारण्यांनी देखील त्याला वेगळा रंग दिला, असा गंभीर खुलासा केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा खुलाशाने औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात देखील सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.

गेल्या आठवड्यात शहरातील खड्डेमय रस्त्याच्या सुनावणी प्रसंगी न्यायालयाने याचिकाकर्ता ॲड. रूपेश जैस्वाल यांना संग्रामनगर चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाचे छायाचित्र काढून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (ता. २३) रोजी सुनावणी दरम्यान जैस्वाल यांनी न्यायालयापुढे छायाचित्र सादर केली व या सदोष पुलाबाबत मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळेअभावी त्यावर सुनावणी झाली नाही. जैस्वाल यांच्या मुद्द्यांवर येत्या '२' तारखेला सविस्तर सुनावणीची शक्यता आहे.

दरम्यान, याचिकाकर्ता जैस्वाल यांनी न्यायालयापुढे संग्रामनगर उड्डाणपुलाचे छायाचित्र दाखवले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारी वकीलांमार्फत बाजू मांडताना अभियंत्यांनी विचारपूर्वकच उड्डाणपुलाचा आराखडा तयार करून पुलाचे आणि भुयारी मार्गाचे बांधकाम केल्याचा खुलासा केला. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकून 'साईड ड्रेन' ही तयार केले जाणार असल्याचे सांगितले.

अशी आहे वस्तुस्थिती

● बीड बायपास येथे तो उड्डाणपुल नव्हे, भुयारी मार्ग असल्याचा खुलासा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुल उभारलेला आहे. पुलाखालून सातारागावाकडे आणि पैठणजंक्शनकडे जाण्यासाठी व्हेईकल अंडरपास देखील उभारण्यात आला आहे. मात्र, यात दक्षिणेकडून उत्तरेकडे अर्थात बीड बायपासला जोडणारा संपूर्ण उतार असलेल्या सातारा गावाकडे जाणाऱ्या आमदार रस्त्याचा लचका तोडून पुढे उत्तरेकडे बीड बायपासच्या दिशेने देवळाईचौकाकडून एमआयटीकडे जाणारे पुलाखालचे दोन्ही वाहतूकीचे रस्ते दहा ते बारा फुटापर्यंत खोदण्यात आले आहेत.

● सातारकरांसाठी खोदलेल्या रस्त्यावरून अर्थात टेमकाडाच्या जोडरस्त्यावरून पुलाखालीच वळणमार्ग देत हा रस्ता दर्गा उड्डाणपुलाकडे जोडण्यात आला आहे. दुसरीकडे दर्गापुलाकडुन संग्रामनगर पुलाखालुन व्हेईकल अंडरपासचे दहा ते बारा फुट खोदकाम करून तो रस्ता एमआयटीच्या दिशेने जोडण्यात आला आहे.

असा होईल भविष्यात परिणाम

● उड्डाणपुलाखाली व्हेईकल अंडरपासचे दहा ते बारा फुट खोदकाम केल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होईल.

● बीड बायपासच्यादिशेने दक्षिणेकडे असलेल्या अनेक वसाहतींचे पाणी उतारावरून व्हेईकल अंडरपासमध्ये शिरून एकाच वेळी मोठ्या व्यासाच्या पाईपातून पाण्याचा निचरा होणार नाही. पावसाळ्यात चार महिने व्हेईकल अंडरबायपासमधून प्रवास करताना वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडेल. शिवाय चढ-उतारावरून वाहने काढताना फसगत होणार आहे.

खोदकामाने दुभंगला डीपीरोड

औरंगाबाद महापालिकेच्या शहर विकास आराखड्यात जालनारोड अमरप्रीत सिंग्नल ते शहानुरवाडी एकता चौक एकता चौक ते संग्रामनगर चौकाकडून थेट सातारा गावठाणाकडून पैठणरस्त्याकडे जाणारा शंभरफुटाचा डीपीरोड कागदावर आहे. हंग्रामनगर चौकात व्हेईकल अंडरबपासचे डिझाईन करताना आणि पुन्हा तिथे खोदकाम करताना अभियंत्यांना डीपीरोडचा विसर पडलेला आहे.

असा हवा होता व्हेईकल अंडरपास

संग्रामनगर चौकातील बीड बायपास रस्ता उंच होता. शिवाय त्याला जोडणारा आमदाररोड देखील टेमकाडावर होता. सुपासारख्या आकाराचे उंच रस्ते असताना व्हेईकल अंडरबपासला खालुन खोदकाम करून त्याला बशीचा आकार अर्थात सखोल उतार दिला. आणि आता व्हेईकल अंडरपास की  तेथे भुयारी मार्ग असा संभ्रम निर्माण करण्यात आला. मुळात  पुलाखालच्या आधीच्या टाॅपच्या रस्त्यावरून व्हेईकल अंडरपास ते पुलाच्या कठड्यापर्यंत पुलाची उंची आयआरसीच्या मानकाप्रमाणे सहा ते साडेसहा मीटर ठेवायला हवी होती. आमदाररोड ते बीडबायपासला जोडण्यासाठी पहिला व्हेईकल अंडरपास असायला हवा होता.

अशी झाली घोडचुक 

पुलाखालील व्हेईकल अंडरपासमधून जड वाहने पास होत नसल्याचे लक्षात आल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उंच रस्ते खोदून व्हेईकल अंडरपास ते पुलाच्या बीमपर्यंत उंची वाढविण्याचे काम सुरू केले आणि आता व्हेईकल अंडरपासचे रूपांतर भुयारी मार्गात सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.

टेंडरनामाने नियुक्त केले अभ्यासक

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाखालुन व्हेईकल अंडरपासचे तयार केलेले डिझाईन टेंडरनामाच्या हाती लागले. त्यावर टेंडरनामाने काही मुद्दे उपस्थित केले. याचा तंतोतंत अभ्यास करण्यासाठी '  टेंडरनामा ' ने इंजि.प्रा. दिपक सुर्यवंशी या खास स्थापत्य अभियंत्यांची नियुक्ती केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे डिझाईन आणि त्यानुसार सद्यस्थितीत होत असलेले व्हेईकल अंडरपासच्या  खालुन खोदकाम याचा सुर्यवंशी यांनी तंतोतंत अंभ्यास केला. प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. आणि टेंडरनामाच्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब करत ,  कसे हवे होते व्हेईकल अंडरपासचे काम याचा सविस्तर डिझाईन तयार करून त्यांनी नकाशासह अहवाल सादर केला. 

अशी व्यक्त केली चिंता

टेंडरनामाच्या मुद्द्यांवर खोलात जाऊन अभ्यास करताना त्यांनी पुलासह व्हेईकल अंडरपासची पाहणी केली. दरम्यान व्हेईकल अंडरपासच्या खोदकामामुळे ज्या आडव्या बीमवर संपुर्ण पुलाचा भार आहे. त्याला मजबुती देणार्या उभ्या गोलाकार बीमची पायापासून फुटींग आणि पीसीसी फुटल्याने पुलाच्या स्ट्रक्चरला भविष्यात धोका पोहोचण्याची चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

(टेंडरनामाने नियुक्त केलेल्या स्थापत्य अभियंता दिपक सुर्यवंशी यांनी व्हेईकल अंडरपासचा तयार केलेला हाच तो नकाशा)