औरंगाबाद (Aurangabad) : कोणत्याही बहूमजली इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या एकूण चटई क्षेत्रानुसार १५ टक्के जागा पार्किंगसाठी खुली ठेवणे बंधन कारक असून, कोणत्याही स्थितीत अशा जागांची विक्री करू नये, अशी स्पष्ट अधिसूचना महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा MAHARERA) जुलै २०२१ रोजी काढली होती. याशिवाय ज्या बांधकाम व्यावसायिकांनी यापूर्वी पार्किंगच्या जागा खुल्या न ठेवता बांधकाम केले असेल, ते बांधकाम तातडीने पाडून जागा मोकळी करावी, असाही त्यात उल्लेख असताना यावर अद्याप राज्यातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी अंमलबजावणी केलेली नाही. याऊलट या अधिसूचनेतील निर्बंध झुगारून अनेकांनी पार्किंगच्या जागाच विकल्याचे 'टेंडरनामा' तपासात उघड झाले आहे.
रिअल इस्टेट (रेग्युलेशन ॲण्ड डेव्हलपमेंट) अधिनियमातील तरतुदींनुसार बिल्डर खुल्या पार्किंगच्या जागा विकू शकत नाही. महारेराने या पार्श्वभूमीवर अधिसूचना जारी केली आहे. ज्यानुसार बिल्डर घर खरेदीदारांना खुल्या पार्किंगची विक्री करू शकत नाही. तशा प्रकारचे वाटप करण्याचा अधिकार बिल्डरला नाही. नव्याने तयार होणाऱ्या प्रकल्पांवर देखील बिल्डर पार्किंगसाठी खुल्या व बंदिस्त जागा आरक्षित ठेवण्याकडे कानाडोळा करत आहेत.
याबाबत महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, खुली आणि बंदिस्त अशा दोन पार्किंग आहेत. महारेराची ही अधिसूचना निघण्यापूर्वीपर्यंत पार्किंगची जागा विकण्याची मुभा कुणालाही नव्हती. अधिसूचनेची अंमलबजावणी ३० जुलै २०२१ पासून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात राज्यात कोणत्याही शहरात याची अंमलबजावणी झाली नाही.
महारेराच्या अधिसूचनेनंतर राज्यातील बिल्डर लाॅबीचे धाबे दणाणले असले, तरी त्यापूर्वी विक्री केलेल्या पार्किंगच्या जागांचे काय, असा प्रश्न उपस्थित करत बिल्डर लाॅबीने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभारच उघडा केला. परिणामी तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत पुन्हा चिरीमिरी व्यवहार केल्याने आजघडीला शहरात कुठेही रस्त्यावर वाहनच काय साधे पाऊल ठेवायला जागा मिळत नाही.
शहरातील किराडपूरा ते रोशनगेट, पोलिस मेस ते कटकटगेट, एपीआय क्वार्नर ते कलाग्राम, कॅनाॅटप्लेस, औरंगपुरा, गुलमंडी, छावणी, सिडको - हडको, बीड बायपास, जालनारोड , शहानूरवाडी, टिळकनगर, मुकूंदवाडी, चिकलठाणा, आकाशवाणी ते त्रिमुर्ती चौक, सेव्हनहील ते सुतगिरणी ते शिवाजीनगर ते एकता चौकसह बऱ्याच परिसरातील मोठ्या सदनिका, सोसायट्यांमध्ये आणि व्यापारी संकुलालातील खुल्या पार्किंगच्या जागा विकण्यात आल्या आहेत. बऱ्याच दवाखान्यांमध्ये पार्किंगच्या जागेवर स्वागत कक्ष, लॅब औषधालय आणि कॅन्टींन आहेत. या बड्या पार्किंग माफियांवर कारवाईच होत नसल्याने नवीन प्रकल्पांवर कोणी कारवाईचे पाऊलही टाकत नाहीत. परिणामी दिवसेंदिवस राज्यातील जिल्हा आणि तालुक्याच्या गावातील रस्त्यांवर पार्किंचा प्रश्न जटील होत चालला आहे. परिणामी होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूदर देखील वाढत चालला आहे. वेळीच यावर आळा न घातल्यास दिवसेंदिवस ही समस्या उग्र होईल, असे जाणकारांचे मत आहे.
असे होते 'महारेरा'चे निर्बंध
● खुल्या पार्किंगची जागा ही एफएसआयमध्ये गणली जात नसल्याने त्याची विक्री करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
● मंजूर नकाशानुसार खुली पार्किंग दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
● बंदिस्त पार्किंगची जागा विकल्यास त्याच्या निश्चित स्थानाचा उल्लेख करारात करणे बंधनकारक करण्यात आले आहे.