Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : हरितपट्टा पार्किंगसाठी कोणाला कोणी केला आंदण?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील तत्कालीन सिडको प्रशासनाच्या काळात हायकोर्ट ते सिडको एन-२ मौजे मुर्तिजापूर म्हाडा काॅलनी मार्गावर जालनारोड ते सर्व्हिस रस्त्याच्या मध्यभागी विकसित केलेला हरितपट्टा हाॅटेल, लाॅजिंग, बोर्डींग, रुग्णालये, बॅंकासाठी आंदण ठरला आहे.

हायकोर्ट ते म्हाडा काॅलनी दरम्यान सुमारे पाच किमी रस्त्याच्या मध्यभागी काही ठिकाणी महानगरपालिकेने विविध जातीची रोपटी लावून यातील काही ठिकाणी हरितपट्टा सुशोभित केला आहे. परंतु त्याच मार्गावर हायकोर्ट ते सिडको बसस्थानक ते मुकुंदवाडी चौक (सोहम मोटर्स) दरम्यान हा संपूर्ण हरितपट्टा महानगरपालिकेने विकसित केला नाही. परिणामी यात  काही हाॅटेल्स, रूग्णालये, लाॅजींग बोर्डींग व बॅका तसेच शोरूम  व्यावसायिकांनी बेकायदा पार्किंग केली आहे. त्यामुळे या हरितपट्ट्याच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. महापालिकेने तत्कालीन महानगरपालिका आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तीककुमार पांण्डेय यांच्या काळात शहराच्या सौंदर्यीकरणासह प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचा हेतूने शहरातील काही उड्डाणपुलांच्या भिंती तसेच नाल्यांचे काढ व्हर्टिकल गार्डननी सजवले.‌ त्यासाठी केंद्रशासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातुन कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत.काही  प्रमुख चौकांमध्ये कारंजे लावण्याचेही काम केले आहे.

शहरातील काही उद्यानांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून हरितपट्टे विकसित केले आहेत. वापराविना पडून किंबहुना कोणत्याही वापरास योग्य नसलेल्या मोकळ्या जागेवर हिरवळ विकसित करून तो परिसर सुशोभित करण्यात आला आहे. परंतु हायकोर्ट ते म्हाडा कॉलनी दरम्यान हायकोर्ट ते मुकुंदवाडी चौक सोहम मोटर्स या साडेतीन किमी अंतरातील हरितपट्ट्याचा वापर थेट बेकायदा पार्किंगसाठी केला जात आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांत हरितपट्टा की पार्किंग पट्टा असा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण फुटा-फुटाच्या अंतरावर लावलेल्या वाहनांमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. या बेकायदा पार्किंगमुळे हरितपट्ट्यातील रोपटी गायब झाली आहेत.एकूणच हा हरितपट्टा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी आहे, की फुकट्या व्यावसायिकांसाठी, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.