Aurangabad Tendernama
मराठवाडा

रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम अर्धवट असताना दुसऱ्याचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा या रस्त्याचे अर्धवट काम असताना झाल्टा फाटा-कॅम्ब्रीज या पुढील टप्प्याचे काम आजपासून सुरुवात करण्यात आले. टेंडरनुसार सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार होते. मात्र, कॅम्ब्रीज चौकातील पूलाचे काम रद्द झाल्याने पीडब्लुडीकडे पैशाची बचत झाली. त्यामुळे सदर रस्त्याचे डांबरीकरण ऐवजी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळाले.

बीड बायपासवरील पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा दरम्यान १३ किमी लांबीचे काँक्रिटीकरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर तीन उड्डाणपूलांचे काम सद्यस्थितीत अर्धवट आहे. यातील संग्रामनगर पुलाची उंची कमी केल्याने तो चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे. काही ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचे व मायनर आठ पुलांचे काम देखील अद्याप बाकी आहे. ज्याठिकाणी पुलांचे काम सुरू आहे. त्याच्या जोड रस्त्यावरून आठशे मीटरचा टप्पा गाठताना दररोज वाहनधारकांना प्रचंड धुळीचा आणि खड्ड्यांचा त्रास सोसावा लागत आहे. धक्कादायक म्हणजे मुख्य १३ मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सहा मीटर तयार केलेल्या जोडरस्त्याच्या मधल्या खटक्या तशाच ठेवल्याने संपूर्ण १३ मीटर लांबीत अपघाताचा धोका आहे. यात ठेकेदाराने कुठेही सुरक्षा साधनांचा वापर केलेला दिसून येत नाही.

शहरातून जाणाऱ्या जालना रस्त्यावरील जड वाहतुकीला पर्यायी रस्ता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागांतर्गत, 'बांधा-वापरा व हस्तांतरित करा' या तत्वाखाली बीड बायपास बांधला गेला. २५ वर्षे पुढे वाहतूक कितपत राहील याचा अंदाज बांधून रस्ता बनविला गेला होता, पण दक्षिण बाजूने औरंगाबाद मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे बीड बायपासवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली. रस्ता ओलांडताना अपघातांची मालिका सुरु झाली. याची दखल घेत बीड बायपास मजबुतीकरण व रुंदीकरणाच्या प्रस्तावास हायब्रीड ॲन्यूटी प्रकल्पांतर्गत मान्यता दिली गेली. वर्षभरापूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान या प्रस्तावात पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा हा संपूर्ण १३ किमी रस्ता काँक्रिटचा केला जाईल, असा उल्लेख होता. तसेच कॅम्ब्रीज चौक, एमआयटी कॉलेज, संग्रामनगर टी पॉइंट आणि देवळाई चौक या चार ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार होते. मात्र कॅम्ब्रीज चौकातील उड्डाणपूल काही तांत्रिक कारणाने रद्द झाल्याने त्या ऐवजी झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौकापर्यंत रस्त्याचे काॅक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बीडबायपासची कामे अर्धवट असताना झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक या अडीच किमी रस्ता बांधकामास बुधवारी सकाळी सुरुवात झाली. परिणामी वाहनधारकांची चांगलीच दैना उडणार असल्याची या भागात जोरदार चर्चा सुरू आहे.