छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री पानंद योजनेंतर्गत निकृष्ठ रस्त्याची चौकशी करण्यासाठी जालना जिल्हापरिषदेने नेमलेल्या चौकशी समितीत जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता महेश अंकुशराव बोराडे शुक्रवारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याला गाय गोठ्याचे अनुदान वाटप करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले, त्यामुळे सदर निकृष्ट रस्त्याची चौकशी लांबणीवर पडणार का? असा सवाल कंडारी - अंबड - आंतरवाली टेंभी - कोठीतील ग्रामंस्थांना पडला आहे. यातच जालना जिल्ह्यातील अंबड, परतुर, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, मंठा आदी आठ तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तसेच मातोश्री पानंद योजनेतील कोट्यावधींचे हजारो विविध कामे मंजुर झाली आहेत व सद्यस्थितीत सुरू आहेत. यातील सर्वच कामांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी तात्यासाहेब कळंब यांनी जालना जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे लाऊन धरली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कंडारी - अंबड - आंतरवाली टेंभी - कोठी रस्त्यात अल्प मुरुम टाकून रस्त्याचे काम निकृष्ठ होत असल्याची येथील शेकडो शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांच्या आदेशाने चौकशी समिती गठीत करण्यात आली.या चौकशी समितीत मंठा येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एस.बी.गगनबोने, परतुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस.एस.सुगंधे, मंठा येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तायडे, मंठा येथील मग्रारोहयोचे कंत्राटी तांत्रिक सहाय्यक तथा अभियंता महेश बोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र या चौकशी समितीतील चौकशी अधिकारी महेश बोराडे याला गायगोठा बांधकामाचे अनुदानाचा दुसरा हप्ता देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याने मग्रारोहयो योजनेंतर्गत गायगोठा मंजुर झालेल्या एका शेतकऱ्याकडून ७००० हजार रुपयाची लाच मागितली होती. तडजोडीअंती बोराडेने ५००० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते.
काय आहे प्रकरण
मंठा तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याला शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गाय गोठा बांधकामासाठी ७७००० हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले होते. त्यांना मंजुर झालेल्या अनुदानापैकी ९००० हजार रूपये मस्टरद्वारे प्राप्त झाले होते.दुसर्या हप्त्याचे ९४४७ रुपये त्यांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला आरोपी महेश बोराडे याने ७००० हजार रुपयाची लाच मागितली होती.परंतु आधीच दुष्काळाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्याकडे बोराडे याला इतके पैसे देण्याची ताकद नव्हती. त्यांची त्याला पैसे देण्याची हिंम्मत होत नव्हती. अखेर त्यांनी बोराडे लाच मागत असल्याची तक्रार जालना लाचलूचपत विभागाकडे केली. १२ फेब्रुवारी २०२४ तसेच २९ मार्च २०२४ व २२ मार्च २०२४ रोजी बोराडेने संबंधित शेतकऱ्याकडून लाच मागितल्याचे लाचलूचपत विभागाने पडताळणी केली. त्यात ७००० ऐवजी ५००० हजारात मांडवली केल्याचे पंचासमक्ष सिध्द झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन मंठा येथील पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.