लातूर (Latur) : राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत आता सिमेंट काँक्रिटचे रस्ते होणार आहेत. पूर्वी केवळ गावातून गेलेल्या अंतरातच काही मीटर लांबीचे काँक्रिटचे रस्ते व उर्वरित डांबरी रस्ते करण्यात येत होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये मंजूर रस्ते आता सरसकट सिमेंट काँक्रिटचे होणार आहेत. जिल्ह्यात यंदा अशा १५९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी राज्य सरकारने २१७ कोटी रुपये निधीही मंजूर केला आहे.
योजनेचे कार्यकारी अभियंता असिफ खैराडी यांनी ही माहिती दिली. ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात दळणवळणाच्या सुविधा तयार करण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची उभारणी केली जाते. या योजनेच्या धर्तीवर मागील काही वर्षापासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्यात येत आहे. काही वर्षात योजनेतून मोठ्या संख्येने रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भागात योजनेतून मजबूत रस्ते तयार झाल्यामुळे दळणवळण सुकर झाले आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचीही सोय झाली असून ऊसाच्या वाहतुकीसह शेतीला जाण्यासाठी मजबूत रस्ते उपलब्ध झाले आहेत. पूर्वी या योजनेत डांबरी रस्ते तयार करण्यात येत होते. केवळ गावातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येत होता. हा रस्ता शंभर ते पाचशे मीटर लांबीचा असे. गावातील सांडपाणी व अन्य कारणांमुळे पाणी येऊन रस्ता नादुरुस्त होऊ नये, यासाठी सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येत होता. दुसरीकडे सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे रस्तेही सिमेंट काँक्रिटचे करण्यात येऊ लागले. या रस्त्यांचे कामे वेगाने होण्यासोबत डांबरी रस्त्याच्या तुलनेत या रस्त्याचा दर्जा अनेक वर्षे चांगला राहू लागला. यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतही राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये मंजूर सर्व रस्ते काँक्रिटचे होणार असून सरसकट सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहे. रस्ते काँक्रिटचे होणार असले तरी रस्त्याची रूंदी ही डांबरी रस्त्याएवढीच राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता खैराडी यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात २८ रस्ते
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमधून जिल्ह्यात यावर्षी २८ रस्ते होणार असून त्याची लांबी १५८.९०० किलोमीटर आहे. त्यासाठी २१७ कोटी ७९ लाख २८ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. यात अहमदपूर व चाकूर तालुक्यात पाच, उदगीर व जळकोट तालुक्यात आठ, निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यात दहा तर औसा तालुक्यात पाच रस्त्यांचा समावेश असल्याचे कार्यकारी अभियंता खैराडी यांनी सांगितले.