Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरच्या वैभवात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागीय केंद्राच्या इमारतीने घातली भर

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहराच्या वैभवात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागीय केंद्राच्या इमारतीने भर घातली असून, शहरातील मुकुंदवाडी परिसरातील झेंडाचौक लगत या नवीन वास्तूने अनेकांना भुरळ घातली आहे. लवकरच या नवीन इमारतीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत विभागीय केंद्रात डिप्लोमा इन ऑक्टोमेट्री सायन्स आणि बॅचलर इन ऑक्टोमेट्री हे कोर्स सुरू होणार असून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांसाठी नेत्रसेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय पोलिस आणि सैन्यदलातील जवानांसाठी विशेष नेत्रतपासणीची सेवा दिली जाणार आहे. तसेच थाॅयराईड आणि तत्सम आजार असणाऱ्या रूग्नासाठी डोळ्यांच्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

विशेषतः शहराबाहेरील  इतर तालुक्यातील डोळ्यांचे आजार असणाऱ्या तसेच डायबेटिस रूग्नांचा शोध घेऊन त्यांच्या डोळ्यांच्या आजारावर देखील उपचार केले जाणार आहेत. यासाठी गावागावात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागीय केंद्राच्या माध्यमातून शिबिर देखील घेतली जाणार आहेत. त्या रूग्णांवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागीय केंद्राच्या इमारतीत दाखल करून उपचार केले जाणार आहेत. तसेच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन हाॅस्पीटल मॅनेजमेंट व एमएससी ऑक्टोमेट्री हे नविन कोर्सेस सुरू केले जाणार आहेत. विशेषतः इमारतीचे बांधकाम होताच विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक व नेत्रतज्ज्ञांसह इतर पदांची भरती करण्यात आली आहे. शहरातील व मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना व हिंगोलीसह इतर जिल्ह्यांतील आर्थिक दुर्बल घटकातील डोळ्यांचे आजार असणार्या रूग्णांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागीय केंद्राच्या माध्यमातून चांगली सुविधा प्राप्त होणार आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागीय केंद्राचे किलेअर्क परिसरातील आमखास मैदानालगत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्नालयाने दिलेल्या दोन खोल्यात कामकाज चालत असे. त्यासाठी जवळपास दरमहा २२ हजार रूपये भाडे द्यावे लागत असे. शिवाय जागा कमी पडत असे.मात्र आता नवीन इमारतीचे बांधकाम झाल्याने विद्यापीठाच्या खर्चात बचत आणि प्रशिक्षणार्थ्यांची चांगली सोय व रूग्नांची सेवा अधिक उत्तमरित्या पार पाडली जाणार आहे.

मराठवाड्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नेत्रसेवेत नाव आजमाऊ पाहणाऱ्या विद्यार्थांना अव्वल दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांचे ध्येय आणि उद्दिष्टे सफल व्हावीत त्यांच्यात संशोधन वाढीची कार्यक्षमतापूर्ण कृती निर्माण व्हावी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे कल्याण व्हावे, त्यासोबतच डोळ्यांचे आजार असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभागीय केंद्राच्या इमारतीसाठी जागा आणि त्यावर नवीन इमारतीचे बांधकाम व्हावे यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रयत्न करित होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन - २ मुकुंदवाडी परिसरातील पायलटबाबा नगरीत नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी भुखंड देखील खरेदी केला होता. सदर भुखंड विकसित करणेबाबत ५ डिसेंबर २०१७ रोजी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरातील विभागीय केंद्राच्या इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता व निधी हस्तांतरण करणेबाबत प्रशासकीय मान्यता दिली होती.त्यात तळमजला अधिक प्रथममजला अशा इमारतीचे बांधकाम २०१७-१८ व सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात पुर्ण करण्याचे विद्यापीठाने उद्दिष्ट समोर ठेवले होते.

छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत बांधकामासाठी एजंन्सी म्हणून नेमणुक करण्यात आली होती. इमारतीच्या बांधकामाची सर्वस्वी जबाबदारी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंत्यावर टाकण्यात आली होती. कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक शाखेच्या वतीने विद्यापीठास इमारतीच्या बांधकामाचे ढोबळ अंदाजपत्रके व नकाशा १० ऑक्टोबर २०१७ रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी विद्यापीठास सादर केले होते. त्यात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २६ सप्टेंबर २००९ रोजीच्या बैठकीतील ठराव क्रमांक १८६/ २०१७ नुसार सदर भुखंड विकसित करण्यासाठी १९ कोटी ३१ लाख ५० हजार इतक्या रकमेस ५ डिसेंबर २०१७ रोजी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी बांधकाम विभागास काही अटींवर प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने काढलेल्या टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या बाबा कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. या इमारतीच्या तळमजला अधिक प्रथममजला बांधकामासाठी ६ कोटी ८८ लाख १३ हजार , संपुर्ण इमारतीचे अंतर्गत बाह्य विद्युतीकरण, अग्नीप्रतीबंधक योजना, एअर कंडिशनींग , लिफ्ट, सोलर सिस्टीम, सीसीटीव्ही सिस्टीम, पथदिप, जनरेटर, वाॅटरपंप, वाॅटरकुलर, व इतर अनुशंगीक बाबींनी अद्ययावत इमारत तयार झाली आहे. यासाठी जवळपास ३ कोटी १० लाख ३१ हजार, पाणी पुरवठा व भुमिगत गटारासाठी  ३४ लाख ४१ हजार, संरक्षक भिंत व दर्शनी प्रवेशद्वार तसेच सुरक्षारक्षक चौकीसाठी ३० लाख, अंतर्गत सिमेंट रस्त्यांसाठी जवळपास ६२ लाख, प्लीथ प्रोटेक्शन साठी २० लाख, फर्निचर ९९ लाख ७५ हजार,पार्किंग काॅक्रीटसाठी ४० लाख, जलनिस्सारणासाठी काॅक्रीट गटर बांधणे याकामावर २३ लाख २५ हजार, जमिनीचा भुस्तर तपासण्यासाठी १० लाख ३२ हजार, रेनवाॅटर हार्वेस्टिंगसाठी ७ लाख ९६ हजार, पंप हाऊस , अंडरग्राउंड पाण्याच्या टाक्या व बोअरवेलसाठी २२ लाख, लॅंडस्केपिंग व बगीचा तयार करण्यासाठी ६४ लाख ४१ हजार, फायर फायटींग आरजमेंटसाठी ६२ लाख ६४ हजार, शौचालयासाठी ५ लाख, झेंडावंदन व सुरक्षारक्षक कर्मचारी कॅबीनसाठी १० लाख व सर्व्हिस टॅक्स,वॅट व जीएसटीसाठी ४ कोटी ४१ लाख ०२ हजार असे एकुण १९ कोटी ३१ लाख ५० हजारात या देखण्या इमारतीचे काम झाले आहे. सदर इमारतीला ऐतिहासिक स्थळाचे रूप दिल्याने इमारतीने सार्यांनाच भुरळ घातली आहे.

यांच्या कार्यकाळात या देखण्याइमारतीचे काम पूर्ण

सदर इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे, अधीक्षक अभियंता सुंदरराव भगत, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, उप अभियंता हिरालाल ठाकुर, शाखा अभियंता बाबुलाल चौंडीये, नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. कालिदास द. चव्हाण, विद्यापीठाचे छत्रपती संभाजीनगराचे विभाग प्रमुख डाॅ. अमित वांगीकर यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले.