Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद महापालिका प्रशासकांच्या नालेसफाई प्रयोगास यंत्रणेचाच खोडा

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : पालिकेतील कार्यकारी अभियंता बी. डी. फड यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या नालेसफाईनंतर नाल्यांमध्थे गाळ आणि कचरा 'जैसे थे' असल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यात काही ठिकाणी केलेल्या सफाईतील गाळ आणि कचरा नाल्याच्या काठावरच ठेवण्यात आला आहे. यामुळे नाल्याकाठी राहणाऱ्या लोकांना जबर फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात अतिक्रमणांमुळे देखील नाल्यातून पाणी वाहून न जाता ते वसाहतीत शिरते. त्यामुळे नालेसफाई पुर्णपणे का होत नाही. नाल्यातील गाळ आणि केरकचरा काढण्यास महापालिकेला अपयश का येते याप्रश्नांचे उत्तर शोधून त्यावर ठोस उपाय करणे गरजेचे आहे.

'टेंडरनामा'ने गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शहर पाणी पाणी झाल्याचे दाखले देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेनंतर महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील नदी-नाल्यांची पाहणी केली. त्यात वास्तव समोर आल्यानंतर नाले सफाईचा आराखडा तयार करण्यात आला. त्यावर त्यांनी ठेकेदारांच्या खाबुगिरीला आळा घालत महापालिकेतील यांत्रिकी विभागामार्फत नालेसफाईचा निर्णय घेतला. मात्र तीन महिन्यात बहुतांश नालेसफाईविनाच आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने नाल्याचे बॅकवाॅटर घरात शिरल्यानंतर अनेक ठिकाणी संसार वाहून कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात नाल्यांची पाहणी करण्यासाठी चढाओढ लागेल. भर पावसात नाले पाहणीचा दिखावा करत आश्वासनांची खैरात वाटून निघुन जातील. पण नालेसफाई पूर्णपणे का होत नाही याचा गांभीर्याने कुणी विचार करत नाही. नालेसफाई करताना महापालिकेला अपयश का येते, याकडे कुणीही लक्ष देत नाही.

या बड्या भोगवटाधारकांचे काय?

शहरातील औरंगपुऱ्यातील ठाकरे सरकारचे शिवाई ट्रस्ट, श्रीमान श्रीमती, औषधीभवन, सारस्वत न जनता सहकारी बँक, सुराणा काॅम्पलेक्स जाफरगेट, बन्सीलालनगर तसेच इतर नाल्यावरील इमारत धारकांना नाले स्वच्छ करण्याच्या अटीवर बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. इमारतखाली असलेल्या नाल्यांची तांत्रिक पद्धतीने सफाई होणे गरजेचे आहे. मात्र, येथील इमारतधारकांनी अद्याप नाल्यांची सफाई केली नसल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील दिवान देवडी, चुनाभट्टी, गांधीनगर, गुलमंडी, औरंगपुरा, नारळीबाग, जुनामोंढा, पानदरिबा, टिळकपथ या भागांत दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बॅक वाॅटरमुळे भयावह परिस्थिती निर्माण होईल आणि पहिल्याच किरकोळ पावसाने झालेही तसेच. औषधीभवन समोर दीड कोटी रूपये खर्च करून नव्याने बांधलेल्या आरसीसी पूलावरच पाणी चढले.

या नाल्यांवरील अतिक्रमणे काढा

खाम नदीतील अल हिलाल काॅलनी, जलाल काॅलनी गरमपाणी, शहानुरवाडी ते दर्ग्यापर्यंतचा नाला, टाऊन हाॅल ते वज्द मेमोरियल हाॅल, नारेगाव-ब्रिजवाडी ते चमचमनगर, किराडपुरा, इलियास मशीद ते कटकटगेट, अल्तमश काॅलनी, एन के पान सेंटर ते पुढे एमजीएम ते जाफरगेट, बन्सीलालनगर ते राजनगर ते जहागिरदार काॅलनी, भानुदासनगर ते झांबड इस्टेट, उस्माणपुरा पोलिस स्टेशन ते द्वारकापुरी ते श्रेयनगरनाला, तिरूपती पार्क ते चाणक्यपुरी, सिल्कमिल्क काॅलनी ते हमालवाडा ते सादातनगर, पोलिस मेस ते फाजलपूरा, इंदिरानगर (दक्षिण ) ते गादिया विहार, क्रांतीनगर ते सुयोग काॅलनी, अमरप्रीत ते गौतमनगर, गांधीनगर, जयभवानीनगर, शिवाजीनगर, अजम काॅलनी ते शहाबाजार, रमानगर ते श्रेयनगर, राठी टाॅवर, संजयनगर, औषधीभवन ते टिळकपथ, कटकटगेट ते टाईम्स काॅलनी, मुकुंदवाडीतील अंबिकानगर ते संतोषीमातानगर.

नालेसफाई पुर्णपणे का होत नाही

शहरातील नाल्यांच्या दुतर्फा अतिक्रमणांचा बोलबाला असल्याने चिंचोळ्या नाल्यात पोकलॅन्ड किंवा जेसीबी जाऊच शकत नाही. त्यामुळे अतिक्रमित झालेल्या नाल्यांमध्ये मजुरांमार्फत नाल्यातील गाळ व कचरा काढुन कर्मचारी हा गाळ व कचरा नाल्याच्या टाकला जातो. हा गाळ सुकल्यानंतर तो उचलण्यासाठी मोठी वाहने जाऊच शकत नाहीत. परिणामी गाळ काठावरच राहतो. हा गाळ न उचलल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यात पावसाच्या पाण्यात काठावरील गाळ पुन्हा नाल्यात जाऊन पडतो.

नाल्यांची बांधणी खिळखिळी

नगर परिषदेच्या काळात तसेच सिडको आणि म्हाडाने निर्माण केलेल्या वसाहतीत दगडी भिंतींनी केलेल्या नाल्यांची खिळखिळी अवस्था झाली आहे. सुरक्षाभिंती कोसळल्याने नाल्याकाठी भुसभूशीत झालेल्या जागेतील माती, मुरूम आणि दगडांचे ढिग नाल्यात अडकलेले आहेत. यासाठी नाल्यांचे बेड काॅक्रीट करून नाल्यांच्या सुरक्षाभिंतींचे काम करून नाल्यांवर सुरक्षा जाळ्या टाकणे आवश्यक आहे.

नाल्याकाठी कचरा डेपो का?

एकीकडे नाल्यांमध्ये कुणी कचरा टाकु नये यासाठी महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी पुलांवर सुरक्षा जाळ्यांची उभारणी केली. मात्र शहरातील ९ झोनमधील ११५ वार्डात प्रत्येक नाल्याच्या काठावरच महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी कचराडेपो केल्याने काठावरील गाळ नाल्यात जाऊन नाले तुंबलेले दिसतात. याकडे प्रशासकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रशासक साहेब, नाल्यांची हद्द निश्चिती व पात्रांचा नकाशा शोधा

शहरातील नालेसफाई करण्यास येत असलेले अपयश पाहूण त्यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी मे २०१४ मध्ये महापालिका आणि नगरभूमापण अधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकार्यामार्फत शहरातील नाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात आठ वर्षापूर्वी नाल्यांवर दोन हजार अतिक्रमणे असल्याची माहिती समोर आली होती. अतिक्रमणांमुळे नाल्यातून पाणी वाहून न जाता ते वसाहतींमध्ये शिरते. यामुळे सुमारे अडीच हजार घरांना 'त्या' अतिक्रमणांमुळे फटका बसतो. यामुळे नाल्यांची पाहणी करून त्यांची हद्द व पात्रांचा नकाशा तयार त्यावर भूमिअभिलेख उपअधिक्षक कार्यालयात अतिक्रमित नाल्यांची मोजणी करण्यासाठी महापालिकेने वीस लाख रूपये भरले होते. पण अद्याप एकाही नाल्यातील अतिक्रमण काढण्यात आले नाही. महापालिका प्रशासकांनी हा नकाशा शोधून अतिक्रमणे हटवल्यास पावसाच्या पाण्थाचा निचरा करण्यास मदत होईल.