Road Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 'त्या' रस्त्याची दुरुस्ती कधी करणार?; कंत्राटदाराकडे एमएसआरडीसीचे अक्षम्य दुर्लक्ष

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील जालना रस्त्याला समांतर असणार्या लक्ष्मणचावडी ते वरद गणेश मंदीर या मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी भूमिगत गटारीचे चेंबर उघडे आहेत, तर काही ठिकाणी त्यावरील ढापे चेंबरमध्ये तुटली आहेत. अनेक ठिकाणी चेंबरवरील ढापे लंपास झाली आहेत. त्यामुळे पायी जाणारे नागरीक आणि दुचाकी वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी भूमिगत गटारावर फुटपाथ तयार करण्यात आला आहे. त्याचा वापर वाहनतळासाठी केला जात आहे. या भागातील नागरिकांच्या तक्रारीनंतर टेंडरनामा प्रतिनिधीने नागरिकांसमवेत संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. दरम्यान चारचाकी वाहनाचेही चाक या खड्ड्यांमध्ये अडकून नुकसान होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे एमएसआरडीसी प्रशासनाने लक्ष घालून संबंधित कंत्राटदाराकडून उघडे चेंबर आणि तुटलेल्या ढाप्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचू नये व पादचाऱ्यांची देखील सोय व्हावी, अशा दुहेरी हेतुने एमएसआरडीसीने रस्ते बांधकामाचा विकास आराखडा करताना पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी गेल्या चार वर्षांपूर्वी लक्ष्मण चावडी ते वरद गणेश मंदिर या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भुयारी पाइप टाकून स्ट्राम वाॅटर यंत्रणाची निर्मिती केली गेली. त्यावरच पादचाऱ्यांना चालण्यासाठी तीन मीटर रूंदीत पॅव्हरब्लाॅक टाकून फुटपाथ तयार करण्यात आला.‌ त्यांनतर डांबरी रस्त्यांचे काम करण्यात आले. मात्र एकदा काम झाल्यानंतर कंत्राटदाराने देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा केला. फुटपाथवर असणाऱ्या चेंबरवर निकृष्ट ढापे टाकल्याने ते फुटल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. दुसरीकडे चेंबरवरीवरील ढाप्यांवर वाहने उभी केली जात असल्याने ढापे फुटल्याचे म्हणत अधिकार्यांनी कंत्राटदाराची वकिली केली आहे. यासंदर्भात कत्राटदाराला विचारणा केली असता आमच्या अभियंत्याकडून पाहणी करून ढापे टाकले जातील व रस्त्याची देखील दुरूस्ती केली जाईल असे त्यांनी सांगितले. विशेषतः पाण्याचा निचरा करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून स्ट्राम वाॅटर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असताना रस्त्यावर पावसाळ्यात तळे साचते. त्यामुळे या कामात कंत्राटदाराने तांत्रिक दोष केल्याचे दिसून येते. रस्त्याचे बांधकाम करतांना करतांना रस्त्याची उंची व मॅनहोलचा विचार न करता डांबरीकरण करण्यात आल्याने ते रस्त्यापेक्षा उंच झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे.

लक्ष्मण चावडी ते वरद गणेश मंदिर हा शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता आहे.‌ रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेल्या स्ट्राम वाॅटर गटारावरील चेंबरवर ढापे नसल्याने उघड्या खड्ड्यात पादचाऱ्यांचे पाय पडून त्यामुळे पादचाऱ्यांचे अपघात होत असल्याच्या घटना कायम घडत असल्याचे व वाहनांचे नुकसान होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.हा रस्ता जालना रस्त्याला समांतर आहे. गत चाळीस वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे. याशिवाय जालना रस्त्यावर देखील कोंडी वाढली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या १५० कोटी निधी पैकी या १७५० मीटर लांबी व १५ मीटर रूंद रस्त्यासाठी ८ कोटी ७१ लाख ४५ हजार २४५ रुपये मंजूर करण्यात आले. रस्ता बांधकामाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे टाकण्यात आली. या रस्त्याचे काम छत्रपती संभाजीनगर शहरातील मापारी कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आली. मात्र हा रस्ता बांधला की, लोकांच्या मरणाची व्यवस्था करण्यात आली, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत. रस्त्याचा दोषनिवारण कालावधी आधीच वाट लागली.

कंत्राटदाराला २२ ऑक्टोबर २०२० रोजी या रस्त्याच्या बांधकामाची वर्क ऑर्डर दिली होती. २१ मे २०२१ रोजी कंत्राटदाराने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र कंत्राटदारांने वेळेत हे काम केले नव्हते. कंत्राटदाराकडे ३६ महिन्यांचा दोष निवारण कालावधी असताना त्याने देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा केला. दरम्यान सदर रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असतानाच दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेला खिंडार पडले आहेत. दोषनिवारण कालावधी आधीच अल्पावधीत रस्त्याचे बेहाल झाले आहेत. परिणामी नागरिकांना कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या फुटपाथचा वापर करता येत नाही. खड्डे टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी व्हाया सावरकर चौक ते सिल्लेखाना या शहरातील मुख्य व अत्यंत वर्दळीच्या व जालना रस्त्याला समांतर असलेल्या रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने काही महिन्याभरापूर्वी डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम संपण्यात आले. या बीटी रस्त्याचे काम होऊन दोष निवारण कालावधी संपण्याआधीच निकृष्ट बांधकामामुळे डांबर उखडून रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून गिट्टी निघून रस्त्यावर गिट्टीचा पसारा पडला आहे. यामुळे वाहन चालकांचा जीव संकटात सापडला आहे. परिणामी यापूर्वी प्रमाणेच रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे.