औरंगाबाद (Aurangabad) : रखडलेल्या शिवाजीनगर (Shivajinagar) रेल्वेमार्गातील भुयारी मार्गाच्या कामाला लवकर मुहूर्त लावा, पाच लाख लोकांसाठी महत्त्वाचा असलेला हा प्रश्न का प्रलंबित आहे, रेल्वे भुयारी मार्गासाठी राज्य सरकारने निधी दिलेला आहे. मात्र रेल्वे बोर्डाने (Railway Board) अद्याप दक्षिण मध्य रेल्वेकडे निधी हस्तांतरित केला नसल्याचा आरोप करत औंरगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी (ता. ३०) थेट लोकसभेच्या अध्यक्षांपुढे व्यथा मांडली.
रेल्वे भुयारी मार्गासाठी राज्य सरकार, महापालिका आणि रेल्वे विभागाकडून संयुक्त सर्व्हेक्षण केले गेले. त्यानंतर भुयारी मार्गातील जोड रस्त्यांसाठी भूसंपादनाचा मुद्दा उपस्थित केला गेला. महापालिकेने उप अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणी देखील केली. त्यात मोजे सातारा हद्दीत २४ मीटर रस्त्यासाठी १८०० चौरस मीटर रस्त्याची आवश्यकता असल्याचे समोर आले. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्या मार्फत विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. यासाठी एक कोटी ८१ लाख ३४ हजाराचा निधी देखील जमा करण्यात आला. मात्र पुढे तीन वर्षे भूसंपादनाचा प्रस्ताव धूळखात ठेवला.
असा घातला खोडा...
त्यानंतर अचानक जाग आलेल्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्याने १४ मार्च रोजी पीडब्ल्यूडी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली असता पीडब्ल्यूडीच्या एका अभियंत्याने मोजणी नकाशात अर्धवट भूसंपादन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि तोच धागा पकडत विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांने पीडब्ल्यूडी आणि महापालिकेला सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे विनंती पत्र दिले.
महापालिकेने खोडला मुद्दा
महापालिकेने विशेष भूसंपादन अधिकाऱ्याचा मुद्दा खोडत जुन्याच प्रस्तावानुसार भूसंपादन करण्याचे पत्र पाठवले. दूसरीकडे मुद्दा उपस्थित करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याच्या प्रस्तावाची आता विशेष भूसंपादन अधिकारी वाट पाहत आहे. एकूणच कागदी घोडे नाचवत हा महत्त्वाचा प्रकल्प 'लालफितशाहीत' अडकवला आहे
किती वर्षे सोसाव्यात मरण यातना
शहराच्या दक्षिणेकडे अर्थात सातारा, देवळाई, बाळापूर, गांधेली ते झाल्टा फाट्यापर्यंत बीड बायपासलगत औरंगाबाद शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यामुळे सूतगिरणी ते देवळाई चौक या रस्त्याचा वापर वाढलेला आहे. हा रस्ता सर्वांत जास्त वाहतुकीसाठी वापरणाऱ्या रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. याच रस्त्यावर पुढे शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक ५५ मुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असताना यंत्रणांनी येथील भुयारी मार्गाचे भिजत घोंगडे कायम ठेवले आहे. यामुळे आम्ही अजून किती वर्ष मरणयातना सोसाव्यात असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रकरण न्यायालयात
२०१८ पासून प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर रेल्वे विभागाने भुयारी मार्ग तयार करण्यासाठी लवकरच टेंडर काढले जाणार असल्याचे लेखी उत्तर न्यायालयात दाखल केलेले आहे. प्रत्यक्षात चार वर्षानंतर देखील भूयारी मार्ग कागदावरच आहे.
रेल्वेची यंत्रणा थंड
दरम्यान, २०२१ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवाजीनगर येथे भुयारी रेल्वे मार्गासाठी विशेष निधी देण्याची मागणी केली होती. अजित पवार यांनी विशेष निधी देण्याची मागणी मान्य देखील केली आहे. यासाठी २२ कटी ३० लाखाची तरतूद देखील केली आहे. पण दुसरीकडे आम्हाला जोड रस्त्यासाठी जागेचा ताबाच दिला नसल्याचे कारण पुढे करत रेल्वे विभागाकडून आतापर्यंत निविदा काढलेली नाही.
जलील यांचा रेल्वे मंत्र्यांना इशारा ; परिणाम शून्य
भुयारी मार्गासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत खासदार जलील यांनी एक महिन्याच्या आत भुयारी मार्ग तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. तर महिन्याभरानंतर शिवाजीनगर येथे भुयारी मार्गासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पुन्हा रेल्वे विभाग आणि राज्य शासनामार्फत संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यात तोच तो भूसंपादनाचा मुद्दा आडवा केला गेला. विशेष म्हणजे या पाहणीनंतर तयार केलेल्या ३८ कोटी ६० लाखाचे अंदाजपत्रक तयार केले गेले. त्यावर रेल्वे विभाग आणि राज्य सरकारने भागीदारी तत्वावर भुयारी मार्ग तयार करण्यासाठी पैसे खर्च करावेत असाही निर्णय घेण्यात आला. त्यावर भूसंपादनासह २२ कोटी ३० लाखाचा विडा राज्य सरकारने उचलला. रेल्वे विभागाने १६ कोटी ३० लाख देण्याची तयारी दर्शवली. मात्र यानंतर कामाची गती मंदावली.
रेल्वेकडून पोकळ आश्वासन
गत सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून निधी मिळाल्यानंतर, रेल्वे विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. विशेष म्हणजे संग्रामनगर येथे तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गाप्रमाणे दोन्ही बाजुने वाहनांना जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन देखील केल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते. या कामासाठी तातडीने गर्डर तयार करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले होते. ते तयार झाल्यानंतर रेल्वे भुयारी मार्ग तयार होणार मात्र रेल्वे विभागाचे हे आश्वासन फोल ठरले.