छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मुकुंदवाडी रेल्वे हाॅल्ट स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्या थांबाव्यात यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने सर्वेक्षण सुरू केले आहे. यासंदर्भात टेंडरनामाने सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यावर जलील यांनी थेट केंद्रीय रेल्वे बोर्ड व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करून येथे एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून लावून धरली होती. त्यानुसार येथे जनशताब्दी, तपोवन आणि नंदीग्राम एक्स्प्रेस थांबविण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या तीन गाड्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सविस्तर सर्वेक्षण करून योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
या सर्वेक्षणानुसार रेल्वे अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेतल्यास लाखो प्रवाशांची गैरसोय थांबेल. यापुर्वी दिवंगत ओमप्रकाश वर्मा यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार दक्षिण मध्य रेल्वेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक त्रिकाला रांभा यांनी पाहणी केली होती. मात्र त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या येथे एक्सप्रेस गाड्या थांबविणे योग्य नसल्याचे अहवालात स्पष्ट केले होते. आता जलील यांची मागणी आणि त्यानुसार वैष्णव यांच्या आदेशावर नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक निधी सरकार काय निर्णय घेतात यावर आता छत्रपती संभाजीनगरकरांचे लक्ष लागून आहे.
मुकुंदवाडीसह सिडको-हडको, चिकलठाणा, सातारा, देवळाई, बाळापूर, गांधेली, झाल्टा, गारखेडा व पंचतारांकीत शेंद्रा औद्योगिक वसाहत व ऑरिक सिटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक्सप्रेस रेल्वेने (Express Railway) प्रवास करायचा असल्यास त्यांना १८ ते २५ किलोमीटर दुर असलेल्या मुख्य रेल्वे स्टेशनवर (railway station) यावे लागते. कारण कोणत्याही एक्स्प्रेस रेल्वे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर थांबत नाही. त्यामुळे एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करायचा असल्यास येथील नागरिकांना १८ किलोमीटरचा वळसा घालत मुख्य स्टेशनवर यावे लागते. एक्सप्रेस गाड्या येथेही थांबाव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी लावून धरली आहे. मात्र आतापर्यंत व्यावसायिकदृष्ट्या ते योग्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनला डी दर्जा मिळून अनेक वर्ष लोटली आहेत. मात्र अद्यापपर्यंत स्टेशनला एक्स्प्रेस रेल्वेचा थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सिडको-हडकोसह मुकुंदवाडी व अन्य पंचक्रोशीतील परिसरातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. जवळ स्टेशन असताना मुख्य रेल्वे स्टेशन गाठावे लागते. मुख्य रेल्वे स्टेशन ते मुकुंदवाडी हे अंतर जवळपास १८ किलोमीटर आहे. सध्या मराठवाडा एक्स्प्रेस ही एकमेव एक्स्प्रेस आणि इतर पॅसेंजर रेल्वे येथे थांबतात. या स्टेशनवरून दररोज सात ते आठ हजारांपर्यंत प्रवासी ये-जा करतात. काही वर्षापूर्वी येथे कोट्यावधीचा खर्च करून प्रतिक्षालय. तसेच प्लॅटफॉर्मची लांबी व रूंदी वाढविण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची व प्रकाशासह स्वच्छतागृह, आसन व्यवस्था तसेच रिझर्व्हेशनसाठी पीआरएसची सुविधाही देण्यात आली आहे. मात्र येथे अद्याप एक्स्प्रेस थांबण्याची परवानगी मिळालेली नाही. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष दिवंगत ओमप्रकाश वर्मा यांनी मागणी लावून धरल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेचे तत्कालीन विभागीय महाव्यवस्थापक त्रिकाला रंभा यांनी स्थानकाची पाहणी करताना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर तपोवन एक्सप्रेस थांबवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अधिकारी बदलले आणि हे आश्वासन विसरले. इतर ठिकाणी चार-चार किमी अंतरावर एक्सप्रेस थांबवल्या जातात, मग मुकुंदवाडीलाच का नाही, असा सवाल वर्मा यांनी केल्यानंतर रांभा यांनी तपोवन, जनशताब्दी आणि नंदीग्राम एक्स्प्रेसला थांबा देणे हे व्यावसायिक दृष्ट्या योग्य नाही, त्यामुळे थांबा देणे व्यवहार्य नसल्याचे कारण पुढे केले होते.