Road Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : रस्त्याच्या निधीसाठी आमदार धावले अन् मुख्यमंत्री शिंदे लगेच पावले

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराच्या दक्षिणेला असलेल्या देवळाई चौक ते साईटेकडी या धार्मिक व पर्यटनस्थळांसह अनेक पंचक्रोशींना जोडणाऱ्या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याची अवकळा अनेक वर्षांनंतर दूर होणार आहे. नगर विकास विभागाच्या भरघोस निधीतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला आहे, मात्र या मार्गावरील अतिक्रमणाने व्यापणाऱ्या व एकदा रस्ता झाल्यानंतर पुन्हा महावितरणचे खांब स्थलांतर करणे, जलवाहिनी व ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी खोदकाम करून रस्त्याची स्थिती नव्याने रस्ता झाल्यानंतर ‘जैसे थे’ असू नये अशी रास्त अपेक्षा सातारा व देवळाई परिसरातील नागरिक करीत आहेत. यासाठी रस्त्याचे काम देवळाई गावापर्यंत येण्याआधीच या सर्व कामांचा निपटारा जलदगतीने होणे अपेक्षित असल्याचे लोकांचे मत आहे.

प्रमुख जिल्हा मार्ग-३५ देवळाई चौक (बीड बायपास) ते देवळाई गाव ते साईटेकडी हा रस्ता दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडत असला तरी शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या रस्त्याकडे वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधींकडून फारसे प्रयत्न झाले नव्हते. गेल्या तीन वर्षांपूर्वी दोन कोटी रूपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र रस्त्याच्या कडेला दाट वसाहती, बाजारपेठ आणि हाॅटेल्स असल्याने रस्त्यावर बारमही पाणी वाहत असल्याने तसेच या मार्गावर ड्रेनेजलाईनचा अभाव व साइड ड्रेन नसल्याने ड्रेनेज व पावसाचे पाणी देखील रस्त्यावरच वाहत असल्याने हा रस्ता दोषनिवारण कालावधी आधीच होत्याचा नव्हता झाला होता. त्यामुळे निदान २० ते ३० वर्ष हा रस्ता टिकावा, वारंवार दुरूस्तीचा खर्च टळावा, यासाठी सिमेंटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर विकास खात्याकडे पाठवला होता. तो त्यांनी मान्य देखील केला. त्यामुळे आता व्यापारी व पर्यटकांच्या व सातारा - देवळाई - बीड बायपास आणि आसपासच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या दृष्टीकोनातून हा रस्ता सुसाट होणार आहे व देवळाईचौक ते साईटेकडी पर्यंत विविध बाजारपेठेचे महत्व वाढविण्यासाठी हा नवा रस्ता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

सातारा-देवळाई या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी रस्ते, पाणी, भुमिगत गटार, मनोरंजनासाठी मुलभुत सुविधा, सार्वजनिक आरोग्य, बसस्थानक, पथदिवे, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था आदी सुविधांचा दुष्काळ आहे. सातत्याने लोकप्रतिनिधी, महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाचे याभागातील नागरी सुविधांबाबत दुर्लक्ष होत गेले. यावर 'टेंडरनामा'ने सातत्याने प्रहार केला. आधी याभागातील बीड बायपास रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावला, त्यानंतर शिवाजीनगर भुयारी मार्गाचा मार्ग मोकळा केला. निर्लेप ते बीड बायपार रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तत्कालिन पालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांचे लक्ष वेधले त्यांनी १५ कोटीची तरतूद केली. विद्यमान प्रशासक तथा  आयुक्त व स्मार्ट सिटी सीईओ जी. श्रीकांत यांनी पुल उभारणीसाठी नाशिकच्या एका प्रकल्प सल्लागार समितीची देखील नियुक्ति केली आहे. याभागातील भुमिगत गटार योजनेसाठी २५० कोटी मंजुर केलेत. याशिवाय जलवाहिनीचे काम देखील प्रगती पथावर सुरू आहे.

विशेषतः देवळाई चौक ते साईटेकडी या चाळणी झालेल्या रस्त्याची व्यथा चव्हाट्यावर आणल्यावर या वृत्तमालिकेची दखल घेत आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने पाठपुरावा केल्याने तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साडेदहा कोटी रूपये मंजुर केले होते. मात्र ठाकरे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने ठाकरे सरकारच्या काळातील विकास कामांना स्थगिती दिल्याने या रस्त्याला कैची लागली होती. 'टेंडरनामा'ने यासंदर्भात सातत्याने आमदार शिरसाट यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून या रस्त्याला ३५ कोटीचा भरघोस निधी मंजूर झाल्याने आता हा खड्डेमय डांबरी रस्ता सिमेंटच्या पॉलिसने चकाचक होणार आहे.

पण पैठण-आपेगावसह बीड बायपास रस्त्याची व शहरातील डीफर्ट पेमेंटसह सरकारी निधीतून प्राप्त कोट्यावधी रस्त्याची वाट लावणार्या जीएनआय कंन्सट्रक्शन कंपनीलाच याकामाचे टेंडर मिळाल्याने त्याच्या कणखर दर्जावर निकृष्ट कामाची झालर पसरायला नको , अशी माफक अपेक्षा सातारा - देवळाईकरांनी व्यक्त केली आहे.शहरातील देवळाई चौक ते देवळाई गावापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळणी हाेऊन माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागात नवीन वसाहतींमध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे हाल हाेत आहे. याच रस्त्यावर प्रसिद्ध शाळा, कृषी विद्यापीठ आणि साई टेकडी, साई मंदिर तसेच देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान कचनेर जैन मंदिरचा समावेश आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे साई टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान साईटेकडीकडुन या सिमेंट रस्त्याच्या कामाला   सुरूवात झाली आहे. साई टेकडी ते घारदोन ते कचनेर पर्यंतच्या दुसर्या टप्प्याच्या रस्त्याच्या कामालाही लवकरच सुरूवात होईल.

सध्या रस्त्याचे साईटेकडीकडुन सुरू केल्याने पुढे देवळाईगाव ते देवळाई चौकापर्यंत महापालिकेने अतिक्रमण आणि पथदिव्यांचे खांब  बाजूला करून  रस्त्याची  रुंदी वाढवणे गरजेचे आहे. महावितरण कंपनीने विद्युत खांब बाजुला करणे अपेक्षित आहे. याशिवाय कासवगतीने काम करणार्या जीव्हीपीआर कंपनी व मजीप्रा व महापालिकेने संयुक्त पाहणी करून जलवाहिनीची सिमारेषा आखुन तातडीने जलवाहिनी व भुमिगत गटार योजनेचे काम करणे अपेक्षित आहे. रस्त्याचे काम पूर्ण केल्यावर नंतर या अत्यावश्यक नागरी सुविधांसाठी नवेकोरे रस्ते फोडण्याची दाट शक्यता असते. संबंधित यंत्रणांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. साईटेकडी साईमंदीर, कचनेर जैन मंदीर, घारदोन सोमेश्वर महादेव मंदीर या तीर्थक्षेत्रांकडे जाणार्या या महत्वाच्या रस्त्याचे भाग्य उजळल्याने दोन  राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या रस्त्याची अवस्था खड्डेमुक्त होणार असल्याने भाविकांचा त्रास कमी होणार आहे. शिवाय रस्त्याची रूंदी देखील वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या रहदारीमुळे सातत्याने वहातुकीचा खोळंबा दुर होणार आहे. आता सिमेंट रस्ता करताना चांगले नियोजन केलेआहे, त्यामुळे रस्ता मोठा होईल पण बाजूचे अतिक्रमणही काढणे आवश्यक आहे. कांही असो पण बऱ्याच वर्षानंतर मोठ्या धार्मिक आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ झाल्याने अडथळे दुर होतील. अतिक्रमण बाजूला काढण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला नागरिकांचाही तेवढाच प्रतिसाद असायला हवा.