Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : एकनाथ नगरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाकडे म्हाडाचा कानाडोळा; जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकनाथ नगर येथील ९६ गाळे योजनेतील इमारत क्रमांक ३१, ३२, ३३, ३४ या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी व पुनर्बांधनीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कायम अडथळा निर्माण करत आहेत, असा आरोप करत येथील रहिवाशांनी म्हाडातील हे झारीतले शुक्राचार्य नक्की कोण आहेत याचा शोध घेऊन सदर इमारतीचा पुनर्विकास व पुनर्बांधणीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी किंवा छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण मंडळ व क्षेत्र विकास मंडळ यांनीच सदर इमारतीचा पुनर्विकास तथा पुनर्बाधणी करावी व आम्हाला धोकादायक इमारतीत मरणयातनापासून वाचवावे व आमच्या इमारतीमधील रहात असलेल्या गाळेधारकांना जिवीतास व वित्तहानीच्या धोका होणार नाही याची काळजी घ्या म्हणत भविष्यात काही दुर्घटना होऊन धोका निर्माण झाल्यास त्यास म्हाडा जबाबदार राहिल, असा इशाराच येथील रहिवाशांनी म्हाडातील अधिकाऱ्यांना दिला आहे.‌

या संदर्भात सवीस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने उस्मानपुरा परिसरातील शहर नगर भूमापन क्रमांक - १६६२३ एकनाथ नगर भागात ९६ गाळे योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चार इमारतींचा प्रकल्प १९७८ - ७९ च्या दरम्यान पुर्ण केला होता. सदर प्रकल्पातील इमारत बांधुन गाळेधारकांना विकत देण्यात आल्या होत्या. इमारत बांधकामाला जवळपास ४४ वर्ष झाली आहेत.

प्रकल्प पुनर्विकासासाठी रहिवाशांचा पाठपुरावा 

म्हाडाने ४४ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती अतिशय जीर्ण झालेल्या व मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत.‌इमारतीच्या मागील बाजूच्या भिंतींचे प्लास्टर निखळून पडले आहे. छताचे प्लास्टर खराब झालेले आहे.‌ काॅलमचे काॅंक्रीट पडलेले आहे. लोखंडी गंज गंजले आहेत. बर्याच ठिकाणी भेगा पडल्या आहेत.‌इमारत धोकादायक असल्याने पावसाळ्यात इमारत कोसळून मोठी दुर्घटना होऊन जिवीत व वित्तहानी नाकारता येत नाही. यामुळे येथील धास्तावलेल्या रहिवाशांनी इमारतींच्या पुनर्विकासासाठी व पुनर्बांधनीसाठी म्हाडा प्रशासनाला वारंवार जागे करण्याचा प्रयत्न केला. म्हाडाच्या मुंबई येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयाकडे देखील अर्ज विनंत्या केल्या.एवढेच नव्हे तर म्हाडाचे प्रधान सचिव, सचिव व उप सचिवांकडे, गृहनिर्माण मंत्री, मुख्य व उपमुख्यमंत्री तसेच राज्याच्या दोन्ही सभागृहाच्या विरोधीपक्षनेत्यांना सन - २०१५ पासून ते आजतागायत सातत्याने निवेदन देऊनही उपयोग शुन्य आहे.

काय आहे म्हाडाचे म्हणणे 

फ्लॅटधारकांच्या अक्षम्य पाठपुराव्यानंतर धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व पुनर्बांधणी करावयाची असल्यास प्रथमतः खरेदी खत व भाडेकरारनामा करून घ्यावा, असे सन - २०१५ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील म्हाडा कार्यालयामार्फत रहिवाशांना कळविण्यात आले. याला अनुसरून इमारत धारकांनी २० मे २०१५ रोजी डिड ऑफ सेल आणि डीड ऑफ लिज अर्थात हस्तांतरण करून घेतले. त्यानंतर म्हाडाने लिज वाटवून घेण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर फ्लॅटधारकांनी १४ ऑक्टोबर २०१५ रोजी रिनिव्हल ऑफ लिज (भाडेपट्टा नुतनीकरण) करून घेतले.‌

म्हाडाचे कान टोचणे सुरूच 

म्हाडाने सांगितलेली कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करूनही येथील फ्लॅटधारकांचे कान टोचणे सुरूच ठेवले. यानंतर म्हाडाने पुन्हा इमारतींचा पुनर्विकास व पुनर्बांधणी करावयाची असल्यास सोसायटी स्थापन करून इमारतीचा पुनर्विकास व पुनर्बांधणी करण्यासाठी विकासक व वास्तुविशारदामार्फत प्रस्ताव सादर करा, असे म्हाडाने कळवले.

जेजे सांगितले तेते केले

म्हाडाने येथील इमारत धारकांना जेजे सांगितले तीती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात केली. तसा प्रस्तावही इमारत धारकांनी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी म्हाडा कार्यालयात सादर केला. म्हाडाने प्रस्तावाची तपासणी करून मुंबई येथील मुख्य कार्यालयात पाठवला. या प्रस्तावावर मुख्य कार्यालयाने फंक्त इमारतीचे खड्ड्यात  बांधकाम असल्याचा शेरा मारला. त्यामुळे प्रकाश येणार नाही त्यामुळे विकास आराखड्यात बदल करा, असे सुचवले. त्यानंतर मुख्य कार्यालयाने इमारत पुनर्विकास व पुनर्बांधणीचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर म्हाडा कार्यालयात परत पाठवला. त्यात मुख्य कार्यालयाने दिलेल्या त्रृटीची पुर्तता करून म्हाडा कार्यालयाने दुरूस्तीसह प्रस्ताव मंजुर करून १४ मार्च २०२२ रोजी मुख्य कार्यालयाकडे पाठविला. मात्र अद्याप इमारत पुनर्विकास व पुनर्बांधणीचा प्रस्ताव धुळखात पडुन आहे. यात छत्रपती संभाजीनगर येथील म्हाडा कार्यालयातील मुख्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंतासह मिळकत व्यवस्थापक व आरेखक तसेच वास्तुविशारद व सहाय्यक वास्तुविशारद यांनी सदर प्रस्तावाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार न करता तो प्रस्ताव यांच्या दुर्लक्षामुळेच धुळखात पडल्याचा आरोप इमारत धारकांनी केला आहे. 

प्रस्तावातील महत्वाची कागदपत्रे गहाळ

एवढेच नव्हे, तर इमारत धारकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर येथील म्हाडा कार्यालयात पाठविल्यानंतर त्यातील महत्वाच्या टिपण्या व नोंदी व इमारत धारकांनी दिलेली महत्वाची कागदपत्रे गहाळ करून प्रस्तावाची संचिका दाबून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप इमारत धारकांनी केला आहे. त्यावर इमारत धारकांनी म्हाडाकडे तगादा लावल्यास तेथील अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे सापडत नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे.त्यामुळे इमारत पुनर्विकास व पुनर्बांधणीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे इमारत धारकांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

चुक म्हाडाची, ताप इमारत धारकांना 

गत ९ वर्षांपासून म्हाडाने सांगितलेली सर्व कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून कागदी प्रपंच पुर्ण करत इमारत धारकांची दमछाक झाली असताना त्यानंतर म्हाडाने इमारत धारकांना २०१५ मध्ये करून दिलेले कंनव्हेन्स अर्थात अभिहस्तांतरण तब्बल ९ वर्षानंतर चुकीचे झाल्याचे म्हणत म्हाडाने इमारत धारकांना धक्का दिला. तसे लेखी पत्रच इमारत धारकांना म्हाडाने २९ मे २०२४ रोजी पत्र दिले. त्यात  इमारत धारकांनी पुन्हा डीड ऑफ कंनव्हेन्स द्वारे दुरूस्तीपत्र नोंदनीकृत करावे, असे सांगण्यात आले. त्यासोबत म्हाडाने डीड ऑफ कंनव्हेन्स रिनिव्हल ऑफ लीजचा रजिस्ट्री नोंदणीकृत करून घेण्याचे पत्र व नमुना इमारत धारकांना देण्यात आला.‌यानंतर इमारत धारकांनी १४ जुन २०२४ रोजी म्हाडाने दिलेल्या पत्रानुसार संस्थेच्या जागेचे नोंदणीकृत दुरूस्तीपत्र करून घेतले. म्हणजेच म्हाडाने केलेल्या चुकांचे खापर इमारत धारकांच्या माथी फोडून गाळेधारकांना खर्चात पाडले. आता पुन्हा नव्याने नकाशे सादर करा म्हणत वेळकाढूपणा करत असल्याचा गाळे धारकांचा आरोप आहे.

एवढे करूनही प्रस्तावाबाबत नकारात्मकता 

एवढे करूनही म्हाडाचे अधिकारी पुनर्विकास प्रस्तावावर सकारात्मक विचार न करता नकारात्मक विचार करून इमारतींमधील गाळेधारकांच्या जिवावर बेतले असल्याचा गंभीर आरोप गाळेधारकांनी केला आहे. त्यामुळेच इमारत पुनर्विकास व पुनर्बांधणीचा प्रस्तावावर अडथळे निर्माण करणार्या छत्रपती संभाजीनगर येथील म्हाडा कार्यालयातील झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेऊन त्या दोषी अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यालयाने योग्य ती कारवाई करावी तसेच इमारतीचा लवकरात लवकर पुनर्विकास व पुनर्बांधणीचा प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन गाळेधारकांना योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंती गाळेधारकांनी मुख्य कार्यालयाकडे केली आहे. 

९ वर्षांपासून पाठपुरावा 

येथील धोकादायक इमारतीचा पुनर्विकास व पुनर्बांधणीसाठी म्हाडाने सांगितलेली सर्व कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता करत सन - २०१५ पासून येथील इमारतीतील गाळेधारक छत्रपती संभाजीनगर येथील म्हाडा कार्यालयात मुंबई येथील मुख्य कार्यालयासह मंत्रालयात वार्या करत आहेत. गत ९ वर्षात या बाबी पुर्ण करण्यासाठी या अंत्यल्प उत्पन्न गटातील गाळेधारकांचे लाखो रूपये कागदीप्रपंच व प्रवासात खर्च झाले आहेत. अद्याप पाठपुरावा सुरूच आहे. मात्र म्हाडाकडून कुठलाही निर्णय घेतला जात नाहीऐ. त्यामुळे जीर्ण झालेल्या इमारतीत राहणाऱ्या गाळेधारकांना जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी जीर्ण व पडझड झालेल्या इमारती पडल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी होऊ शकते, याला सर्वस्वी जबाबदार म्हाडातील मुख्य कार्यालयातील तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील म्हाडा कार्यालयातील सर्वच अधिकारी व २०१५ ते २०२४ दरम्यानचे म्हाडाचे आजी माजी प्रधान सचिव, सचिव व उप सचिव तसेच गृहनिर्माण मंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराच येथील गरीब, गरजू गाळेधारकांनी दिला आहे. 

म्हाडाची हुकुमशाही म्हणे, आता गाळे खाली करा 

सातत्याने कायदेशीर पाठपुरावा केल्यानंतर अपयशी झालेल्या इमारतीतील गाळेधारकांना म्हाडाने १४ जुन २०२४ रोजी इमारतीतील गाळेधारकांना धोकादायक इमारत खाली करून इतरत्र राहण्याची नोटिस बजावली. त्यात त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या १ जुन २०२४ चा संदर्भ जोडला आहे.‌ त्यात म्हाडाने १० जुन २०२४ रोजी महानगरपालिका अतिरिक्त - उप आयुक्त क्र.१ यांच्या पत्राचा संदर्भ टाकत सदर इमारतींचे ९६ गाळे अंत्यल्प उत्पन्न योजनेंतर्गत १९७८ मध्ये बांधकाम झालेले आहे.‌तळमजला अधीक दोन मजले आरसीसी स्वरूपाचे बांधकाम आहे.‌सदर इमारतीचे बांधकाम होऊन ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. सरकारी नियमानुसार ३० वर्षांपेक्षा जास्त आयुष्यमान असलेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. त्यानुसार महानगरपालिकेचे पॅनलवरील वास्तु विशारद काझी नुर मोईनोद्दीन तसेच म्हाडाचे कार्यकारी अभियंता, मिळकत व्यवस्थापक तसेच शाखा अभियंता यांनी १२ जुन २०२४ रोजी इमारतींची संयुक्त पाहणी केली असता इमारत धोकादायक असल्याचे दिसले. यापूर्वी सदर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून १८ ऑगस्ट २०१९ , ३ नोव्हेंबर २०२० रोजी तसा अहवाल सादर केलेला होता.‌महानगरपालिकेच्या अहवालानुसार सदर इमारतीत वास्तव्य करणे धोकादायक असल्याने भविष्यात इमारत कोसळून दुर्घटना झाल्यास जिवीत व वित्तहानी होऊ शकते, असे म्हणत इमारती रिकाम्या करण्याची नोटीस म्हाडाने गाळेधारकांना बजावली आहे. 

काय म्हणतात जबाबदार अधिकारी 

त्यांनी पुनर्विकासाठी खाजगी विकासकाचा पर्याय निवडला आहे. त्यांना नव्याने नकाशे सादर करायचे पत्र २९ जुनला दिलेले आहे. अद्याप नकाशे सादर केलेले नाहीत . ही प्रक्रिया केवळ एकाच इमारतीतील गाळेधारकांनी पुर्ण केलेली आहे. इतर इमारत धारकांनी अद्याप कुठलीली प्रक्रिया केलेली नाही. जर त्यांनी नवीन नकाशे सादर केले, तर आम्हाला बांधकामाचा भाग तपासून प्रिमियम शुल्काची आकारणी करता येईल.‌व गाळेधारकांना ना - हरकत देणे सोपे होईल.‌त्यासाठी त्यांनी सुधारित नकाशासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या सोसायटीतील गाळेधारकांनी सादर केलेले जुने नकाशे चालणार नाहीत. नवीन इमारतीत सरकारी परिपत्रकानुसार प्रचलित नियमानुसार म्हाडाचा हिस्सा राहील.‌सदर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानंतर इमारत धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर गाळेधारकांच्या सुरक्षेसाठीच नोटीस बजावली आहे. 

- सुधारक बाहेगव्हानकर, वास्तुविशारद,म्हाडा