Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 250 कोटींच्या नव्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमची घोषणा पण 'या' उपक्रमाचे काय?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील चिकलठाणा एमआयडीसीत २५० कोटीचे आंतरराष्ट्रीय स्टेडियमची नवी घोषणा महापालिका प्रशासकांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी केली होती. यासाठी निधी मिळावा म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत २५० कोटीचा प्रस्ताव देखील सादर केला होता. मात्र, आता महापालिका आर्थिक बाबतीत स्वतः सक्षम करा, यापूर्वी सरकारने भरभरून दिले आहे, आता अपेक्षा कमी करा, असे म्हणत शिंदे सरकारने प्रस्ताव फेटाळला. दुसरीकडे अत्यावश्यक कामांसाठी निधी नसताना. ठेकेदारांची कोट्यावधीची थकबाकी असताना जी. श्रीकांत यांची २५० कोटीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमची धूंद अद्यापही उतरत नाही. यापूर्वी महापालिकेचा कारभार हाती घेताच त्यांनी "आम्हाला खेळू द्या" या उपक्रमांतर्गत शहरातील मंजूर रेखांकनातील खुल्या जागा विकसित करणार असल्याची घोषणा करत शहरवासियांची वाहवा मिळवली होती. मात्र, अद्याप या उपक्रमाची अंमलबजावणी केली नाही. शहरातील सर्वच खुल्या जागांचा उकिरडा झालेला असून उद्यानांना देखील बकालपण आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्टेडियम होईल तेव्हा होईल पण या उकिरडा झालेल्या मैदानांचे व उद्यानांचे काय, असा सवाल शहरवासी करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील खुली मैदाने आणि उद्यानांना कुठलेही वेळेचे बंधन नाही. सगळीकडे ढासळलेल्या भिंती आणि तुटलेले प्रवेशद्वार यामुळे ती उनाडांची अड्डे आणि कचऱ्याचा उकिरडा झालेली आहेत. त्या-त्या वसाहतीतील नागरिकांसाठी मैदाने आणि उद्यानांचा कसलाही फायदा नाही. गेली कित्येक वर्ष शहरातील बहुतांश मैदाने आणि उद्याने ओस पडलेली आहेत. सद्यःस्थितीत पावसामुळे मैदाने आणि उद्यानांत गवताचे रान उगविले असताना जॉगिंग ट्रॅकच्या वाटाही बंद झाल्या आहेत. शहरातील एकमेव सिध्दार्थ उद्यानाचा अपवाद वगळता  बहुतांश मैदाने आणि उद्यानांची अवस्था दयनीय झाली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाच्या दुरवस्थेमुळे उद्यानांची स्थिती विदारक झाली आहे.

उस्मानपुऱ्यातील लोककला उद्यान, कवितेची बाग, टिळकनगरातील भारतमाता परिसर उद्यान  सिडकोतील पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, कॅनाॅट, भक्तीनगर हडकोतील रोज गार्डन, स्वामी विवेकानंद उद्यान, जिल्हा क्रिडा संकुल, गरवारे क्रिडा संकुल क्रिकेट मैदान वगळता परिसराला तर स्मशानकळा आली आहे. हिरव्यागार लॉनऐवजी उकीरड्यांचे प्रस्त वाढले असल्याने खेळण्यासाठी येणाऱ्या बाळगोपाळांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांची तुंबडी भरण्यासाठी  मैदाने आणि उद्याने अद्ययावत केली जातात. लोकार्पणाचे फलक लावले जातात  कालांतराने मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होते. सद्यस्थितीत पालिकेच्या बहुतांश  ठिकाणी असलेल्या उद्यानाची व मैदानांची बकालावस्था पाहायला मिळते.

टेंडरनामा प्रतिनिधीकडे काही जागृक सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून संपुर्ण शहर पायाखाली घालत सलग तीन दिवस खुल्या मैदानांची व उद्यानांची पाहणी केली. त्यात भयंकर दुरवस्था झालेली दिसली. प्रवेशद्वारापासूनच समस्यांना सुरूवात होते. येथे असलेल्या बोटावर मोजण्याइतक्या खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. काही ठिकाणी घसरगुंडी चांगल्या स्थितीत असतानाही खाली खड्डे आणि गवताचा वेढा असल्याने तिचा वापर होत नाही. गंज चढलेले झोपाळे, पाळणे, सी-सॉ या खेळण्यांची मोडतोड होऊन अनेक वर्ष उलटल्याचे दिसते. मात्र कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.

उद्यानात मैदानांमध्ये प्रवेश केल्यावरच प्रत्येक बाजूस अक्षरश: उकिरडा साचला आहे. यामुळे उद्यानात प्रवेश करतानाच कुबट वास येतो. पालिकेने नको तिथे निधी लाटण्यासाठी व ठेकेदारांच्या तूंबड्या भरण्यासाठी तयार केलेले जाॅगिंग ट्रॅक देखील उखडून गेलेले आहेत. बहुतांश उद्यानात पाईपलाईन आहे, पण फुलझाडांना पाणी देण्यासाठी पाईप नाहीत, तूटलेल्या पाईपांना जोड देत पाणी द्यावे लागते. बहुतांश उद्यानात बोअर नसल्याने आठ दिवसाआड येणार्या महापालिकेच्या पाण्यावर मदार आहे. उद्यानात काम करणार्या अस्थायी कर्मचार्यांची वेतन चार चार महिने मिळत नसल्याची रखडकथा कायमचीच आहे. अनेक उद्यान कारंजे बसविले आहे. मात्र ते गेल्या अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहे गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता करण्यात आली नसल्याने शहरातील उद्याने आणि मैदाने स्मशान झाली आहेत. महापालिका क्षेत्रांत ११० उद्याने आणि प्रत्येक झोन मध्ये सोसायटी, वसाहती आणि काॅलनी परिसरात विकास आराखड्यानुसार सहाशे ते सातशे मोकळी मैदाने आहेत. मात्र  मैदानांचा खेळाडू आणि वॉकसाठी वापर केला जावा, अशी कुठल्याही मैदानात व्यवस्था नाही. 

एकीकडे शहरातील मैदाने आणि उद्यानांची अशी बकाल अवस्था असताना गत दोन महिन्यापुर्वी महापालिका प्रशासक जी.श्रीकांत यांनी गरवारे स्टेडियम येथील सुमारे २७ एकर जागेवर २५० कोटी रूपये खर्च करून एक भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार असल्याचे गाजर दाखविले. मात्र महापालिकेत रूजू होताच त्यांनी आधी  " आम्हाला खेळू द्या "  या संकल्पनेतून महानगरपालिका मंजूर लेखांकनात खुल्या जागा किंवा ओपन स्पेस आणि मैदान आणि उद्यांनाचा लोकसहभागातून आणि श्रमदानातून लहान मुलांसाठी विकसित केली जातील अशी घोषणा केली होती. त्याचा मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम ही नवी  घोषणा करताना मागच्या जुन्या घोषणेचा त्यांना विसर पडला. सदर घोषणा करताना जी. श्रीकांत यांनी शहरातील मंजूर रेखांकनातील खुल्या जागांत लॉन टेनिस, रनिंग आणि इतर क्रिडाक्षेत्रांसाठी अंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्ट उभारून काही मोठी  मैदान विकसित करण्यार, अशी घोषणा केली होती. मुलांच्या हातात मोबाईल किंवा दगड ऐवजी मी चेंडू बघू इच्छितो. "आम्हाला खेळू द्या" या संकल्पनेतून त्यांनी तरुण पिढीला मोबाईल , टीव्ही आणि व्यसना पासून दूर ठेवणार असल्याचा त्यांनी हेतूही व्यक्त केला होता. शहरातील युवकांना चांगली मैदाने असली, की क्रीडा क्षेत्रात त्यांना  शासकीय आणि खाजगी नोकऱ्या आणि रोजगार मिळण्याची जास्त संधी असते, असे ही त्यांनी सांगत वाहवा मिळवून घेतली होती. 

प्रत्यक्षात एकाही मैदानाचा विकास नाही

ज्या ज्या वसाहतीत खुल्या जागा उपलब्ध आहे परंतु ते अस्वच्छ आहे किंवा तिथे अतिक्रमण झालेले आहे अशा जागा महानगरपालिका लोकसहभाग आणि श्रमदानातून मोकळी करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. प्रत्यक्षात एकाही जागांवर अशी कार्यवाही झाली नाही. महानगरपालिका खुल्या जागा दत्तक देण्यासाठी एक पॉलिसी तयार करणार होती. प्रत्यक्षात अद्याप ही पाॅलिसी कागदावरच आहे. त्यामुळे "आम्हाला खेळे द्या" हा उपक्रम अद्याप कागदावरच आहे. याशिवाय ज्या मोठ्या जागांवर खेळण्याचे मैदानाचे आरक्षण आहे किंवा खेळण्याचे मैदान अस्तित्वात आहे त्यांना देखील विकसित करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याची घोषणा प्रशासकांनी केली होती. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही.