Daulatabad Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : ऐतिहासिक घाटातील कोंडी फोडण्यासाठी 'इतका' खर्च

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दौलताबाद किल्ल्यासमोरील ऐतिहासिक तटबंदी सुरक्षित ठेवून त्या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुचविलेल्या अंतिम पर्यायानुसार जटवाड्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या पाॅईंटवरून दौलताबाद घाटाच्या सुरूवातीला असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या बाजूला निघणारा साडेतीन किमीचा वळणमार्ग अंतिम करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अठरा महिन्यात हे काम मार्गी लागणार आहे. याकामासाठी भूसंपादनासह ५० कोटी रूपयाचा खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

२३ एप्रिल २०२३ रोजी दौलताबाद किल्ल्यासमोरील ऐतिहासिक दरवाजात वाहतूक कोंडी झाली होती. येथे पर्यायी मार्गच नसल्यामुळे अनेक वाहने आणि विशेषत: पर्यटक सुमारे तीन तास खोळंबले होते. अमिकस क्युरी म्हणून खंडपीठाने ॲड. नेहा कांबळे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी याचिका तयार करून खंडपीठात सादर केली. संबंधित रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक वर्षापूर्वी तीन पर्याय सुचविले होते. यापूर्वीच्या सुनावणीवेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे ॲड. भूषण कुलकर्णी यांनी खंडपीठापुढे ते सादर केले होते.

यात अब्दीमंडीच्या उजव्या बाजुने सुरूवात करून दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे तीन किमीचा रस्ता निघणार होता. मात्र यासाठी खुप लोकांच्या निवार्यावर बुलडोझर फिरणार होता. तसेच अब्दीमंडीच्या थोडेसे पाठीमागे डाव्या बाजूने दौलताबाद किल्ल्याच्या पाठीमागून वळसा घालून दौलताबाद घाटातील व्ह्यू पाॅईंटजवळ सात किमीचा रस्ता निघणार होता. पण यासाठी वनविभागाची मोठी जमीन ताब्यात घ्यावी लागणार होती.त्यामुळे अब्दीमंडीच्या थोडेसे पाठीमागे उजव्या बाजूने जटवाड्याकडे जाणार्या कच्च्या रस्त्याच्या पाॅईंटवरून दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे साडेतीन किमीचा रस्ता जोडला जाणार आहे. या रस्त्यात वळण नसेल. तसेच नागरिकांचे कमी नुकसान होणार असून भूसंपादनास अडचण होणार नसल्याने यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात ६० टक्के सरकारी जमीन असल्याने भूसंपादनाचा खर्च देखील वाचणार आहे. केवळ ४० टक्के खाजगी मालमत्ताधारकांना मोबदला द्यावा लागणार आहे.यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ‘सुमोटो’ जनहित याचिका दाखल झाली आहे. यात न्यायमूर्ती रविंद्र घुगे, न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या निर्देशाने हे महत्वाचे काम मार्गी लागत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.