मुंबई (Mumbai) : जालना-खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारच्या २४५३ कोटी इतक्या हिश्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.
या रेल्वे मार्गासाठी जमिनीच्या किंमतीसह 4 हजार 907 कोटी 70 लाख रुपये खर्च येणार असून 50 टक्के रक्कम राज्य शासन भरणार आहे. या मार्गाविषयी मध्य रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. एकूण 162 कि.मी. लांब तसेच 16 स्थानके असलेला हा मार्ग सुरु झाल्यानंतर या भागातील औद्योगिक विकासाला आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
छोट्या शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार; ६१५ कोटींचा खर्च -
राज्यातील लहान शहरात अग्निशमन सेवांचा विस्तार करून ही सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेमुळे राज्यातील ड वर्ग महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्या क्षेत्रात अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींवर आधारित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत सज्जता आणि क्षमता निर्माण निधीतून 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या तीन वर्षे कालावधीकरीता ही योजना राबविली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील छोट्या आगींमुळे होणारी वित्तहानी आणि जीवितहानी टाळता येणार आहे. या योजनेसाठी 615 कोटी 48 लाख रुपये खर्च येणार असून केंद्र 75 टकके व राज्य 25 टक्के खर्च करणार आहे.