Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सरकार पावले; देवळाई रस्त्यासाठी 18 कोटींचे टेंडर

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील महापालिका हद्दीतून जाणाऱ्या व छत्रपती संभाजीनगरसह पैठण तालुक्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-देवळाई-भिंदोन-गाडीवाट-घारदोन-कचनेर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-३५च्या दहा किलोमीटर दुरूस्तीसाठी पीडब्लुडीने नुकतेच १८ कोटीचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. यात जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर, जे. पी. कन्स्ट्रक्शन, व्ही. पी. सेठ्ठी, पी. एस. बागडे आदी चार कंपन्यांनी टेंडर प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे.

शहरातील देवळाई चौक ते देवळाई गावापर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळणी हाेऊन माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागात नवीन वसाहतींमध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे हाल हाेत आहे. याच रस्त्यावर प्रसिद्ध शाळा, कृषी विद्यापीठ आणि साई टेकडीचा समावेश आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे साई टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे.

ठाकरेंच्या काळातील कामाला शिंदे सरकारची स्थगिती

ठाकरे सरकारच्या काळात या १० किमी रस्त्यासाठी साडेसहा कोटी मंजूर केले होते. परंतु, ठाकरे सरकार कोसळताच शिंदे सरकारने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे देवळाई रस्त्याचे काम रखडले होते. परंतु, हा रस्ता तयार करावा, अशी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन शिंदे सरकारने साडेदहा कोटी ऐवजी थेट अठरा कोटी मंजुर केल्याने नागरिकांत आनंदोत्सव साजरा हाेत आहे.

सर्वांचीच दैना

शहरासह सोलापूर महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या मार्गावर छाेट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर छोटे-मोठे अपघातही हाेतात. तसेच, सततच्या वाहतूक काेंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी साई टेकडीवर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावर खड्डे असल्याने पर्यटकांनाही माेठा त्रास सहन करावा लागताे.

स्ट्राॅम वाॅटर अभावी दोन कोटींवर पाणी
या रस्त्याची गेल्या चार वर्षांपूर्वी ५०५४-०१०६ जिल्हा व इतर मार्ग या लेखाशिर्षाखाली एक कोटी ९१ लाख ४७ हजार ४१२ रूपयांना तांत्रिक मान्यता मिळाली होती. ४ टक्के कमी दराने टेंडर भरणार्या चारनिया कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यात या संपुर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्ताखाली संपुर्ण काळीमाती असल्याने तसेच महापालिका हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावर कुठेही स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा नसल्याने शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट वसाहतीचे सांडपाणी रस्त्यावरच येत असल्याने चार वर्षातच हा नवीन तयार केलेला रस्ता उखडल्याने नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागते. हा रस्ता कचनेर येथील जैन मंदिराकडे जातो. त्यामुळे तेथे जाणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागताे. पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप येते. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही हाेतात. या परिसरात सध्या ६० पेक्षा अधिक वसाहती आहेत.

या रस्त्यावरील पर्यटनस्थळांना होणार फायदा

या प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४० पेक्षा अधिक सोसायट्या आहेत. या रस्त्यावर रॉयल ऑक्स इंग्लिश स्कूलसह छोट्या-मोठ्या १५ पेक्षा अधिक शाळा, एमजीएम कृषी विद्यापीठ, साई टेकडी, साई मंदिर, कचनेर जैन मंदिर आहे. तसेच, सोलापूर हायवेसुद्धा या रस्त्याला जोडलेला आहे. त्यामुळे बीड बायपासकडून सोलापूर हायवेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या माेठी आहे. या रस्त्याचा सखल भाग आणि आजुबाजुला दाट वसाहती आणि स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेचा अभाव त्यामुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी देवळाई चौक ते गावापर्यंत तीन किमीचा रस्ता काॅक्रीटचा तयार करण्यात येणार आहे. परिणामी ग्रामस्थ आणि पर्यटकांसह शहरी हद्दीतील नागरिकांना या पक्क्या रस्त्यामुळे कायमची गैरसोय दुर होणार आहे.

पाठीच्या मणक्याचे आजार वाढले

या परिसरातील नागरिकांना पाठ व मानेच्या मणक्याचा त्रास होत आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ आणि दुसरीकडे धुळे-सोलापुर हायवे या राष्ट्रीय य महामार्गाला हा रस्ता मिळत असल्याने या मार्गाने अवजड वाहने जातात. रस्त्यात खड्डे असल्याने दुचाकीचे अपघातही होतात. यावर टेंडरनामाने सातत्याने प्रकाश पाडला.

टेंडरनामा वृत्ताची दखल

त्यामुळे या भागातील आमदार संजय शिरसाट यांनी टेंडरनामा वृत्ताची त्वरित दखल घेऊन शिंदे सरकारकडे पाठपुरावा केला. रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, अधीक्षक अभियंता विवेक बडे तसेच कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर यांच्याकडे पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांमार्फत रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी येरेकर यांनी मुख्य व अधीक्षक अभियंत्यांच्या मार्गदर्शनाने तातडीने अंदाजपत्रक तयार करून शिंदे सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला तातडीने अठरा कोटीची मान्यता देखील मिळाली आणि अखेर टेंडर प्रक्रिया पार पडली.

या रस्त्यांकडे देखील लक्ष द्या

धुळे-सोलापुर आणि बीड बायपासला जोडणारे आडगाव निपानी, गाधेली, बाळापुर, सातारा गावठाण ते भारत बटालीयन-सातारा तांडा-सिंदोन भिंदोन, जालनारोड ते टाकळी शिंपी ते टाकळी वैद्य. जालनारोड जुना जकातनाका ते बीड बायपास तसेच महापालिका हद्दीतील सातारा - देवळाईतील अंतर्गत व मुख्य रस्त्यांच्या दुरूस्तीकडे देखील आमदार संजय शिरसाट यांनी असेच लक्ष दिल्यास या भागातील चांगले रस्ते दळणवळणास मदतीचे ठरतील.