Road Tendernama
मराठवाडा

'या' राष्ट्रीय महामार्गाचा मालक कोण? जीवघेण्या खड्ड्यांनी प्रवाशांचे हाल

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : धावणारे वाहने कोसळत आहेत. कुणी हात पाय गमावून बसले आहेत. रस्त्याची रुंदी व नागमोडी वळणामुळे रस्ताच गायब झाला आहे. राज्य मार्गही राहिलेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यासारखी अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे. नवीन बीड बायपास ते चिकलठाणा रेल्वेगेट क्रमांक-५७ ते रेल्वे भुयारी मार्ग ते बकालवाडीपर्यंत रस्त्याची अवस्था भयावह झाली आहे. खड्डेच खड्डे, खिंडारी पडल्याने वाहन चालकांचा जीव धोक्यात आहे.

बीड बायपासकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-७५३ सी छत्रपती संभाजीनगर-जालना राष्ट्रीय महामार्गाचे जाणाऱ्या जुना बीड बायपास याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. विकासाचे एक पाऊल पुढे सरकल्याचा अनुभव सांगणारे ११ आमदार आणि एक खासदार या शहरात आहेत. त्यांचा अकुशलतेचा अनुभव गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांना घेतला आहे, त्याचा प्रत्यय या राष्ट्रीय महामार्गाकडे बघून येतो. आमदार हरिभाऊ बागडे तसेच नवनिर्वाचित खासदार डाॅ. कल्याण काळे यांच्या मतदार संघातील या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था ग्रामीण रस्त्यासारखी झाली असताना, साधी दुरुस्ती करण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही. यामुळे अपघाताची शृंखला सुरू झाली आहे.याच रस्त्याला जोडणारे पैठण जंक्शन - झाल्टा फाटा- कॅम्ब्रीज - झाल्टा फाटा - निपानी फाटा, सोलापूर - धुळे हायवे, छत्रपती संभाजीनगर - जालना, सावंगी बायपास, हे रस्ते बर्यापैकी करण्यात आले. या जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ चे देखील चौपदरीकरण करून रस्ता गुळगुळीत करण्यात यावा, अशी या भागातील नागरिकांनी मागणी केली आहे.

यापूर्वी १९९० च्या दशकात चिकलठाणा जकातनाका - बीडबायपास हा जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ नव्हता. १९९३ ला याच मार्गाने जाणाऱ्या कापसाच्या ट्रकने विमान अपघात झाल्याने हा रस्ता जड वाहणांसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक असा नवा बीड बायपास वळविण्यात आला. त्यानंतर या जुन्या राष्ट्रीय महामार्गाकडे दुर्लक्ष झाले. एकूण तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. चौपदरीकरणातून रस्त्याचा विकास झाल्यास चिकलठाण्यातून जुन्या बीड बायपासकडे जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गालगत, शेती , निवासी वसाहती व छोट्यामोठ्या विकासाला उभारी मिळणार आहे. या भागात असणारा शनी आश्रम, जागृत लक्ष्मीमाता देवस्थान, सातारा - देवळाई, गांधेली, आडगाव, झाल्टा, निपानीकडे  जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून, परिसरात मोठमोठ शाळांचे प्रकल्प उभे राहत असल्याने चिकलठाण्याची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. 

यापूर्वी या रस्त्यासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमीनी भूसंपादीत करण्यात आल्या. जुन्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर या भागाचा विकास होईल, असा प्रचार जमीनी घेतांना तत्कालीन राज्य सरकारने केला होता.‌परंतु विमान अपघातानंतर किती सरकार स्थापण झाले. कोणत्याही सरकारने या राष्ट्रीय महामार्गाकडे बघीतले नाही. नवीन बीडबायपासून बकालवाडीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यातून एक चाक निघाला की, दुसरा खड्डा तयारच असण्याचा अनुभव वाहन चालक घेत आहेत. रात्री या महामार्गाने प्रवास करताना जिकिरीचे ठरत आहे. खड्ड्यामुळे अपघात वाढले आहेत, परंतु साधी दुरुस्ती करण्यात येत नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुणी विचारत नाहीत. राष्ट्रीय महामार्गाला खिंडाऱ्या पडल्या असल्याने मार्गावरून धावणारे वाहने कोसळत आहेत. कुणी हात पाय गमावून बसले आहेत. रस्त्याची रुंदी व नागमोडी वळणामुळे रस्ताच गायब झाला आहे. राज्य मार्गही राहिलेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यासारखी अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे. रस्त्याची अवस्था भयावह झाली आहे. खड्डेच खड्डे, खिंडारी पडल्याने वाहन चालकांचा जीव भांड्यात राहत आहे. रस्त्यात दोन दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. सर्वाधिक अपघात याच रस्त्यावर घडले आहेत. राज्य व  राष्ट्रीय महामार्गाकडे दुरुस्ती करण्याची ओरड आहे.