छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : रस्त्यांचे कोरोना काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची दयनीय अवस्था झाली होती. दरम्यान जिल्हाभरातील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर रस्त्यांचे मजबुतीकरण आणि पुलांची नव्याने बांधणी करणे गरजेचे असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने सरकारला सादर केला होता. त्यातील ९० कामांना १६ एप्रिल २०२२ रोजी शासनाकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान तालुक्यातील मर्जीतल्या कंत्राटदारांना जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामे वाटप करण्यात आली होती. किमान देखभाल दुरूस्तीच्या कालावधीनंतर पाच वर्ष तरी ही कामे सुस्थितीत असणे गरजेचे असताना दोनच वर्षांत रस्त्यांचे व पूलांवरचे मजबुतीकरण ढिसूळ झाले असून त्यांना दुरूस्तीची प्रतिक्षा आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्याची मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यातील ११ आमदारांच्या व एका खासदाराच्या शिफारसीनुसार जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या विकास निधीद्वारे ही कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीकडून कार्यकाळ संपण्यापूर्वीच जिल्हापरिषदेत प्रशासक राजवट सुरू होण्यापूर्वी १७ कोटी ८१ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९० ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण व काही भागात पुलांचे बांधकाम करण्यात येणार होते. कोरोना काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही तालुक्यातील रस्ते आणि पूल वाहून गेले होते. अनेक गावांशी संपर्क तुटला होता. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने डागडुजी करून तात्पुरते मार्ग सुरु करण्यासाठी अहवाल तयार केला होता. रस्त्यांचे मजबुतीकरण आणि पुलांची नव्याने बांधणी करणे गरजेचे असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने शासनाला सादर केला होता. त्यातील ९० कामांसाठी शासनाने १७ कोटी ८१ लाख रूपयांची मंजुरी मिळाली होती.एप्रिल २०२२ मध्ये मर्जीतल्याच कंत्राटदारांना ही कामे देण्यात आली होती. मात्र दोन वर्षात या रस्त्यांचे पार वाटोळे झाल्याने ग्रामस्थांना अंगठेफोड सोसावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामंस्थांच्या तक्रारीवरून प्रतिनिधीने मागील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, फुलंब्री, कन्नड, सोयगाव, वैजापूर, सिल्लोड तालुक्यातील रस्त्यांची पाहणी केली असता ९० कोटी पाण्यात गेल्याचे दिसून आले.
असा आहे रस्त्यांचा लेखाजोखा
जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीने फुलंब्री तालुक्यातील १३ रस्त्यांच्या कामासाठी सर्वाधिक ६ कोटी ४८ लाख निधी मंजूर केला होता.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १६ रस्त्यांच्या कामासाठी ३ कोटी १९ लाख रुपये मंजूर केले होते.
पैठण तालुक्यातील १२ रस्त्यांसाठी २ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता.
गंगापूर तालुक्यातील १० रस्त्यांना १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
सिल्लोड तालुक्यातील ८ रस्त्यांसाठी १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी दिला होता.
सोयगाव तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामासाठी ९३ लाख रुपये निधी दिला होता.
खुलताबाद तालुक्यातील ६ रस्त्यांच्या कामासाठी ९४ लाख रुपये दिले होते.
वैजापूर तालुक्यातील ६ रस्त्यांसाठी १ कोटी ७५ लाख रुपये दिले होते.
कन्नड तालुक्यातील १० रस्त्यांसाठी १ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.