Gautala Forest Tendernama
मराठवाडा

गौताळा अभयारण्य वनक्षेत्राचा वैधानिक दर्जा कोणी बदलला; वन अधिकारी कार्यालय संभ्रमात!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा औट्रम घाट (वन्य जीव) अभयारण्यांतर्गत मौजे चिमणापूरवाडी येथील वनक्षेत्राबाबत मोठी धक्कादायक बाब टेंडरनामाच्या तपासात उघड झाली आहे. काही भूमाफियांच्या सातबारावर बेकायदा नोंद करून सदर जमिनींचे फेरफार देखील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. सदर सरकारी जागेचे चुकीच्या नोंदी घेऊन खाजगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा महसूल विभागाकडून घाट घातला जात आहे.

हा प्रकार सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) व मुख्य वनसंरक्षक व विभागीय वन अधिकाऱ्यांना माहित होऊनही वन विभागातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. महसुल व वन विभागाने चुकीच्या पद्धतीने सातबारावर नोंदी घेतल्याचे मान्य केले आहे; पण त्या नोंदी आता कमी करायच्या कशा यावर गेल्या अनेक वर्षांपासून खल करत केवळ ‘सरकारी’ कार्यवाही केली जात आहे. टेंडरनामाने या गंभीर प्रकरणात सलग आठ दिवस तपास केला असता, त्यात या प्रकरणाची संपूर्ण संचिकाच हाती लागली असता धक्कादायक बाब समोर आली आहे, त्याचा हा लेखाजोखा आज उघड करत आहोत.‌

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, आरआरडी लेटर क्रमांक - २४१ दिनांक २० एप्रिल १३५५ एफ नुसार कन्नड तालुक्यातील मौजे चिमनापूरवाडी येथील सर्व्हे क्रमांक १३ पा. चा गट क्रमांक - ६१ चे ४२. २०७ हेक्टर. आर. हे राखीव वन असल्याची वन विभागात नमुना नंबर - ०१ मध्ये नोंद आहे. तसेच अधिसूचना क्रमांक डबल्यु.एल.पी. - १०८५ / सी.आर.- ७५ / एफ - ५ दिनांक २५ फेब्रुवारी १९८६ अन्वये कन्नड तालुक्यातील मौजे चिमणापूरवाडी येथील कंपार्ट नंबर ९७ चे वनक्षेत्राचा गौताळा औट्रमघाट (वन्यजीव) अभयारण्यात समाविष्ट असल्याची देखील नोंद आहे. सदर क्षेत्र हे छत्रपती संभाजीनगर शहरातील महसूल व वन विभागाच्या विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) यांच्या कार्यालयाच्या अखत्यारीत आहे. त्या अनुषंगाने कन्नड तालुक्यातील मौजे चिमणापूरवाडी येथील सर्व्हे नंबर - १३ पा. च्या वनक्षेत्राची नोंद ही महसुल अभिलेख मध्ये असणे आवश्यक असून, त्याप्रमाणे ७/१२ उतारावर देखील नोंद असणे आवश्यक आहे.

तथापी टेंडरनामा प्रतिनिधीने महसूल विभागातील एका संकेतस्थळावरील कन्नड तालुक्यातील मौजे चिमणापूरवाडी येथील गट क्रमांक-६१ च्या क्षेत्राचे ७/१२ उताराचे अवलोकन केले असता, राखीव वन असलेले वनक्षेत्राचा दर्जा बदलण्यात आल्याचे दिसून येत आहे. जे कोणत्याही नियमात बसत नाही. वनक्षेत्राचा वैधानिक दर्जा बदलून नोंदी घेणे फौजदारी गुन्ह्यास पात्र असल्याचे देखील काही निवृत्त वन अधिकाऱ्यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.‌ यासंदर्भात टेंडरनामाने विभागीय वन अधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता विभागीय वन अधिकाऱ्यांनी वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकार्यांना यासंदर्भात पत्र दिल्याचे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मौजे चिमणापूरवाडी येथील सर्व्हे नंबर - १३ पा. च्या वनक्षेत्राचा महसुल विभागाकडील ७/१२ उतार्यांवर भोगवटादार म्हणून स्थानिक लोकांच्या नोंदी कशाच्या आधारे घेण्यात आलेल्या आहेत, याबाबत महसुल विभागाशी संपर्क साधून, त्याबाबतचे आवश्यक ते दस्ताऐवज प्राप्त करून त्यानुसार कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे विभागीय वन अधिकाऱ्यांनी कन्नड वन्यजीव अधिकाऱ्यांना सुचित केल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे.

कन्नड तालुक्यातील मौजे चिमणापूरवाडी येथील सर्व्हे नंबर - १३ पा. या क्षेत्राची पाहणी करून, सदर क्षेत्राच्या महसूल विभागाकडील ७/१२ उतारेवर भोगवटादार म्हणून स्थानिक लोकांच्या नोंदी कशाच्या आधारे घेण्यात आलेल्या आहेत‌ याबाबत खात्री करावी, असे आदेश देखील विभागीय वन अधिकाऱ्यांनी दिल्याचे तपासात समोर आले आहे. यात मौजे चिमणापूरवाडी येथील.सर्व्हे नंबर-१३ पा. च्या वनक्षेत्राचा वैधानिक दर्जा बदलून या राखीव वनक्षेत्राचा नोंदीमध्ये जाणीवपूर्वक बदल केल्याची किंवा कसे याबाबत शंका व्यक्त करत त्याची खात्री करावी, असे आदेशही वन्यजीव अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कायदा काय सांगतो

कन्नड तालुक्यातील मौजे चिमणापूरवाडी येथील सर्व्हे क्रमांक - १३ पा. गट क्रमांक - ६१ च्या क्षेत्राचा वैधानिक दर्जा बदलून या राखीव वन क्षेत्राच्या नोंदीमध्ये जाणीवपूर्वक बदल केल्याची खात्री झाल्यास संबंधित महसूल विभागातील अधिकारी यांच्या विरूध्द वन अधिनियम १९२७ तसेच वन (संवर्धन) १९८० व वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हे दाखल करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल विभागीय वन अधिकारी कार्यालयात सादर करण्याबाबत विभागीय वन अधिकाऱ्यांनी कन्नड येथील वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे.