छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शिवाजीनगर रेल्वेगेट भुयारी मार्गासाठी रस्ता रुंद करण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडला होता. बुधवारी महापालिका, सार्वजनिक बांधकाम व विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी जागा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. लवकरच येथील मालमत्ताधारकांना मोबदला देऊन येथील बाधित मालमत्ता भूईसपाट करून जागेचा ताबा महापालिकेला दिला जाईल, असे विशेष भूसंपादन अधिकारी वि. भा. दहे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
येथील सात मालमत्ता धारकांसमवेत अधिकाऱ्यांनी जागेची मोजणी केली. हद्दखूना निश्चित करण्यात आल्या. सर्व मालमत्ताधारकांनीही भूसंपादनास सहमती दर्शवली आहे. रेडिरेकनर दरानुसार भूसंपादीत मालमत्तेचा मोबदला दिला जाणार आहे. आमची कोणतीच हरकत नसल्याचे मालमत्ताधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या येथील भूयारी मार्गाचा प्रश्न आता खर्या अर्थाने मार्गी लागला आहे. शिवाजीनगर रेल्वेगेट भूयारी मार्गाबाबत टेंडरनामाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. सातारा-देवळाईतील जनसेवा कृती समिती, जनसेवा महिला नागरी कृती समिती, सातारा-देवळाई खान्देश मित्र मंडळ, संघर्ष सातारा कृती समिती, राजेशनगर नागरी कृती समिती, राजे शिवछत्रपती मित्र मंडळ आदी संघटनांचे पदाधिकारी बद्रिनाथ थोरात, पद्मसिंह राजपुत, असद पटेल, आबासाहेब देशमुख, सोमनाथ शिराने, बाबासाहेब चव्हाण, साहेबराव आदमाने डी. ओ. निकम यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती.
शिवाजीनगर रेल्वेगेट ते देवळाईचौकापर्यंत
रस्त्याच्या उजव्या भागापासून सातारा गट क्रमांक १२४/२ व १३१ मधील रस्त्याचे २४ मीटर रुंदीकरण करण्यासाठी १७७९ चौरस मीटर जागेचे भूसंपादन करावे लागेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले होते. त्यानुसार विशेष भूसंपादन अधिकारी वि. भा. दहे यांनी अत्यंत जलदगतीने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुर करून घेतला. सातारा-देवळाईकरांचा आक्रोश पाहून येथे भूयारी मार्ग गरजेचा आहे आणि तो व्हावा, अशी अधिकाऱ्यांची देखील इच्छा असल्याने भूसंपादनासाठी ६ कोटी ८७ लाख ०९ हजार १६१ इतक्या रकमेची तरतूद सरकारने करून दिली. रेल्वेने देखील दहा कोटीची तरतूद केली असून, २८ जून २०२३ रोजीच ई टेंडर काढण्यात आले आहे. २८ जुलै २०२३ रोजी टेंडर खुले करण्याची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत यशस्वी झालेल्या कंत्राटदाराने ९ महिन्यात भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याची अट टेंडरमध्ये टाकण्यात आली आहे. राज्य सरकार व रेल्वे प्रशासन मिळूण जवळपास ४० कोटी खर्च करून येथे भूयारी मार्गाचे काम केले जाणार आहे.