Aurangabad Tendernama
मराठवाडा

जालना ते पुलगाव प्रवास अवघ्या 5 तासांवर; 3000 कोटींतून होणार मार्ग

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : जालना ते पुलगाव (वर्धा) या राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प विकास) आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या दोन महिन्यात त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर अंदाजपत्रकासह केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित वरिष्ठ कार्यालयाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळताच तातडीने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून २०२४ पर्यंत रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करून रस्ता सुसाट केला जाणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एम. बी. पाटील यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सद्यस्थितीत या ७ मीटर रूंदीच्या रस्त्यावरून जालना ते पुलगाव प्रवासासाठी ८ तास लागतात. १० मीटर रूंदी झाल्यानंतर ५ तासात २८५ किलोमीटरचा प्रवास होणार असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील जालना, बुलडाणा, अमरावती, वाशिम आणि वर्धा या पाच जिल्ह्यातील पाच लोकसभा मतदार संघातून हा मार्ग जातो. याच रस्त्यावर राजमाता जिजाऊ यांचे सिंदखेडराजा हे जन्मस्थान, जालन्याचे ऐतिहासिक दत्तमंदीर तसेच आयर्न मार्केटचा खजाना जालना, मेहकरचे ऐतिहासिक बालाजी मंदीर, लोणार सरोवर तसेच दत्त जन्मस्थान, कारंजा लाड, सुलतानपुर , डोणगाव, मालेगाव जहाॅगीर, सेलुराजा, तळेगाव, देवगाव, दशासर, तेलगाव व भारतातील पहिला दारूगोळा बनवण्याचा सरकारी कारखाना असलेले पुलगाव आदी ऐतिहासिक वारसास्थळे व अनेक मोठी गावे आणि तालुके या मार्गावर येतात.

जालना-पुलगांव एमबीएच -१२ हा जुना राज्यमार्ग यापूर्वी राज्य सरकारच्या अखत्यारित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. एकूण २८५ किलोमीटर लांबी आणि ७ मीटर रूंदी असलेल्या या रस्त्याच्या समांतरच समृद्धी महामार्गाचे काम गेली कित्येक वर्ष सुरू असल्याने या अरूंद रस्त्यावर वाहतूकीचा मोठा ताण पडल्याने रस्त्याची पार चाळणी झाली होती. या नादुरुस्त मार्गावरून साधी बैलगाडी देखील चालु शकत नसल्याबाबत २७ जुन २०१९ मध्ये लोकसभेत वर्धाचे खा. रामदास तडस यांनी प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले होते, त्याला जालना जिल्ह्याचे खा. रावसाहेब दानवे, बुलढाण्याचे खा. प्रतापराव जाधव, अमरावतीच्या खा. नवनीत राणा कौर, वाशिमच्या खा. भावना गवळी यांनी अनुमोदन दिले होते.

गडकरींचे आश्वासन; काम प्रगतीपथावर

त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रश्नाला प्रत्यक्ष लोकसभेत तडस यांच्या प्रश्नाला उत्तर देत राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेला जुना एमबीएच-१२ हा राज्यमार्ग ७५३ सी या क्रमांकाने घोषित केला. त्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे तो वर्ग करण्यात आला.आणि सद्य: स्थितीत असलेला २८५ मीटरचा ७ मीटर रूंद रस्ता १० मीटर रूंदीकरण करून डांबरी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

८५ कोटीत रस्ता दुरूस्ती

गडकरींनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करुन व सोबतच या महामार्गाचा आवश्यक विकास म्हणुन घोषित केलेले आश्वासन पुर्ण करत त्या अनुषंगाने नव्याने निर्माण झालेल्या जालना - पुलगांव या राष्ट्रीय महामार्गाच्या अतिशय खराब झालेल्या २११ किलोमीटरची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात टेंडर प्रसिद्ध करून ८५ कोटी रूपये मंजुर करत कंत्राटदार व्ही. पी. शेट्टी यांच्या अल्टीस होल्डींग यांच्या मार्फत खराब रस्त्याची ९ महिन्यात दुरूस्ती करण्यात आली.

भारतमाला परियोजनेत समावेश

गडकरींनी लोकसभेमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार हा मार्ग ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी भारत सरकारच्या राजपत्रानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ -सी जालना - पुलगांव या २८५ किमी चा मार्ग म्हणून अधिसुचीत करण्यात आला. अधिसुचना निघाल्यानंतर रस्त्याची खराब परिस्थीती लक्षात घेता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ने तातडीने दुरुस्ती केल्यानंतर या महामार्गाचे पुढील टप्प्यात केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनामध्ये समावेश करण्यात आला.

गडकरींचे बारकाईने लक्ष

रस्ता विकसित करण्याकरिता तसेच या महामार्गाचे नुतनीकरण करण्याकरिता रस्त्याच्या पुढील विकासकामाकरिता गडकरी यांनी बारकाईने लक्ष देत रस्त्याचा पुढील दर्जा कसा वाढवता येईल आणि वाहनधारकांची गैरसोय कशी टाळता येईल, यावर लक्ष केंद्रीत करत रस्त्याचे दोन्ही बाजुने तीन मीटर रूंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला. यासाठी भोपाळच्या आरकाॅन कंपनीमार्फत या संपुर्ण रस्त्याचा अत्याधुनिक यंत्रनेणे डीपीआर तयार केला. सदर डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात असुन दोन महिन्यात त्याचा अहवाल भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद विभागाकडे त्याचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर तातडीने अंदाजपत्रक तयार लवकरात लवकर केंद्र सरकारकडे वित्तीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याला मंजुरी मिळताच या मार्गाचे टेंडर काढून दहा मीटर रूंदीकरण करून डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी अंदाजे तीन हजार कोटीतून हा राष्ट्रीय महामार्ग सुसाट केला जाणार आहे.

या अधिकाऱ्यांचा सुरू आहे सातत्याने पाठपुरावा

अतिशय कमी वेळेत हा महामार्ग कशा पद्धतीने सुसाट बनवता येईल यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे नागपुर विभागाचे क्षेत्रीय अधिकारी राजू अग्रवाल, औरंगाबाद विभागाचे प्रकल्प संचालक डाॅ. अरविंदराव काळे, प्रबंधक एम. बी. पाटील, वरिष्ठ अभियंता भाऊसाहेब कसबे, अनिकेत आणि राहूल पाटील हे दिवसरात्र मेहनत घेत आहेत.