Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सोनेरी महाल परिसरात पायाभूत सुविधांचे काम जोमात; पर्यटकांना दिलासा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत राज्यातील ३८७ स्मारकांपैकी ७५ स्मारकांवर पर्यटकांसाठी जनसुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. यात छत्रपती संभाजीनगरातील सोनेरी महल स्मारकाचा समावेश करण्यात आला असून, येथील प्राचीन वस्तूसंग्रहालयातील तोफा, तलवारी, बंदूक, ढाल आणि इतर ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधां मिळाव्यात यासाठी एक कोटी रूपये खर्च करून जनसुविधा केंद्रात पुरूष-महिला स्वच्छतागृह, शिशू काळजी केंद्र, अल्पोपहार केंद्र, इत्यादी सोयी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. सदर काम हे दिल्ली येथील डाॅ. बिंदेश्वर पाठक यांच्या सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने येथील प्रकल्प व्यवस्थापक मिश्रा यांना संपर्क केला असता सदर प्रकल्पाचे बांधकाम हे बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा ( B.O.T.) या तत्वावर ३० वर्ष कंपनीकडे राहणार असून राज्यातील ७५ स्मारकांवर याच पध्दतीने प्रकल्पाची कामे या सेवाभावी संस्थेला मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

वास्तूरचनेचा उत्तम नमुना असलेला सोनेरी महाल इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची खोटी आश्वासने आणि अधिकाऱ्यांची उदासिनता यामुळे पर्यटकांना अधिक आकर्षक करण्यासाठी या ठिकाणी फारशा सोयी सुविधांचा अभाव पाहायला मिळतो. दोन वर्षांपूर्वी लाइट ॲण्ड साउंड शो सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा निधीअभावी मागे पडली.‌ तसेच महालाचे मूळ सौंदर्य जपत देखभाल दुरुस्तीसह नूतनीकरण व पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी काही कामे हाती घेण्याचे नियोजन कागदावरच राहीले. सोनेरी महाल ही ऐतिहासिक वास्तू सातारा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आहे. बुंदेलखंडातील सरदार पहाडसिंग यांनी या महालाची निर्मिती केली. १६५१ ते १६५३ या काळात हा महाल बांधला गेला असावा, असे मानले जाते. निसर्गसंपन्न परिसरात उभारलेल्या महालाचे विविध पैलू आहेत. मुबलक पाण्याची सोय, कारंजी, बगीचा आणि भक्कम तटबंदीचा सोनेरी महाल कौतुकाचा विषय आहे.

सध्या महालाच्या वरील भागात राज्य पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तर खालच्या मजल्यावर प्राचीन वस्तूसंग्रहालय आहे. तोफा, तलवारी, बंदूक, ढाल आणि इतर ऐतिहासिक वस्तू पर्यटकांना पाहण्याची सुविधा आहे. तर महाल परिसरात कारंज्यांची जागा अजूनही अस्तित्वात आहे. यात प्राचीन रूप जपण्यासाठी घडीव दगड बसवल्यामुळे महालाच्या मूळ सौंदर्यात आणखी भर पडली आहे. वास्तू पाहिल्यानंतर पर्यटकांना प्राचीन काळाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. दरम्यान, अधिकाधिक पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी या ठिकाणी लाइट ॲण्ड साउंड शो सुरु करण्यात येणार असल्याची व महालाचे मूळ सौंदर्य जपत देखभाल दुरुस्तीसह नुतनीकरण व पर्यटकांच्या सोयी सुविधा उभारणे, उद्यान विकास यासह अन्य विकासकामे करण्याचे नियोजन पुरातत्व विभागाने केले होते.‌ या विकास प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी निधी उपलब्धतेचे आश्वासन दिले होते. याबाबत त्यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना  प्रस्तावही सादर केला होता. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र यावर काहीच झाले नव्हते.

छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या सोनेरी महलच्या दुरवस्थेवर "टेंडरनामा"ने वृत्तमालिका प्रकाशित करून पुरातत्व खात्यासह राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांचे लक्ष वेधले होते. यासंदर्भात विधानसभा सदस्य संग्राप थोपटे यांनी देखील लक्षवेधी सूचना मांडली होती. दरम्यान मुनगुंटीवार यांनी राज्यातील ३८७ स्मारकांच्या ठिकाणी क्युआरकोडसह त्या त्या स्मारकाची पुर्ण माहिती असणारे फलक लावल्याची माहिती दिली. यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना त्या स्मारकाची माहिती मिळत आहे. गड, किल्ले, स्मारकांची पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या मदतीने शिवनेरी, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्यांच्या संवर्धनाचे काम देखील प्रगतीपथावर असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेंडरनामा प्रतिनिधीकडे माहिती देताना सांगितले. याच विविध उपक्रमातून राज्यातील गड, किल्ले व स्मारकांचे जतन संवर्धनासोबतच पर्यटकांना पायाभुत सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा यात समावेश करण्यात आला.

दिल्ली येथील डाॅ. बिंदेश्वर पाठक यांच्या सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात राज्यातील ३८७ स्मारकांपैकी ७५ स्मारकांलगत जनसुविधा केंद्रांची कामे सुरू झालीत. यात छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक सोनेरी महल स्मारकाचा समावेश केल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. यात कंपनी शंभर कोटीहुन अधिक निधी बीओटी तत्त्वावर खर्च करत आहे.