औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद स्मार्ट सिटीकडून मेहमूद गेटच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ऐतिहासिक दरवाज्याचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी स्मार्ट सिटी आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून थर्ड पार्टी ऑडिट करून घेत आहे. या अनुषंगाने शुक्रवारी स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांसोबत आयआयटी टीमने मेहमूद गेटची पाहणी केली.
औरंगाबाद मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी मेहमूद गेटच्या संवर्धन करत आहे. या दरवाज्याची अवस्था खूप खराब झाल्यामुळे ह्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यासाठी तज्ञ सल्लागार म्हणून नंदादीप एजन्सीचे महेश वर्मा यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचा देखरेखीखाली संवर्धनाचे कार्य सुरू आहे. यासाठी आयआयटीच्या टीम सोबत स्मार्ट सिटीच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, प्रकल्प सहयोगी किरण आढे व प्रकल्प सल्लागार यांनी पाहणी केली.
शुक्रवारी पाहणी करत असताना आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ घोष यांनी सागितले की जेवढं शक्य तेवढं जुनी रचना जपण्याचे प्रयत्न करावे आणि सिमेंट व स्टीलचे वापर टाळावे. गेटची पाणचक्की कडेची बाजू मजबूत आहे आणि तेथे जुना प्लास्टर काढून नव्याने चुनाचा प्लास्टर लावण्यात यावा असे ते म्हणाले. त्यांनी गेटच्या खालच्या भागाला रेट्रोफिटिंग करून गेटच्या भार वाहण्यासाठी मजबूत करण्याचा सल्ला दिला. प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी ह्यांनी सांगितले की त्यांचा सल्ल्यानुसार कार्य केले जाईल. स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या देरेखीखाली होत असलेल्या संवर्धनाचे कार्य जुलै अखेर पर्यंत पूर्ण होईल, असे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सांगितले.