Petrol Pump Tendernama
मराठवाडा

'त्या' पेट्रोल पंप चालकाकडून मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली; पंप चालकाविरोधात तक्रार

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा - भोकरदन मार्गावरील पिंपळगाव रेणुकाई येथील गट क्र. ८ मधील मंगेश भारत पेट्रोलियममार्फत गरजवंत शेतकरी व वाहनधारकांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या पंप चालकाकडून पंप चालवताना टेंडरमधील अटी शर्तींचा व केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याचा आरोप संदीप देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीतील भारत पेट्रोलियम मंत्रालय तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर नगर येथील विभाग अधिकाऱ्यांमार्फत पंपाची चाचपणी देखील सुरू केली असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पण पेट्रोलशिवाय गत्यंतर नसलेल्यांना ते खरेदी केल्यावाचून दुसरा काही पर्याय देखील नाही. पण पेट्रोल किंवा डिझेल घेणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल पंपावर टेंडरमधील अटीशर्तीनुसार पेट्रोलपंप चालवायला देताना काही पायाभूत मूलभूत सुविधा मोफत देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पेट्रोलपंप चालकांना त्या सुविधा ग्राहकांना देणे अपेक्षित आहे.

'या' आहेत मार्गदर्शक सूचना

पेट्रोलियम मंत्रालयाच्या मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइन्सनुसार काही नियम आखून देण्यात आले आहेत. याअंतर्गत पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरल्यानंतर वाहनाच्या टायरमधील हवा भरण्यासाठी अथवा हवा चेक करण्यासाठी एक मशीन पेट्रोल पंपाच्या बाहेर येणाऱ्या मार्गावर एका कोपऱ्यात ठेवणे बंधनकारक आहे. याठिकाणी ग्राहकांना वाहनाच्या टायरमध्ये मोफत हवा भरूण देणे बंधनकारक आहे. पेट्रोल पंप चालकाने वाहनचालकांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करून देवी असा नियम आहे. त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही. 

पेट्रोल पंपावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असणे किंवा ती व्यवस्था करून देणे पेट्रोल पंप मालकासाठी अनिवार्य आहे. पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक पिण्याच्या पाण्याची मागणी करू शकतात आणि ते उपलब्ध करून देणे पंप मालकाचे कर्तव्य आहे. यासाठी पेट्रोल पंपावर मालकाने आरओ किंवा वॉटर प्युरिफायर लावणे अथवा फ्रीज ठेवणे नियमानुसार बंधनकारक आहे. पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे पंप मालकाची जबाबदारी आहे.

पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी शौचालयाची सुविधा असणे अनिवार्य आहे. ही सुविधा ग्राहकांसाठी मोफत असावी यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असा नियम आहे. पंप मालकाने याची काळजी घेणे बंधनकारक आहे. यासोबत पेट्रोल पंपावरील शौचालये स्वच्छ आणि सुयोग्य असावीत. यात कोणत्याही प्रकारची अडचण ग्राहकांना येत असेल तर त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे आणि पेट्रोल पंप मालकाने त्यावर स्पष्टीकरण देणे कर्तव्य आहे.

ग्राहकांना आपत्कालिन परिस्थितीत कुणाला फोन करायचा असेल तर पेट्रोल पंपावर टेलिफोनची व्यवस्था असणे पेट्रोल पंप मालकांना बंधनकारक आहे. पेट्रोल पंप सुरू करण्यासोबतच पंप मालकाला एक फोन क्रमांक देखील रजिस्टर करावा लागतो. जेणेकरून पेट्रोल भरण्यासाठी येणारे ग्राहक त्याचा वापर करू शकतील.

ग्राहकांना फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच प्राथमिक उपचार कीट पेट्रोल पंपावर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. यात प्राथमिक उपचारासाठीची काही औषधे, उपकरणे यांचा समावेश असतो. प्रत्येक पेट्रोल पंप मालकाला ही सुविधा मोफत देणे अनिवार्य आहे. अचानक कोणताही अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात दाखल करण्यापुर्वी या औषधांचा उपयोग होऊ शकतो.

पेट्रोल पंपावर ग्राहकांना जाणाऱ्या पेट्रोलची गुणवत्ता चाचणी करण्याचाही ग्राहकाला अधिकार आहे. यात ग्राहकांना गुणवत्तेसोबतच प्रमाणाचीही तपासणी करण्याचा अधिकार आहे. याशिवाय पेट्रोल पंपावर आणखी काही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोष्टी उपलब्ध असणे अनिवार्य आहे. यात आग विझवण्यासाठी लागणारी उपकरणे जसे की फायर सेफ्टी स्प्रे, रेतीने भरलेल्या बादल्या इत्यादी.

येथील पंपावर यापैकी एकही सुविधा मिळत नसल्याचा आरोप संदीप देशमुख यांनी केला आहे. त्यांच्यामते सदर पेट्रोल पंपाला साधारणतः अकरा वर्षांपूर्वी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ने मान्यता देताना पंपचालक नारायण कडुबा तेलंगरे यांना पेट्रोलियम मंत्रालयाच्या मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइन्सनुसार काही नियम आखून देण्यात आले होते. त्यांनी पेट्रोलपंपाची तपासणी होऊन मान्यता मिळेपर्यंत गाईडलाईन्सनुसार सर्व पायाभूत व मूलभूत सोईसुविधायुक्त उभ्या करत पंपाची उभारणी केली. मात्र मान्यता हातात पडताच त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा ग्राहकांना देण्यात येत नाही.

असे आहेत आरोप

● पेट्रोल भरताना येथील कर्मचारी ग्राहकांना झिरो मशीनवर म्हणजे झिरो दाखवत नाही तसेच बिल देत नाहीत. स्वच्छतागृहाचे तीनतेरा वाजले असून पिण्याचे पाणी,  हवा भरण्याची सुविधा केवळ देखावा ठरत आहेत. प्रत्यक्षात या सर्व सुविधा बंद असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. 

● भारत पेट्रोलियम मंत्रालयाच्या डिसिप्लिन गाईडलाईननुसार पेट्रोलपंपावर तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार नोंदणी रजिस्टर ठेवणे बंधनकारक असताना ते उपलब्ध होत नाही. यासंदर्भात जाब विचारल्यास कर्मचारी दादागिरीची भाषा करतात. तक्रार केली तर ऑनलाईन पैसे घेण्यास नकार देत ग्राहकाची अडवणूक करतात. अग्निशमन व्यवस्थेची सुद्धा पेट्रोल पंपावर व्यवस्था नाही.