Aurangabad Tendernama
मराठवाडा

लोकप्रतिनिधींच्या नुसत्याच विकासाच्या गप्पा;दीड वर्षांपासून पुलाची

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : सिल्लोड (Sillod) आणि भोकरदन (Bhokardan) या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या हिसोडा ते जळकी बाजार मार्गावरील पूल आणि त्यावरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे वाहुन गेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहुन गेलेल्या पुलाच्या दुरूस्तीकडे सरकारी बजेट नसल्याचे म्हणत भोकरदन क्षेत्रातील अभियंत्यांनी कानाडोळा केला. आता पुलाचा नाला झाल्याने सध्या मुसळधार पावसाळा सुरू असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने चिखलाची गंगा वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.

भोकरदन आणि सिल्लोड या दोन तालुक्याला जोडणाऱ्या हिसोडा येथून जवळ असलेल्या जळकी बाजार (ता. सिल्लोड) येथे जाण्यासाठी पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुख्य मार्गावरील रायघोळ नदीवर ३० लाख रूपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. जळकी बाजार, खुपटा, शिवणामार्गे खान्देशमध्ये जाण्यासाठी हिसोडा परिसरातील नागरिकांसाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावरील रायघोळ नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. नव्याने पुल झाल्याने या भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांसह प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला होता. परंतु, गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायघोळ नदीला पूर आला आणि नव्याने बांधलेला पूल वाहून गेला. त्यामुळे सां.बां.विभागाने या मार्गावरील चारचाकी वाहनांची वाहतूक बंद केली आहे. मात्र पुलाच्या दुरूस्तीकडे कानाडोळा केला आहे. तेव्हापासून दुचाकीचालक जीव मुठीत घेऊन नदीपात्रातून वाहने काढत आहेत. शेतकरी, विद्यार्थी व पादचारी नागरिकही कसरत करीतच रस्ता पार करीत आहेत.

नेमकी काय आहे अडचण

हिसोडा ते जळकी बाजार रस्ता पावसाच्या सुरूवातीलाच खड्डेमय व जलमय झालेला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व त्यात पाणी साचल्याने वाहनचालकाचे अन् वाहनाचेही कंबरडे मोडले आहे. रस्ता मधोमध अनेक ठिकाणी नळकांडी पुलांचे देखील बांधकाम तुटलेले असल्याने तसेच या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात शेतजमीन असल्याकारणाने शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी वर्ग व शालेय विद्यार्थी, चारचाकी व दुचाकी वाहनांची नेहमी ये-जा असते. तसेच परिसरातील शिवणा, पिंपळगाव रेणुकाई, जळकी बाजार या मोठ्या बाजारपेठा असून नेहमी शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची बाजारहाटसाठी रस्त्यावर वर्दळ पहावयास मिळते. त्यामुळे या रस्त्यावर येण्या-जाण्याकरिता समस्या निर्माण होत आहे.

पुलाचे निकृष्ट बांधकाम; ग्रामस्थांचा आरोप

या रस्त्यावर २०१५-१६ या आर्थिक वर्षात लाखो रूपये खर्च करून आरसीसी पुलाचे काम करण्यात आले होते. त्यानंतर २०२१ दरम्यान नदीला आलेल्या पुरामुळे पुलच वाहुन गेला. सां.बां. विभागातील खाबुगिरीपणामुळे या पुलाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले असल्याने अल्पावधीतच अशी घटना घडल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. नंतर कित्येकदा सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडे मागणी केली. परंतु संबंधित राजकीय नेते, कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी आपले खिसे आधीच गरम करण्याचे काम केल्याने देखभाल-दुरूस्तीच्या कालावधी आधीच पुल वाहुन गेल्याने दुरूस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवल्यास 'वरकमाई'चे बिंग फुटु नये म्हणुन पुलाच्या दुरूस्तीचा प्रस्तावच सरकारकडे पाठवला नसल्याची या भागात चर्चा आहे.

लोकसहभागातून मुरूम टाकुनही 'जैसे थे'

हिसोडा ते जळकी बाजार गावकऱ्यांच्या लोकसहभागातून मुरूम टाकून रस्ता दुरूस्त केला. मात्र या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने एका पावसात रस्त्याची अवस्था “जैसे थे” झाली. त्यामुळे शेतकरी वर्ग व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कुठे गेल्या राज्य-केंद्र सरकारच्या योजना?

विशेष म्हणजे गाव पातळीवर नादुरूस्त पुल आणि रस्त्यांच्या विकास कामासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक, पंतप्रधान ग्रामडक योजना, नाबार्ड आणि जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनातून प्रत्येक वर्षी निधी दिला जातो. एकंदरीत अधिकारी व कंत्राटदार यांची पैसे खाण्यातच या योजनांचा लाभ होत असल्याचे या पुलाच्या अवस्थेवरून दिसून येत आहे. परिणामी याचा त्रास परिसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी, महिला यांना होत आहे.

हे भ्रष्ट अधिकारी आहेत जबाबदार

हिसोडा-जळकी बाजार मार्गावरील सदरील पुलाची हद्द ही भोकरदन तालुक्यात येते. विशेष म्हणजे या तालुक्याचे खासदार रावसाहेब दानवे हे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत. जालना जिल्ह्याचे विकासाचे महामेरू त्यांना समजले जाते. असे असताना भोकरदन येथील सां.बां. विभागाचे कनिष्ठ अभियंता नंदकुमार घुले, उप अभियंता जी.यु. नागरगोजे आणि कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी बहुपयोगी या पुलाकडे लक्ष देऊन काम केले नाही.

आता अधीक्षक आणि मुख्य अभियंता कारवाई करणार काय?

या पुलाच्या दुरूस्तीबाबत अनेकदा या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अवगत केले आहे. मात्र दुरुस्तीचे नावावर केवळ थातूरमातूर काम केले आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यनिष्ठ समजले जाणारे अधिक्षक अभियंता संपतराव भगत, मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांनी येथील पुलाच्या बांधकामापासुन तर आजवर केलेल्या देखभाल दुरूस्तीचा लेखाजोगा घेऊन चौकशी करतील का? असा प्रश्न येथील गावकऱ्यांनी केला आहे.

लोकप्रतिनिधींच्या फक्त विकासाच्या बोंबा

औरंगाबाद जिल्ह्यात येणाऱ्या सिल्लोड तालुक्यासाठी इम्तियाज जलील आणि डाॅ. भागवत कऱ्हाड दे दोन खासदार आहेत. विशेष यात कऱ्हाड हे केंद्रिय अर्थमंत्री आहेत. जलील देखील विविध समित्यांवर आहेत. दुसरीकडे जालना जिल्ह्यात येणाऱ्या भोकरदन तालुक्याचे खा. रावसाहेब दानवे आहेत. ते देखील केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत. भोकरदन तालुक्याचे संतोष दानवे हे रावसाहेब दानवेंचे सुपुत्र आहेत. या दोन्ही तालुका परिसरात सर्वच अशा राजकीय पक्षांचे मोठमोठे प्रतिनिधींचे वास्तव्य आहेत. असे असताना सिल्लोड आणि भोकरदन तालुक्यातील एक नव्हे, तर अशा अनेक पुल आणि रस्त्यांची वाट लागलेली आहे. या दोन्ही तालुक्यात पक्के रस्ते बांधकाम न होण्याचे कारण काय? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. हे रस्ते आणि पुलांच्या खड्डेमय अवस्थेकडे पुर्नबांधकामाकडे स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नाही. फक्त विकासाच्या बोंबा मारतात.