Mhaismal Tendernama
मराठवाडा

वेरूळ, म्हैसमाळवर पर्यटन विभाग प्रसन्न; एवढे कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : खुलताबाद (Khultabad) तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे म्हणून ओळख असलेल्या वेरूळ (Verul), म्हैसमाळ (Mhaismal), सुलीभंजन (Sulibhanjan) येथे विविध विकास कामांसाठी राज्याच्या पर्यटन विभागाने (Tourism Department) एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना दिली आहे.

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन येथील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी आमदार चव्हाण सातत्याने पाठपुरावा करत होते. यासंदर्भात त्यांनी 24 डिसेंबर 2021 रोजी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन सदरील ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. राज्याच्या पर्यटन विभागाने 29 मार्च 2022 रोजी पर्यटन विकास योजना 2021-22 अंतर्गत नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सदरील ठिकाणी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

यामध्ये वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर भक्त निवास परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लाख, वेरूळ येथील भक्त निवास परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लाख रुपये, सुलिभंजन येथे दत्त मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी १० लाख रुपये, म्हैसमाळ येथे येणार्‍या भाविकांसाठी स्वयंपाक घराचे शेड बांधकाम करण्यासाठी १० लाख रुपये, म्हैसमाळ येथील मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या येळगंगा नदीवर घाट बांधकाम करण्यासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

म्हैसमाळ येथे भाविकांच्या वाहनासाठी वाहन तळ तयार करण्यासाठी १० लाख रुपये, वेरूळ येथील वेरूळ महामार्ग ते रामदास पाटील यांच्या घरापर्यंत सी.सी.रोड तयार करण्यासाठी १० लाख रुपये, वेरूळ येथील ज्ञानेश्वर महाराज मठ ते लक्ष्मी विनायक मंदिरापर्यंत सी.सी.रोड तयार करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 31 जानेवारी 2022 रोजी सुलीभंजन रस्त्यासाठी देखील पर्यटन विभागाने एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता. यासाठी देखील आमदार चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लेणी परिसरात देखील मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी चव्हाण यांनी पर्यटन राज्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार याठिकाणी पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे आणि छत्रीचे बांधकाम करण्यासाठी १० लाख रुपये, याच लेणीजवळ प्रेक्षणीय स्थळाचे बांधकाम करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.