Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : संरक्षित गौताळा औट्रम घाट अभयारण्यात बेकायदा जलमिशन योजनेचा घाट

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : वन कायद्याचे खुलेआम उल्लंघन, वन विभागाच्या संरक्षित जंगलात विनापरवानगी खुलेआम जनरेटर लाऊन गृव्हकटींग मशीनने अवैध खोदकाम करून केंद्र सरकारच्या जलमिशन योजनेंतर्गत पाइपलाइन टाकण्यात आल्याची घटना पुढे आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य वन परिक्षेत्रातील चिमनापूर वनक्षेत्रात ही घटना घडली आहे. 

औट्रम घाटातील कन्नड तालुक्यातील मौजे चिमणापूर अभय आरण्यात कन्नड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने बेकायदा जलमिशन योजनेंतर्गत पाइपलाइनसाठी चर खोदला. एका वनपालाने केलेल्या पाठपुराव्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एवढे होऊनही वन विभागाचे  अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा योजनेचे काम सुरू असल्याचे मान्य केले आहे; पण त्यावर कारवाई करायची कुणी, यावर गेल्या सात महिन्यांपासून खल करत केवळ ‘सरकारी’ कार्यवाही केली जात आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मौजे चिमणापूर येथील कंपार्टमेंट नंबर-९७ मधील राखीव वनक्षेत्रातून केंद्र शासनाच्या जलमिशन पाणी पुरवठा योजने अंतर्गत येथून कन्नड येथील ग्रामीन पाणी पुरवठा उप विभागामार्फत चिमनापूर तलाव ते उंबरखेडा येथे पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरतील एका खासगी ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या ठेकेदाराने वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता, जंगलातून पाइपलाइन  टाकण्यासाठी जनरेटरने गृव्ह कटिंग मशीनद्वारे खोदकाम केले आहे. उंबरखेडा येथे भरपुर गायरान जमीन असताना तेथे विहिर न खोदता केवळ अंदाजपत्रकातील वाढीव रक्कम खर्च करण्यासाठी लांबचे अंतरात काम केले जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

स्थानिक वन कर्मचार्‍यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी विभागीय वन अधिकाऱ्यांना तसेच सहाय्यक वन्य जीव रक्षक यांना घटनेची माहिती दिली. त्यावर गौताळा वनपरिक्षेत्रातील सहाय्यक वन्यजीव रक्षक, तसेच तपोवन, चिमणापूर, निंभोरा, ब्राम्हणी बिकातील वनपाल व वनरक्षकांनी काही पंचासमक्ष ११ जानेवारी २०२४ रोजी पंचनामा केला. त्यात मौजे चिमणापूर येथील कक्ष क्रमांक-९७ मध्ये खोकडबर्डी परिसरात कोणीतरी अज्ञात व्यक्तिंनी मशिनच्या सहाय्याने पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदकाम करून जागोजागी बुजवण्यात आल्याचे निदर्शनास आले.सदर घटनेचा पंचनामा हा पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आला होता. यात अतिक्रमण क्षेत्रातील व धरणाच्या कमी झालेल्या पाण्याच्या ठिकाणी डीझेल गृव्ह कटिंग मशीनच्या सहाय्याने पाइपलाइन टाकण्यासाठी ६३७ मीटर लांबीत ३ फुट रूंद व ३.५ फुट खोलीत खोदकाम करून जागोजागी नाली बुजवलेल्या अवस्थेत कर्मचाऱ्यांना दिसून आली.सदर कर्मचाऱ्यांनी खोदकाम थांबवून जनरेटर, पाइप व पाइप फिट करायचे मशीन जप्त केले. शिवाय संबंधित अज्ञात व्यंक्तिविरूध्द वन विभागाची परवानगी न घेता राखीव वनक्षेत्रात खोदकाम केल्याने आयएफए  १९२७ कलम (डी) (जी) चे वन्यजीव संरक्षण अधिनियमनचे कलम २७, २९ वनसंवर्धन १९८० चे उल्लंघन केल्याबद्दल सहायक वनसंरक्षक यांनी गुन्हा देखील नोंदवला होता. कारवाईचा अहवाल मुख्य वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.

अधिकारी विरुद्ध कर्मचारी

गौताळा अभय आरण्यातील चिमणापूर नियत क्षेत्रात विना परवाना पाइपलाइन करताना जप्त केलेले साहित्य वापस द्या म्हणत तक्रारदार तथा वनपाल पी.एम.बरडे यांना धक्काबुक्की केल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान त्यांना छत्रपती संभाजीनगरातील रूग्णालयात देखील उपचारासाठी दाखल करावे लागले होते. इतके गंभीर प्रकरण असताना गत सात महिन्यांपासून दोषींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यास वनाधिकाऱ्यांनी चालढकल केल्याचे लक्षात येताच वनपाल पी.एम.बरडे यांनी मुख्य वनसंरक्षकाकडे दाद मागितली त्यात त्यांनी मौजे चिमणापूर येथील वनक्षेत्रात केलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाइपलाइनच्या व विहिरीचे काम करत असताना वन कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा कामे करण्यास प्रोत्साहन देणार्या सहाय्यक वन अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक महसुल अधिकारी व कन्नड येथील ग्रामीन पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता तसेच ठेकेदार व उंबरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्याबाबत अर्ज दिला.

मात्र वरिष्ठांकडून देखील कार्यवाही होत नसल्याने त्यांनी यानंतर संपूर्ण प्रकरण मुंबई येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक  यांच्यापर्यंत पोहोचले. यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी कार्यवाहीचा अहवाल पाठवण्याबाबत कळविले. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी अहवाल देण्यासही टाळाटाळ केली. यानंतर बरडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा तंबू ठोकताच अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन देत बरडे यांना उपोषणापासून परावृत्त केले आता आठ दिवसांत वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा उपोषणास बसणार असा इशारा बरडे यांनी मुख्य वनसंरक्षक यांना दिला आहे.

काय म्हणतात तक्रारदार

येथील जंगलात वाघ व बिबट्यांसह इतर अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे येथे जनरेटर व यंत्राच्या सहाय्याने खोदकामाच्या आवाजामुळे वन्य प्राण्यांना धोका आहे.  वनपरिक्षेत्रातून भेदरून ते आसपासच्या गावात जाण्याची शक्यता शक्यता नाकारता येत नाही.वन कायद्याचे उल्लंघन करून संबंधित ठेकेदार व कन्नड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता आता वरिष्ठ वन अधिकार्‍यांना हाताशी धरून परवानगी  मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या सात महिन्यांपासून वनाधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी उपोषणास बसल्यानंतर आता कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जर कारवाई झाली नाही, तर मी पुन्हा उपोषणास बसेल.

- पी. एम. बरडे वनपाल