Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : शरणापूर-साजापूर सुसाट! असा होणार चकाचक बायपास

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शरणापूर-साजापूर हा प्रवास आता अतिशय सुसाट वेगाने होणार आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित होते. गेल्या काही वर्षात या बायपाससाठी अनेकदा टेंडर निघाले  होते. मात्र कधी महावितरण कंपनीच्या विद्युत खांबांचा अडथळा तर कधी टेंडर रक्कम आणि प्रत्यक्षात रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असल्याने कंत्राटदाराचा नकार अशा चक्रव्यूहात हा महत्त्वाचा बायपास रखडला होता.

यासंदर्भात टेंडरनामाने सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करून सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.‌ अखेर याबायपास रस्त्याचे काम ५० % मार्गी लागले असून लवकरच हा बायपास वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे. या बायपासचे काम पूर्ण होण्याआधीच पर्यटक व नागरिक सेल्फीचा आनंद लुटत आहेत. या चारपदरी महामार्गामुळे एकीकडे सोलापूर-धुळे आणि दुसरीकडे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ही दोन राष्ट्रीय महामार्ग  एकमेकाच्या जवळ येणार आहेत. शिवाय उद्योग, व्यवसाय, पर्यटन अशा विविध क्षेत्रांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. एकीकडे एनएच-५२ धुळे-सोलापूर आणि दुसरीकडे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या गंगापूर तालुक्यातील शरणापूर-करोडी-साजापूर या वाळूज-पंढरपूर उद्योगनगरीला जोडणाऱ्या महत्वाच्या मुख्य बायपास रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.या बायपास रस्त्याचे काम व्हावे यासाठी टेंडरनामा प्रतिनिधीने थेट राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर सगळ्यांना या बायपासचे महत्व कळाले. त्यांनी देखील टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर  सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांसह थेट मुख्य अभियंत्यांना प्रश्न उपस्थित केले होते.

यासंदर्भात खा. इम्तियाज जलील यांना प्रतिनिधीने प्रश्न उपस्थित करताच त्यांनी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून, या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची शोकांतिका व्यक्त केली होती. या रस्त्याचा वापर करणारे कामगार, उद्योजक आणि शेतकरी, ग्रामस्थांनी कैफियत मांडल्यावर त्यांनी देखील या रस्त्याची पाहणी केली होती. एवढेच नव्हे तर याप्रकरणी त्यांनी लोकसभेत सचित्र आणि पुराव्यासह प्रश्न उपस्थित केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ वर्षांपूर्वी  शरणापूर- करोडी -साजापूर रस्त्याच्या दूरूस्तीसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५ कोटी ७ लाख २४ हजार ८१३ रूपये मंजूर केले होते. यानंतर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गंगापूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत बी-१ टेंडर काढले होते. त्यात २२.९१ कमी टक्के दराने टेंडर भरणाऱ्या एका कंत्राटदाराला १७ जानेवारी २०१५ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. टेंडरमधील अटीशर्तीनुसार १२ महिन्यात रस्त्याचे बांधकाम करून पुढील ३६ महिने त्यांच्याकडे देखभाल दूरूस्तीचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. मात्र रस्त्याचे खोदकाम सुरू करताच काळ्यामातीचे प्रमाण अधीक असल्याने टेंडर रकमेनुसार हे काम परवडत नसल्याचे म्हणत किंमत वाढवा अशी अट टाकत त्यांनी काम थांबवले. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांचे काही एक ऐकून न घेता काम सुरू करा म्हणत तगादा लावला होता. पण कंत्राटदाराला टेंडर रक्कम वाढवून न दिल्याने त्यांनी अर्धवट स्थितीत माघार घेतली.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या के. एच. कन्सट्रक्शन कंपनीचे खंडू पाटील यांनी मार्गावर चार आरसीसी पूल बांधले. बदल्यात त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने ९३ लाख रूपये दिले. मात्र बांधकामात अडथळा निर्माण करणारे इलेक्ट्रीक पोल आणि काही कच्ची पक्की अतिक्रमणे हटवण्याबाबत त्यांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला.विभागानेही यासंदर्भात महावितरण कंपनी व अतिक्रमण विभागाला पत्रव्यवहार केला.पण यंत्रणांनी दुर्लक्ष केले. अखेर या कंत्राटदार कंपनीने देखील पहिल्या टप्प्यातील शरणापूर - करोडी  रस्त्याच्या कामातून त्यांनी माघार घेतली.

४० कोटीतून आता बायपास सुसाट

यानंतर याच महत्वाच्या बायपाससाठी आमदार संजय शिरसाट यांनी तगादा लावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला. १ डिसेंबर २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दूरूस्तीसाठी  अंदाजपत्रक तयार केले. टेंडर प्रसिद्ध केले. त्यात मुंबईच्या जे. पी. कन्सट्रक्शन कंपनीला एक टक्का कमी दराने हे काम देण्यात आले. त्यात सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून कंत्राटदारामार्फत काम सुरू करण्यात आले. शरणापूर ते साजापूर पर्यंत संपूर्ण सिमेंटीकरण होत असलेल्या या रस्त्याने नागरिकांना भूरळ घातली आहे.

असा होणार फायदा

गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या शरणापूर- साजापूर या रिंगरोड बायपासचे काम मार्गी लागल्याने शरणापूर फाट्यापासून सोलापूर - धुळे तर दुसर्या बाजूने नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गास जोडता येणार आहे.छत्रपती संभाजीनगर शहराचा याभागात मोठ्याप्रमाणात विस्तार होत आहे व नगरनाक्यावरील जड वाहतुकीचा भार हलका करण्यासाठी शरणापूर - साजापूर ते करोडी या नव्या रिंगरोड बायपासचा फायदा होणार आहे. चारपदरी रिंगरोड तयार होत असल्याने आता धुळे,चाळीगाव, नाशिक या भागातून येणारी जड वाहने मिटमिटा, पडेगाव, नगरनाकामार्गे वाळूजकडे न जाता यात पाच किलोमिटरचे अंतर कमी होणार आहे. शिवाय मिटमिटा ते नगरनाका या रस्त्यावरील अपघात व वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग निघणार आहे. या रस्त्याचा लाभ जड वाहनांसोबतच वाळूज एमआयडीसीत येणाऱ्या सर्वांनाच होणार आहे. महापालिकेने जो नवीन विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात पडेगाव, मिटमिटा परिसरातील बहुसंख्य जमिनीचा समावेश निवासी झालेला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना जमिनीला चांगला भाव येईल. या परिसरातून जाणाऱ्या रिंगरोड बायपासचे शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे. या रस्त्याचे काम अंत्यंत वेगात आणि चांगल्या दर्जाचे सुरू असून कामाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  रस्त्याचे काम होत असल्याने परिसराला विकासाचे वारे वाहू लागले आहेत.

रेल्वेने देखील सुरू केले भुयारी मार्गाचे काम

शरणापूर-साजापूर वाळूज एमआयडीसीसह सुमारे ५० गावांना जोडणारा व गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शरणापूर रेल्वेगेट क्रमांक ४७ भुयारी मार्गाचे काम देखील सुरू झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी सोयीस्कर होणार आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.शेकडो गावांतील ग्रामस्थांना, शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक, कामगार यांचा प्रवास या भुयारी मार्गामुळे कमी वेळात व सुखकर होणार आहे. येथे रेल्वे गेट असल्यामुळे ये-जा करण्यासाठी ट्रॅफिकमुळे अडचण व वेळ वाया जात होता. त्यामुळे अनेक अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते. हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाला नेताना रेल्वे गेट बंद असल्यामुळे विलंब झाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटनादेखील घडल्या होत्या. आता भुयारी मार्गामुळे वाळूज येथील कंपनी कामगारांना वेळेत कामावर जाता येणार आहे. रेल्वे गेटवर यामुळे ट्रॅफिक कमी होणार आहे. भुयारी मार्गाच्या कामाचा पाठपुरावा शिवसेना प्रवक्ते व पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह या भागातील ग्रामस्थांनी केल्यामुळे भुयारी मार्गाचे काम लवकर मार्गी लागले.