Road Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अखेर साईबाबांच्या धुपखेड्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : अनेक वर्षे हाल सोसलेल्या साईबाबांची प्रगटभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण तालुक्यातील धुपखेडा येथील रस्त्याचे भाग्य अखेर उजळणार आहे. धुपखेडा ते तोंडोळी साईबाबा मंदिर रस्ता तसेच कौडगाव ते धुपखेडा साईबाबा मंदिरला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण जिल्हापरिषदेकडून सुरू करण्यात आले आहे. याकामासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने चार कोटी रूपये  मंजुर केले आहेत. यासंदर्भात "टेंडरनामा"ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेने पर्यटन विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रयत्नाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  निधी मंजुर केल्याने ही कामे मार्गी लागत आहेत.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ५३ पासून गाडीवाट - गाजीपूर - लाखेगाव - नांदलगाव - काटगाव - कौडगाव -  धुपखेडा - दिन्नापूर -  जळगाव - ७४ -  मानेगाव - लोहगाव - ढाकेफळ - मुलानी वाडगाव - ढोरकीन - दहेगाव - शेवता हा जवळपास वीस ते बावीस  किलोमीटरचा इतर जिल्हा मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग १२५ मध्ये समावेश करण्यात आला आहे.यातील ग्रामीन मार्ग क्र. २२ तोंडोळी ते  धुपखेडा साईबाबा मंदिर तसेच कौडगाव ते साईबाबा मंदिर धुपखेडा या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण कामास सुरूवात झाली आहे. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने  दि. २९ मार्च रोजी मंजूरी दिली असून त्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांनी दिली आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ५३ पासून गाडीवाट - गाजीपूर - लाखेगाव - नांदलगाव - काटगाव - कौडगाव -  धुपखेडा - दिन्नापूर -  जळगाव - ७४ -  मानेगाव - लोहगाव - ढाकेफळ - मुलानी वाडगाव - ढोरकीन - दहेगाव - शेवता हा जवळपास वीस ते बावीस  किलोमीटरचा इतर जिल्हा मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग १२५ मध्ये या मार्गाचा समावेश करण्यात असून या रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ही मागणी अजित पवार यांनी मान्य केल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने २९ मार्च २०२३ रोजी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

टेंडरनामा प्रतिनिधीने गेल्या शुक्रवारी जिल्हापरिषद बांधकाम विभागांतर्गत सुरू झालेल्या या रस्त्याची पाहणी करण्यासाठी थेट औरंगाबादपासून ३८ किलोमीटर अंतर गाठत पैठण तालुक्यातील धुपखेडा हे गाव गाठले. दरम्यान साईबाबांना साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीच्या काळात साईबाबा धुपखेडा या गावी राहिले असे येथील ग्रामस्थांनी टेंडरनामाला सांगितले.याच गावात साईबाबांचे मंदिर असून, बाबा जेव्हा भिक्षा मागून यायचे, तेव्हा ते याच ठिकाणी झोपत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे बरीच वर्ष साईबाबांचे वास्तव्य असल्याने या गावाला साईबाबा यांची प्रगटभूमी असल्याचे मानले जाते.  त्यामुळे या गावाच्या विकासासाठी भरपुर निधी द्यावा अशी मागणी गावकऱ्यांसह राष्ट्रवादीचे आमदार संजय वाघचौरे (पाटील) यांनी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींपासून थेट मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांकडे  केली होती. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार  यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. असे  माजी आमदार संजय वाघचौरे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या बीड जिल्ह्यातील  पाथरी गावाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटींच्या निधीची घोषणा केली होती. त्याच बरोबर धुपखेडा येथील साईबाबांच्या प्रगटभूमीसाठीही त्यांनी  निधीची घोषणा केली होती. मात्र सरकार कोसळले आणि घोषणा अर्धवट राहीली. 

२००६ मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना व २०१२ मध्ये विधानसभा सदस्य असताना संजय वाघचौरे यांनी कौडगाव ते धुपखेडा साईबाबा मंदिर रस्त्याचे काम केले होते. परंतू नंतर जवळपास १३ वर्षे हा रस्ता साईभंक्तांसह गावकर्यांची व इतर वाहनचालकांची अक्षरश: परिक्षा पहात होता. या रस्त्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदार देखील मिळत नव्हता. दुफरीकडे जिल्हा परिषदेच्या  प्रशासकीय गुंतागुंतीमुळे या रस्त्याकडे लक्ष देण्यास कोणी तयार नव्हते. खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरलेल्या या रस्त्याने जाताना दुचाकीच काय पण चारचाकी आणि सहा, आठ चाकी वाहनांनाही कसरत करावी लागत होती. आता पर्यटन विभागाने चार कोटी रूपये मंजुर केल्याने ग्रामीन मार्ग क्र. २२ तोंडोळी ते  धुपखेडा (साईबाबा मंदिर ) तसेच अंतर्गत जिल्हा मार्ग क्र. ३९ कौडगाव ते साईबाबा मंदिर धुपखेडा या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण कामास सुरूवात झाली आहे. सदर रस्त्याचे काम देखील दर्जेदार होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

झेडपी सीईओंची ग्वाही

गाडीवाट - गाजीपूर - लाखेगाव - नांदलगाव - काटगाव - दिन्नापूर -  जळगाव - ७४ -  मानेगाव - लोहगाव - ढाकेफळ - मुलानी वाडगाव - ढोरकीन - दहेगाव - शेवता या रस्त्यांसाठी पुढील बजेट मध्ये निधीची तरतूद करून हे रस्ते देखील खड्डेमुक्त करण्यात येतील अशी ग्वाही झेडपीचे सीईओ विकास मीना यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना दिली.