छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती, सरकारकडून रस्ते बांधणासाठी न मिळणारे अर्थसहाय्य या पार्श्वभूमीवर सातारा-देवळाईतील रस्ते बांधणीसाठी सरकारच्या नगरविकास विभागाने सातारा-देवळाईतील अंतर्गत व मुख्य रस्त्यांसाठी आत्तापर्यंत ५० ते ६० कोटींचा निधी दिला आहे. दरम्यान यावेळी देखील या भागासाठी आमदार संजय शिरसाट यांनी या भागातील मुख्य जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या व सोलापूर-धुळे तसेच बीड बायपास या महत्वाच्या रस्त्यांना मधोमध असलेल्या सातारा-देवळाई रस्त्यासाठी तब्बल दहा कोटींचा निधी खेचून आणला. या रस्त्याच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली असून, शहरातील रस्ते बांधकामात नावाजलेले कासलीवाल कन्स्ट्रक्शन कंपनीचे पवन कासलीवाल यांना या रस्त्याचा बांधकामाचे कंत्राट अंदाजपत्रकीय रकमेनुसार मिळाले आहे. नुकतीच त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली असून प्रशासकीय कामाची पुर्तता केल्यानंतर येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
येत्या काळात सरकारच्या नगरविकास विभागाच्या मदतीने सातारा-देवळाईतील अजुन काही रस्त्यांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे.सातारा-देवळाईतील रस्ते विकासाबद्दल गेल्या तीन वर्षांत "टेंडरनामा" सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात आमदार संजय शिरसाट व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, तत्कालीन मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, विद्यमान अधीक्षक अभियंता संजय भगत यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. सातारा-देवळाई भागातील रस्त्यांचे महापालिकेच्या क्षेत्रात रस्त्यांचे नेटवर्क सुमारे दिडशे ते दोनशे किलोमीटरचे आहे. यापैकी २५ ते ३० किलोमीटरच्या रस्त्यांची कामे नगर विकास खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. आता इतर रस्त्यांची कामे होणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी किमान शंभर ते दिडशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पण, पालिकेकडे एवढा निधी नसल्यामुळे नगर विकास विभागाकडून किमान शंभर कोटी रुपयांची तरी तरतूद व्हावी, अशी अपेक्षा सातारा - देवळाईकरांची आहे. पण तेवढीही तरतूद होत नाही. त्यामुळे रस्त्यांची दर तीन वर्षांनी केली जाणारी देखभाल-दुरुस्ती होत नाही.
सरकारने रस्त्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मागील ९ वर्षात आत्तापर्यंत ५० ते ६० कोटी रूपये दिलेत. त्यातून काही मुख्य व अंतर्गत रस्त्यांची कामे झालीत. आतापर्यंत महापालिकेने सातारा - देवळाईतील रस्त्यांसाठी चार दोन रस्ते वगळता कुठल्याही रस्त्यांची कामे केली नाहीत. याउलट नगरविकास विभागाने केलेली रस्ते पाइपलाइन आणि ड्रेनेजलाइनसाठी होत्याचे नव्हते करून टाकलेत.सातारा - देवळाई सिडको झालर क्षेत्रातून वगळताना सिडकोकडे सातारा - देवळाईतून जमा झालेला ३२ कोटी रूपयाच्या महसूलातून साडेआठ कोटीचे रस्ते केले होते.मात्र दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआरने त्या रस्त्यांचीही वाट लावली.दुसरीकडे महापालिकेने सातारा - देवळाईतील जमा झालेल्या महसुलातुन सिडको नाट्यगृह बांधकामाचे कर्ज फेडत सातारा - देवळाईकरांवर अन्याय केला.
सातारा-देवळाई परिसरातील आमदार रोड, रेणुकामाता मंदिर ते धुळे - सोलापूर हायवे, बीड बायपास ते देवळाई खडीरोड, कमलनयन बजाज हाॅस्पीटल ते सुधाकरनगर ते धुळे सोलापूर महामार्ग या महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरणाच्या कामांवर महानगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव देण्याची कृपा करावी, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्यास शासनाने त्याकडे लक्ष द्यायला हवे, या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या कामासाठी सातारा देवळाईतील रस्त्यांच्या उद्योजक, जायंट्स ग्रुप, लायन्स क्लब सारख्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्या तर त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेण्याची तयारी महानगपालिकेतर्फे यादाखविण्यात यावी. संध्या रस्त्याचे टेंडर काढताना काही निकष पाळले पाहिजेत. एका रस्त्याचे एका वर्षासाठीचे टेंडर त्यांनी काढले पाहिजे, म्हणजे त्या रस्त्याची संपूर्ण एक वर्षाची जबाबदारी त्या कंत्राटदारावर टाकायला हवी, पण तसे केले जात नाही. रस्त्यांबाबत दर्जेदार काम करण्याची काही कंत्राटदारांची तयारी असते, पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत समाजसेवेच्या नावाखाली राजकारणात काम करणाऱ्यांच्या जाचापासून कंत्राटदार मुक्त झाला पाहीजे. याउलट कंत्राटदारांना योग्य प्रकारे प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
या रस्त्याचे भाग्य उजळणार
याआधी सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला सातारा-देवळाई हा अंत्यंत महत्वाचा साडेपाच किमी अंतराचा रस्ता जागोजागी उखडला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडाही निखळल्या होत्या. या मार्गावरील जवळपास तीन ठिकाणी असलेल्या ओढ्यांवरील नळकांडी पुलांचे कामही आमदार संजय शिरसाट यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून जवळपास वीस कोटी रूपये खर्च करून करून घेतली. मात्र, महादेव मंदिराजवळील पुलाचा प्रश्न न्यायालयीन वादात अडकल्याने बांधकाम रखडले होते. अखेर शेतकऱ्यांची समजूत काढत तोही प्रश्न मिटला. आता पुलाच्या बांधकामासाठी नगरविकास विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. निधीची मंजुरी मिळताच पुलाच्या बांधकामाचे नव्याने टेंडर महिनाभरात निघण्याची शक्यता आहे. यामुळे सातारा देवळाई करांना मोठा दिलासा मिळणार आहे. सातारा-देवळाई हा रस्ता महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. याच्या आसपास हायकोर्ट कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, रेणुकामाता मंदिर परिसर, साई मंदिर, दूधसागर कॉलनी, जिजाऊनगर, शिल्पनगर, साई भाग्य, साई विश्व सहकारी गृहनिर्माण संस्था, रामचंद्रनगर आणि पुढे म्हाडा काॅलनी व देवळाई गावठाणासह अन्य शेकडो वसाहती आहेत. शिवाय गांधेली, देवळाईपासून थेट सातारा आणि इटखेडा गावाकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्ता खराब असल्याने नागरिकांची गैरसोय व्हायची. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात या कामासाठी सव्वा कोटीचे बजेट मंजूर झाले होते. छत्रपती संभाजीनगर येथील कालिका इंजिनिअरिंग अँड कॉट्रक्टर्सला याचे काम देण्यात आले होते. २२ फेब्रुवारी २०१७ दरम्यान कंत्राटदाराने या रस्त्याचे खडीकरण,मजबुतीकरण आणि डांबरीकरण केले होते.
मात्र एकदा काम झाल्यानंतर सात वर्षात पुरेशा निधी अभावी रस्त्याच्या देखभालीकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. सात वर्षात अनेक पावसाळे खात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. डांबरीकरणाचा सर्फेस पूर्णत: उखडला आहे. अनेक ठिकाणी मोठेमोठी भगदाडे पडली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शोल्डरच्या कडाही निखळल्या आहेत. या मार्गावर जागोजागी भगदाड पडल्याने येथून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते.त्यातच दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआरने आणि महानगरपालिका नियुक्त कंत्राटदार अंकिता इंटरप्रायझेसकडून भूमिगत गटारीसाठी संपुर्ण रस्ताच खोदल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली होती. आता या रस्त्यासाठी आमदार संजय शिरसाट, सा.बां चे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, अधीक्षक अभियंता संजय भगत याच्या प्रयत्नाने दहा कोटी मंजुर झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका क्षेत्रात दर्जेदार रस्ते तयार करणारे पवन कासलीवाल यांच्या कासलीवाल कंन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा आणि स्वतःचा सिमेंट प्लॅंट असल्याने ते लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लावतील व नागरिकांना दिलासा देतील, अशी अपेक्षा सातारा-देवळाईकरांनी व्यक्त केली आहे.