Mokshada Patil Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : लाेहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाला मिळाला न्याय

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या जागेचा शोध २३ ऑगस्ट २०२१ रोजी तत्कालीन पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या कार्यकाळात संपला होता. आता विद्यमान पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या पाठपुराव्याने लवकरच मागील अनेक वर्षापासून एका छोट्याशा जागेत सुरू असलेल्या लोहमार्ग पोलिस अधिक्षक कार्यालयाची कटकट मिटणार असून, आता हे कार्यालय नवीन धुळे-सोलापुर ते जुना छत्रपती संभाजीनगर-धुळे महामार्गाच्या मध्यभागी शरणापूर शिवारातील भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी होणार आहे. यात कार्यालयाची प्रशस्त इमारत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय केली जाणार आहे.

लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या जागेचा शोध तत्कालीन लोहमार्ग पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांच्या काळातच सततच्या पाठपुराव्यामुळे दोन वर्षापूर्वी संपला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडे दाखल केलेल्या प्रस्तावानुसार त्यांनी लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी शरणापूर शिवारातील भांगसीमाता डोंगराजवळील ३० एकर जागा (जमीन) दिली होती. महसूल प्रशासनामार्फत जमिनीचा नकाशा आणि मार्किंगसह कागदपत्रे दोन वर्षापूर्वी लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयास हस्तांतरण करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाचे नागपूर लोहमार्ग हा स्वतंत्र घटक (एसपी कार्यालय) १० मे २०१८ रोजी त्यासाठी अद्याप स्वतंत्र प्रशासकीय इमारत आणि अधिकारी कर्मचार्यांसाठी स्वतंत्र निवासस्थानाची सोय नव्हती. परिणामी संभाजीनगरात कामकाज करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतरत्र घरभाड्याने राहावे लागत असे. त्यासाठी तेव्हाच सरकारने जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात खुपदा पाठपुरावा केल्यानंतर २३ ऑगस्ट २०२१ रोजी शासनाने जागा उपलब्ध करून दिली.

सद्यःस्थितीत लोहमार्ग पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर घटकात ६७६ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे कार्यरत आहेत. त्यामध्ये उपअधीक्षक तीन, निरीक्षक आठ, सहायक निरीक्षक १९, उपनिरीक्षक २६, सहायक फौजदार ६७, जमादार १६५, पोलिस नाईक १०७ तर २८१ पोलिस शिपायांचा समावेश आहे. याशिवाय लेखाधिकारी, लिपिक, चपराशी, स्वयंपाकी, मोची, टेलर, सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, ड्रेसर, वॉर्डबॉय अशी एकुन ४६ पदे देखील आहेत. राज्यात लोहमार्ग पोलिसांचे सहा उपअधीक्षक कार्यालय व २२ पोलिस ठाणे आहेत. त्यापैकी शेगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नंदूरबार, नाशिक रोड, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परळी वैजनाथ हे दहा पोलिस ठाण्यांची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर घटकाकडे वर्ग केले गेले आहेत. त्यातील सात मनमाड उपविभागात तर तीन जालना उपविभागात समाविष्ठ करण्यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगर घटकाकरिता लोहणार्ग पोलिस अधीक्षकांसाठी स्वतंत्र मुख्यालय, मेस, रुग्णालय अद्याप अस्तित्वात आलेले नव्हते. सुरूवातीला ‘पोलिस अधीक्षक लोहमार्ग ’ हे कार्यालयसुद्धा तेथील पोलिस आयुक्तालयाच्या आवारात थाटण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी सदर कार्यालय टीव्हीसेंटर येथील ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका छोट्याशा कोंदट जागेत थाटण्यात आले होते. येथील मुलभुत सोयीसुविधांअभावी मनुष्यबळ वर्ग करण्यास देखील टाळाटाळ केली जात होती. येथील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची देखील मानसिक स्थितीवर परिणाम होत असे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एका अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) तसेच आयुक्त, पुणे यांच्या आदेशाने तत्कालिन पोलिस अधीक्षक चंद्रकिरण मीना व पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी या कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी महसूल प्रशासनाकडे ३० एकर जमिनीची मागणी केली होती. दरम्यान विविध ठिकाणच्या उपलब्ध जागेची पाहणी केल्यानंतर शरणापूर शिवारातील भांगसीमाता गडाजवळील ३० एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. तेव्हाच संबंधित जमिनीचा नकाशा आणि हद्द निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालय या नावाने जमिनीचा सातबाराही तयार झाला होता. जमीन प्राप्त झाल्यानंतर तेथे लोहमार्ग एस. पी. कार्यालयाची इमारत व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थांने उभारणीसाठी ऑगस्ट २०२१ मध्ये प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.

सध्या ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील एटीएस कार्यालयाजवळील इमारतीत लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालय सुरू आहे. ही इमारत अपुरी पडत आहे. तेथे पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक विशेष शाखा, लोहमार्ग पोलिस स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नियंत्रण कक्षाचे कामकाज करताना मोठ्या अडचणी येत आहेत. यासंदर्भात पोलिस दलातील लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यमान पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पाच वर्षापूर्वींच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रस्तावांची तपासणी केली. रूजु झाल्यापासून येथे मुख्यालय व अधिकारी कर्मचार्यांसाठी निवासस्थाने उभारणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. आता या नवीन जागेत शासनाकडून निधी देण्यासाठी ग्रीन सिंग्नल   मिळाल्यामुळे लवकरच कार्यालयाची प्रशस्त इमारत व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभी राहतील. तेथे या कार्यालयांतर्गत विविध मोटारवाहन आदींसह विविध शाखांची कार्यालये एकाच छताखाली कार्यरत होतील. त्यानुसार  महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण मंडळाकडून या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले जाणार असल्याची माहिती मिळाली.