Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : सातारा-देवळाईतील नदीवरील पुलाचे बांधकाम कधी?

धोकादायक पुलावर अपघाताची भीती; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : साताऱ्यातील गट क्रमांक-२२५ ग्रामौद्योगिक विक्षण मंडळ संचलीत एमआयटी अन्नतंत्र महाविद्यालय संलग्नीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ फळबाग व शेततळे जवळील सातारा डोंगर पठारावर उगम पावलेल्या नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक स्थितीत आला आहे. वाहनांची वाहतूक होत असताना पुलाला हादरे बसत असून, दुर्घटनेची भिती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

एकीकडे बीड बायपास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-(सी) धुळे-सोलापुर या दोन महामार्गांकडे जाताना रेणूकामाता मंदीर कमान ते सातारा रस्त्यावर हा पूल आहे. सातारा बटालियन, सिंदोन-भिंदोन, साईटेकडी ते परदरी, गावदरी तांडा, कचनेर, घारदोन, सहस्त्रमुळी व अन्य शेकडो गावांना जोडणारा हा एकमेव पूल आहे. या भागातील तब्बल एक ते दीड लाखांहून लोकसंख्या असलेल्यांची पुलावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. याशिवाय अनेक तांडे या पुलामुळे जोडले गेले आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही या पुलावरून ये-जा करतात. रिक्षा, दुचाकी, ट्रक आदी वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. सातारा गावासह दोन मोठ्या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा पूल पावसात पुराचा सततचा मारा बसत असल्याने धोकादायक झाला आहे. पुलाला भगदाड पडले आहे. पुलाच्या मध्यभागी असलेले पाइप जीर्णावस्थेत आहेत. पावसाळ्यात पुलावरून नदीचे पाणी वाहत असल्याने साताऱ्यासह राष्ट्रीय महामार्गांचा संपर्क तुटतो. मोठी वाहने पुलावरून गेल्यावर पुलाला हादरा बसत आहे. पुलावर अन्य चार ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुलांच्या दुरुस्तीबाबत सरकारच्या उदासीन धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

हा पूल अवजड वाहतुकीस धोकादायक बनला असून, संबंधितांनी तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे. एकीकडे ५० कोटींचे रस्ते केल्याचा गवगवा केला जात असताना सातारा गावातील ५२ घरे नावान ओळखली जाणारी नवघर वस्ती-एकता काॅलनी ते सातारा गावाकडे जाणाऱ्या व फुलेनगर रेल्वेगेट कडून सातारा गावाकडे येणाऱ्या एमआयटी ते उद्योग विश्व अपार्टमेंट दरम्यान तसेच कमलनयन बजाज हाॅस्पिटल ते सुधाकरनगर कडे जाणाऱ्या पुलावरून देखील पावसाचे पाणी वाहते. बीड बायपास देवळाई चौकातुन देवळाई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल देखील धोकादायक आहे. सातारा-देवळाई गावातील प्रत्येक नाल्यावरील नळकांडी पुलांची अनेक ठिकाणी अवस्था बिकट आहे. पण या कमी उंचीच्या जागी  नवीन पूल कधी बांधणार याबाबत महापालिका प्रशासनाकडे कोणतेच उत्तर नाही. येथे नवीन पूल बांधण्यासाठी शासनदरबारी जनसेवा कृती समिती, सातारा-देवळाई विकास समिती, संघर्ष नागरी कृती समिती, राजेशनगर नागरी कृती समिती, शिवछत्रपतीनगर नागरी कृती समितीचे प्रयत्न सुरू आहेत. नदी नाल्यांवरील जुने पूल तोडून नवीन पूल बांधण्याची त्यांची मागणी आहे.