Green West Processing Plant Tendernama
मराठवाडा

Good News : चंडीगडच्या धर्तीवर संभाजीनगरात उभा राहणार 'हा' प्रकल्प

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील उद्याने, खाजगी बागा आणि रस्त्यावरील झाडांचा पालापाचोळा आणि फांद्याची विल्हेवाट लावण्यासाठी व या कायमस्वरुपी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि शहर कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेने चांगले पाऊल उचलले आहे. यासाठी शहरात पहिल्यांदाच गार्डन ग्रीनवेस्ट प्रोसेसिंट प्लॅट उभारण्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार करण्याचे काम सुरू आहे.

यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील ९ प्रभागातील ११५ वार्डातून संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडून ग्रीनवेस्ट डंपिंग स्पाॅटचे सर्वेक्षण करून अहवाल मागवले जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना दिली.

शहरात प्रत्येक दिवशी १० ते १२ टन ग्रीन कचरा निर्माण होतो. पावसाळ्यात आणि उन्हाळ्याच्या तोंडावर झाडांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात गळतो. याशिवाय वीजतारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्याही महावितरणकडून छाटल्या जातात. अवकाळी व बिगरमोसमी व मोसमी पावसात वाऱ्याने झाडेही कोसळतात. या दरम्यानच्या काळात एका दिवसात २० ते ३० टन कचऱ्याची निर्मिती होते. यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे कुठलीही यंत्रणा नाही.

महापालिका यांत्रिकी विभागामार्फत प्रत्येक झोनसाठी एक जेसीबी आणि एक टिप्पर अशा वाहनांचा ताफा ग्रीनवेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे आहे. याद्वारे ग्रीनवेस्ट संकलीत करून तो पडेगाव येथील कचराडेपोलगत टाकला जातोय. यातील पालापाचोळा शहरातील काही उद्यानातील खड्ड्यात टाकून खत तयार करण्यात येते. मात्र लाकडाचा व फांद्यांचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

याशिवाय महापालिककडे पुरेशी यंत्रणा नसल्याने शहरातील अनेक भागात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर ग्रीनवेस्टचे ढिगारे साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ग्रीनवेस्ट वेळेवर उचलण्यात येत नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढतात.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी या जटील समंस्येवर उपचार करण्यासाठी चंडीगडच्या धर्तीवर कांचणवाडी शिवारात महानगरपालिकेच्या जागेवर गार्डन वेस्ट प्रोसेसिंग प्लॅट उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. झाडांच्या पालापाचोळ्यातून खत आणि लाकडांचा चुरा करून त्यापासून ब्रिकेट तयार करून औद्योगिक वसाहतीतील बाॅयलरसाठी तो विक्री करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प महापालिकेमार्फत चालवायचा की पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर चालवायचा यावर महापालिकेचे विचारमंथन सुरू आहे. यासाठी लागणारी मशिनरी व साधारणतः किती जागा व किती खर्च  लागेल यावर देखील विचार केला जात आहे. हा प्रकल्प लवकर साकार झाल्यास शहरातील संपूर्ण गार्डन ग्रीनवेस्ट एकाच ठिकाणी डंप करण्याची सुविधा होईल.

वर्षानुवर्षांपासूनच्या समस्यांपासून सुटका

सद्य:स्थितीत शहरातील विविध मार्गावरील वीजतारांना स्पर्श करणाऱ्या, वाहतुकीला व बांधकामाला अडथळा निर्माण करणाऱ्या, तसेच धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येते. यात खाजगी व सरकारी मालमत्तेतील झाडांचा समावेश असतो. मात्र हा गार्डन ग्रीनवेस्ट थेट रस्त्यांवर, उद्यानात आणि सरकारी - निमसरकारी कार्यालयांच्या जागेवरच अनेक महिने पडून राहतो.

अनेक दिवस उलटूनही छाटलेल्या झाडाच्या फांद्या आणि आणि पालापाचोळा रस्त्यावरच पडून असतो. पडलेल्या पालापाचोळा अन् फांद्यांनी रस्ताही अडविला जातो व येथे वाहतूक कोंडीही होते. त्यामुळेे शाळेत जाणारी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अगोदरच फेरीवाल्यांनी शहरातील सर्वच रस्ते पूर्णपणे व्यापल्यांनी नागरिकांना व मुलांना पदपथ सोडून रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अपघात होण्याची भिती नेहमी वर्तवली जात असते. 

छाटलेल्या फांद्या उचलून फूटपाथ व रस्ते स्वच्छ ठेवण्याबाबत महापालिकेत नेहमी तक्रारींचा पाऊस पडतो. महापालिका प्रशासकांनी तातडीने चंडीगडच्या धर्तीवर असा प्रकल्प उभारल्यास यातून महापालिकेला तक्रारींचा निपटारा करताना नागरिकांच्या रोषास सामोरे न जाता वर्षाकाठी कोट्यवधीचे उत्पन्न मिळेल. यातून शहर स्वच्छ होऊन सगळ्यांची समंस्यापासून सुटका होईल.