Ring Road Tendernama
मराठवाडा

पुणेकरांसाठी गुड न्यूज; लवकरच निघणार रिंगरोडचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) हाती घेण्यात आलेल्या पूर्व भागातील रिंगरोडच्या (Ring Road) मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पूर्व भागातील रिंगरोडच्या मार्गिकेचा आराखडा देखील तयार करण्यात आला असून, लवकरच पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन्ही भागाच्या रिंगरोडच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या रिंगरोडचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील पश्‍चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षणाचे यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली असून त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यांचे भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी तीन पर्यायी मार्गांचा विचार करण्यात आला होता. मध्यंतरी सुकाणू समितीच्या बैठकीत त्यापैकी एका मार्गास मान्यता देण्यात आली होती. मान्यता देण्यात आलेल्या मार्गिकेच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण झाले असल्याची माहिती एमएसआरडीसीचे अधिकारी राहुल वसईकर यांनी सांगितले.

खेड, हवेली, पुरंदर आणि भोर अशा चार तालुक्‍यातून जाणारा हा रस्ता सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असून पुरंदर येथील नियोजित विमानतळाजवळून तो नेण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून पुणे सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित असलेल्या पुरंदर विमानतळावर जाण्यासाठीचा मार्ग देखील त्यामुळे उपलब्ध होणार आहे. पीएमआरडीएने हाती घेतलेल्या रिंगरोडला समांतर असलेला भाग वगळून एमएसआरडीसीने नव्याने सर्वेक्षण करून या रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे.

एमएसआरडीसीकडून पहिल्या टप्प्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मुळ, सानोरी, दिवे, चांमळी, हिवरे, गराडे, कांबरी, वरवे बुद्रुक असा असणार आहे.