छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अखेर राज्य वखार महामंडळाच्यावतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा लगत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे अॅग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी दोन वर्षापुर्वी घोषणा केली होती. त्याला राज्य सरकारने १ जून रोजी मंजुरी दिली असून, तब्बल ३० कोटी ६२ लाख रुपये खर्चासह प्रशासकीय मान्यता दिल्याने मराठवाड्यासाठी महत्वाकाक्षी प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व विद्यमान जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय यांनी विशेष प्रयत्न केले होते. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आता शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदामांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. यासोबतच महामंडळाकडून ब्लॉकचेन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
विशेष म्हणजे गत तीन वर्षात महामंडळाने तीनशे कोटींपेक्षा अधिक नफा कमावला आहे. वखार महामंडळाने नुकतेच ६६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दोन अॅग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्याची घोषणा १५ ऑगस्ट २०२१ रोजी केली होती. त्यात छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील वर्धा येथे हे पार्क उभारण्यासाठी तावरे यांनी प्रयत्न केले होते.
त्यापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने प्रस्ताव मंजूर केला आहे. सोबतच ३० कोटी ६३ लाख रुपयांच्या वित्त मान्यतेसह प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी या पार्कचा फायदा होणार आहे. या गोदामांमध्ये प्रामुख्याने शेतमाल ठेवण्यात येईल. हे लॉजिस्टिक पार्क शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत.
महामंडळाच्या पारंपरिक तारण कर्ज कार्यप्रणालीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे वखार महामंडळाने तारण कर्ज योजनेची कार्यपद्धती ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल केली आहे. महामंडळाच्या गोदामात धान्य ठेवल्यानंतर शेतकरी किंवा व्यापाऱ्यांना गोदामातूनच बँकेस कर्जासाठी अर्ज करता येईल. शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज हे नऊ टक्के व्याजदराने दिले जाते.
तारण कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या पुढाकाराने ब्लॉक चेन तंत्रज्ञान स्टार्टअपच्या माध्यमातून व्हर्ल कंपनीने संगणकप्रणाली विकसित केली आहे. महामंडळाच्या गोदामांमध्ये गेल्या आठ वर्षांत शेतकऱ्यांनी अंदाजे साडेचारशे कोटी रुपये, तर व्यापाऱ्यांनी दीड हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचे तारण कर्ज घेतले आहे.
या प्रकल्पातील सुविधा लॉजिस्टिक पार्कमधील गोदामांमध्ये शेतमालाची साठवणूक, कार्गोची सुविधा, उत्पादनाचे ग्रेडिंग, वितरण, चाचणी प्रयोगशाळा आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रसह विविध सुविधा असतील. शेतमालाची शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवणूक आणि शंभर टक्के विमा संरक्षण, गोदाम व्यक्ती, संस्था तसेच कंपन्यांसाठी खुले राहील.
अॅग्रो लॉजिस्टिक पार्क उभारणीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असून, येत्या दोन-अडीच वर्षांत हे काम पूर्ण होईल. लॉजिस्टिक पार्क शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच, गोदामात ठेवलेल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी ई-मार्केट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यासाठी अभिनव प्रकल्प आहे.
अॅग्रो लॉजिस्टिक पार्कमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. ग्राहकांना रास्त दरात ताजा शेतमाल मिळेल. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किलोमीटर आहे. १० जिल्हे आणि २६ तालुके तसेच ३९२ गावांना जोडणारा हा महामार्ग असल्याने सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश
स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत वैजापूर तालुक्यातील जांबरगावात वखार महामंडळाच्या वतीने ॲग्रो लॉजिस्टिक पार्क व कृषी समृद्धी केंद्र तातडीने उभारावे, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळेल, अशी व्यवस्था उभारण्याचे आवाहन तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ५ ऑगस्ट २०२१ रोजी केले होते. थेट जांबरगावात त्यांनी जागेची पाहणी देखील केली होती. केंद्र व राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
राज्य वखार महामंडाळाने हा प्रकल्प उभारणीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष दीपक तावरे यांना केल्या होत्या.