औरंगाबाद (Aurangabad) : रेल्वेस्थानकावर मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ होणाऱ्या नव्या पादचारी पुलाला (फुट ओव्हर ब्रीच) जोडणाऱ्या रॅम्पचे काम कासवगतीने सुरू आहे. रेल्वेस्थानकावर एक्सलेटर (सरकते जीने) लिफ्ट आणि इतरही पादचारी पुल (फुट ओव्हर ब्रीज) आहेत. मात्र, दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने प्रवाशांना रेल्वेतून चढ-उतार करताना थेट स्थानकातून प्लॅटफाॅमचा वापर न करता बाहेर पडण्याकरिता हा फुट ओव्हर ब्रीज अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेल्या या ओव्हरब्रीज आणि जीन्यांचे काम कसेबसे पार पडले. मात्र आता शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा असलेल्या रॅम्पचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना चेंगराचेंरीचा त्रास किती दिवस सहन करावा लागणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सदर फुट ओव्हर ब्रीजचे काम उल्हासनगरच्या पुष्पक रेल कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या ब्रीजच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे एक कोटी ८० लाख रूपये खर्च केला जात असल्याचे रेल्वेचे सहाय्यक मंडल अभियंता जनार्दन बालमुच यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे जेष्ठनागरिकांना एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर पाऊल ठेवतांना त्रास होऊ नये यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या जवळूनच ९० मीटरचा रॅम्प मुख्य ओव्हरब्रीजला जोडला आहे. साडेतीन मीटर उंच सहा मीटर रूंदीचा हा भव्य रॅम्प तयार केला जात आहे. ओव्हरब्रीज वरून प्लॅपफाॅमवर उतरण्यासाठी तीन जीने तयार झाले आहेत. साडेसहा मीटर रूंदी व ८२ मीटरचा ओव्हरब्रीज देखील तयार झाला आहे. मात्र, रॅम्पचे अंतिम आणि महत्त्वाचे काम कासवगतीने सुरू आहे.
असा होणार प्रवाशांना फायदा
मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाजुला रिक्षा स्टॅन्डपासूनच थेट हा रॅम्प तयार होत असल्याने प्रवाशांना रिक्षातून उतरताच एक नंबर प्लॅटफार्मवर जाण्याची गरच नाही. विशेष म्हणजे स्थानकाच्या बाहेरूनच रॅम्पवरून थेट एक ते चार प्लॅटफाॅमवर जाता येणार आहे. रॅम्पमुळे प्रवाशांना सामानाची चढ-उतार करताना होणारा त्रास देखील कमी होणार आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीला लागुनच प्लॅटफार्म क्रमांक एकच्या बाजुने व्हिडीओकाॅन कंपनीच्या जुन्या गोडाऊनचे बांधकाम तोडुन तेथे हा रॅम्प तयार केला जात आहे. फुट ओव्हरब्रीजच्या कामानंतर आता रॅम्पचे काँक्रीटीकरण, फरशी आणि फायबर टीन किती दिवसात बसतील व कधी या रॅम्पचा लोकार्पण सोहळा होऊन प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.