Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

अखेर 'त्या' दुभाजकाची दुरुस्ती; पण आयुक्तांच्या आदेशाचा 'कचरा'

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhtrapati Sambhajinagar) : जळगावरोड ते हाॅटेल अंबेसेडर मार्गावरील नव्यानेच बांधलेला दुभाजक दोन ठिकाणी फुटला. यामुळे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबत 'टेंडरनामा'कडे तक्रारी आल्याने यावर सविस्तर सचित्र वृत्तमालिका प्रकाशित केली होती. गत आठवड्यांपूर्वी त्यासंबंधी स्वतः महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी काही वरिष्ठ कारभाऱ्यांची एका बैठकीत चांगलीच कान उघाडणी केल्याने बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला ताळ्यावर आणले गेले. अखेर फुटलेले दुभाजक बांधण्यात आले. मात्र आयुक्त तथा प्रशासकांच्या आदेशाचा पुन्हा 'कचरा' केल्याचे 'टेंडरनामा'च्या पाहणीत उघड  झाले आहे. कारण कारभाऱ्यांनी या मार्गावर पुन्हा आपल्या निष्क्रिय कामगिरीचे पुरावे सोडल्याचे दिसून आले आहे.

सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर मागील अनेक वर्षांपासून जळगावरोड ते हाॅटेल अंबेसेडर या रस्त्याच्या कामाचा रखडपणा चालला होता. सिडकोतील कॅनाट परिसरातील हा अत्यंत महत्त्वाचा गजबलेला रस्ता असल्याने व जालना रस्त्याला समांतर असलेल्या या प्रमुख मार्गावर मध्यंतरी वाहनांचे अनेक अपघात झाले होते. यात शेकडो सामान्य नागरिकांना अपंगत्व आले.

येथील नागरिक व व्यापाऱ्यांच्या मागणीने तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सरकारी अनुदानातून एक कोटी ५२ लाख ९५ हजार ३९६ रुपये मंजूर केले होते. टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या मे. जी. एन. आय. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले होते. ११ डिसेंबर २०२० रोजी त्याला वर्क ऑर्डर देण्यात आली होती. 

दरम्यान, रस्ता बांधकामातील अंदाजपत्रकानुसार डांबरीकरण, फूटपाथ व सिमेंटचा दुभाजक आदी कामांचा समावेश होता. यात दुभाजकाचे अत्यंत निकृष्ट काम केल्याने तो काही दिवसातच फुटला. यात रस्त्याच्या कडेच्या व्यावसायिकांच्या व्यापारी पेठा दिसाव्यात यासाठी दुभाजक बांधताना विशेष काळजी घेतल्याचे उंचीवरून सहज लक्षात येते.

विशेष म्हणजे दुभाजकातील झाडांवर विशिष्ट केमिकल टाकून ती जाळली जात असल्याचे देखील समोर आलेले आहे. धक्कादायक म्हणजे नव्या कोऱ्या दुभाजकात माती टाकून सुशोभिकरण करण्याऐवजी त्यात चक्क दगड आणि कचऱ्याचे ढिग टाकण्यात येत आहेत. याला महापालिकेतील उद्यान विभागाचे कारभारी देखील तितकेच जबाबदार आहेत.

मार्गावरील फुटलेला दुभाजक आणि रस्त्यातील त्रुटींवर 'टेंडरनामा'ने सातत्याने वृत्तमालिका लावली. दुरुस्तीसाठी प्रकल्प सल्लागारापासून महापालिकेतील रस्ते बांधकाम विभागाच्या कारभाऱ्यांपासून आयुक्त तथा प्रशासकांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासकांकडून संबंधित जबाबदार कारभाऱ्यांना दुभाजक दुरुस्ती व इतर त्रुटींचा निपटारा करण्यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. यामुळे या मार्गाचे काम केलेल्या संबंधित कंपनीला कारभाऱ्यांनी जागे केले. त्याच्याकडून  फुटलेले दुभाजक दुरुस्तीला युद्ध पातळीवर सुरूवात करण्यात आली. अखेर त्याने काम देखील पूर्ण केले.

या नव्या कोऱ्या मार्गावर जलवाहिनी आणि ड्रेनेज दुरुस्तीच्या नावाखाली महापालिका कारभारी निर्मित पडलेले खड्डे बुजवण्याकडे कारभाऱ्यांनी कानाडोळा केला. 'टेंडरनामा'शी बोलताना दुभाजक दुरूस्तीचे काम करणार्‍या कंपनीचे वरिष्ठ कारभार्‍यांनी तोंडभरून कौतुक केले. मात्र वर्षभर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्याच्याचकडे होते. मार्गावर खड्डे पडू न देणे, सूचना फलक लावणे, दिशादर्शक खुणा करणे, याकडे लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे ठेकेदाराचे कर्तव्यच आहे.

आधीच निकृष्ट काम केले. त्याची दुरुस्ती उशिराने केली, असा मुद्दा उपस्थित करत 'टेंडरनामा' प्रतिनिधीने आता रस्त्यातील खड्ड्यांचे आणि दुभाजकातील कचरा अन् दगडांचे काय, असा प्रश्न विचारताच कारभाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्मार्ट सिटीच्या रस्त्यांकडे बोट दाखवले.