Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गांची माहिती देण्यास टाळाटाळ,कारण..

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मराठवाड्यात केंद्रीय निधीअंतर्गत सुरू असलेल्या अनेक राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडून केंद्रीय निधीअंतर्गत अनेक राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू करण्यात आली असल्याने 'टेंडरनामा' प्रतिनिधीने अधिक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडळ यांना मराठवाड्यातील विविध प्रकल्पाबाबत माहिती मिळवण्यासाठी २४ मार्च २०२३ रोजी पत्र दिले.

त्यानंतर अधिक्षक अभियंता वृषाली गाडेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि जालना येथील कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना ३१ मार्च व ८ जून २०२३ रोजी 'टेंडरनामा' प्रतिनिधीला माहिती द्यावी व तसा अहवाल मंडळ कार्यालयाला देण्यात यावा, असे पत्र मंडळाचे अधिक्षक अभियंता श्रीमती ए. बी. कदम यांनी कार्यकारी अभियंत्यांना पाठविले होते. मात्र, संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी या मूळ आणि स्मरण पत्राला केराची टोपली दाखविली आहे.

वृषाली गाडेकर या छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, लातूर, जालना या चार जिल्ह्याच्या नियंत्रक असल्याने हा विषय त्यांच्या अखत्यारित असून, त्या मंडळाच्या अधिक्षक अभियंत्या आहेत. सहाय्यक अधिक्षक अभियंता कदम यांच्याकडे माहिती विचारली असता त्यांनीच प्रतिनिधीला कागद देत अर्ज लिहून मंडळ कार्यालयात संबंधित लिपिकाला अर्जाची नोंद घ्यायला लावली होती. त्या अर्जाची नोंद झाल्यावरच अधिक्षक अभियंत्यांच्या आदेशाने थेट कार्यकारी अभियंत्याना पत्र देत कळवले होते.

प्रतिनिधीने सोमवारी थेट सहाय्यक तसेच अधिक्षक अभियंत्यांना थेट सवाल करताच आता तिसरे स्मरणपत्र देऊ, नसता शोकाॅज नोटीस बजावू, असे म्हणत टोलनाटोलवी सुरू केली आहे.

यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे यांची भेट घेतली असता त्यांनी मला दोन दिवसांपूर्वी विभागाकडून गाडी मिळाली आहे, पण त्यात पेट्रोल टाकायला पैसे नसल्याने ती कार्यालयातच उभी आहे. तूमची माहिती खूप मोठी आणि विस्तृत आहे, इतक्या झेराॅक्ससाठी कोण खर्च करणार, असे सांगितले.

यावर आम्ही झेराॅक्सचा सर्व पैसा देऊनच माहिती घेणार आहोत, असे म्हटल्यावर गलांडे यांनी तुम्हाला कोणत्याही प्रकल्पाची माहिती लागली, तर आम्ही तुमच्यासाठी दोन तास खर्च करून माहिती देऊ, असे म्हणत गोलगप्पा सुरू केल्या. त्यानंतर प्रतिनिधीने माहितीचा तगादा लावला असता गलांडे यांनी माहिती अधिकाराचा मार्ग दाखवला. 

मुळात या प्रकरणात अर्ज स्वीकारतानाच सहाय्यक मुख्य अभियंत्यांनी व अधिक्षक अभियंत्यांनी माहिती अधिकाराचा मार्ग दाखवने आवश्यक होते. साधा अर्ज स्वीकारल्यानंतर मंडळ कार्यालयात त्याची नोंद घेतली, त्यावर कार्यकारी अभियंत्यांना दोन पत्रे दिली. आता तिसऱ्या पत्रानंतर शोकाॅज नोटीसची तयारी सुरू असताना विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्या आदेशाला देखील अधिक्षक अभियंता बधत नाहीत, हे विशेष. 

राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची पुनर्रचना केली होती. त्यानुसार  राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाची कामे एक मुख्य अभियंता व त्यांच्या नियंत्रणाखालील काही राष्ट्रीय महामार्ग मंडळांच्या अखत्यारित आणली आहेत. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यान्वयन (तांत्रिक) राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांच्याकडून करण्यात येते.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची बरीचशी लांबी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पात समाविष्ट झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बऱ्याच विभाग आणि उपविभागांकडील राष्ट्रीय महामार्गाचा कार्यभार कमी झाला आहे, तर काहींकडे अजिबात कार्यभार उरलेला नाही.

काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाकडील कार्यभार विचारात घेऊन, कामाचा समतोल राखण्यासाठी आणि कामावर योग्य प्रकारे देखभाल व परिणामकारक नियंत्रण ठेवून कामात सुसूत्रता व प्रशासकीय नियंत्रण राहावे असा विचार समोर ठेऊन प्रशासनाने इतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग संघटनेच्या धर्तीवर राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाची कामे एकाच मुख्य अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली असून, त्यांच्या अखत्यारित काही राष्ट्रीय महामार्ग मंडळे स्थापन केली आहेत.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागांर्तगत राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, लातूर आणि जालना अशा चार जिल्ह्यांची राष्ट्रीय महामार्गाची कामे या महामार्ग मंडळाच्या नियंत्रणाखाली केली जातात. मुख्य अभियंता संतोष शेलार विशेष प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम) प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अधिपत्याखाली या कार्यालयाचे कामकाज चालते.

'टेंडरनामा' प्रतिनिधीने छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या मंडळ कार्यालयाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयाकडून छत्रपती संभाजीनगरसह, नांदेड लातूर आणि जालना येथील राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत होत असलेल्या तसेच रखडलेल्या प्रकल्पांचे सवीस्तर विकास आराखडा, वर्क ऑर्डर, टेंडर काॅपी, मोजमाप पुस्तिका, प्रकल्पासाठी भूसंपादन केलेले निवाडे, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता व संबंधित तांत्रिक सल्लागारांनी प्रकल्पांची तांत्रिक तपासणी केलेले अहवाल अशी इत्यंभूत माहिती देण्यास तीन महिन्यांपासून टाळाटाळ सुरू केलेली आहे. यासंदर्भात अधिक्षक अभियंता केवळ टपाली कारभार करत धन्यता मानत आहेत.