Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

संभाजीनगरातील 'या' उद्यानात साकारणार महाराणा प्रताप सिंह यांचा अश्वारूढ पुतळा

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News : सिडको येथे कॅनाॅट गार्डनमध्ये महाराणा प्रताप सिंह यांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे. पुतळा उभारण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने विधी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता. समितीने देखील पाहणी करून मंजुरी दिली आहे. पुतळ्यासोबत उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. सुरक्षा रक्षकासाठी सिमेंट काॅंक्रिटचे घर, बच्चे कंपनीसाठी मुबलक प्रमाणात खेळण्या, स्वच्छतागृहांची दुरुस्ती तसेच उद्यानाचे सुशोभीकरण यासाठी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

राजस्थान मधील घाटनी येथील महाराणा प्रतापसिंह यांचा एकमेव अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर सिडकोतील कॅनाॅट गार्डनमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राजपूत समाज सेवा संघाने सिडकोतील कॅनाॅट गार्डनमध्ये महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा  उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ यांनी पुतळा उभारण्यासाठी महापालिका फंडातून तब्बल एक कोटीला मान्यता दिली आहे. त्यातून ८७ लाखातच पुतळा उभारला जाणार आहे.

असा असेल पुतळा...

जमिनीपासून चबुतऱ्यासह पुतळ्याची उंची ४१ फूट आहे. राज्यात प्रथमच असा पुतळा उभारण्यात येणार आहे. ६ बाय १८ इतक्या लांबी रुंदीचा चबुतरा असून चबुतऱ्याची १८ फूट उंची असणार आहे. चबुतऱ्यापासून अंदाजे २१ फूट महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.

पुतळ्यासाठी ८७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत पुतळ्याचे काम पूर्ण केले जाणार असून, मार्चमध्ये लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.