Road Tendernama
मराठवाडा

भारतमाला प्रकल्पातील 'हा' राष्ट्रीय महामार्ग झाला पाईपलाइन मार्ग; वर्षभरही टिकणार नाही रस्ता!

टेंडरनामाच्या वृत्तावर तज्ज्ञांनी केले शिक्कामोर्तब

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर ते पैठण या महामार्गाच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम कांचनवाडी ते कौडगावपर्यंत अनेक ठिकाणी रखडले आहे. गेल्याच महिन्यात या रस्त्याच्या कामाची मुदत संपली होती. या संदर्भात एनएचएआयच्या (NHAI) अधिकाऱ्यांना विचारले असता छत्रपती संभाजीनगर नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू असल्याने आठ किलोमीटरचे काम रखडल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मार्गातील काही काही ठिकाणी जलवाहिनीचे काम सुरू असल्याने बहुतांश पॅचेसमध्ये काम बाकी असल्याचेही अधिकारी म्हणाले. मुळात केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेतून होत असलेल्या या राष्ट्रीय महामार्गासाठी भारतमाला योजनेतून जनतेच्या पैशातून २८९ कोटी रूपये खर्च केले जात आहेत.मात्र हा राष्ट्रीय महामार्ग नसून आता पाइपलाइन मार्ग झाल्याने वर्षभरही रस्ता टिकणार नसल्याचे तज्झांनी मत व्यक्त केले आहे. यासाठी रस्त्याला बाधीत न करता राज्य सरकारने जायकवाडी ते महानुभाव आश्रमापर्यंत ४४ किमी भूसंपादन करूनच पाईपलाइनचे काम करायला हवे होते, नसता केंद्र शासनाने भूसंपादन करून छत्रपती संभाजीनगर-पैठण बायपास करायला हवा होता, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेली दोन दिवस या रस्त्याचा लेखाजोखा तपासला असता रस्ता चौपदरीकरणाचे कंत्राट बी. एम. दानवे हे जाॅईंट व्हेंचर असलेल्या ओजेएससी एव्हरस्काॅन या कंपनीला मिळाले होते. त्यातून रस्त्याची ही सर्व परिस्थिती पाहता माजी खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू बी. एम. दानवे यांनी या रस्त्यातील भागीदारीतून अंग काढल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर-पैठण या ४४ किमी संपूर्ण रस्त्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत भारतमाता अंतर्गत योजनूतून काम सुरू आहे. गेल्या महिन्यामध्ये याचा १८ महिन्याचा कालावधी संपलेला आहे. दरम्यानच्या काळात मजीप्रा नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआर या कंत्राटदारामार्फत छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाइपलाइन टाकण्यासाठी विलंब होत असल्याने या राष्ट्रीय महामार्गाचे काम खोळंबले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा महानगरपालिकेने जमीन भूसंपादन न करता अस्तीत्वातील ३० मीटर रस्त्याचीच जागा वापरल्याने छत्रपती संभाजीनगर ते पैठणला जाणार्या व या मार्गावर जोडणाऱ्या प्रत्येक गावातील प्रवाशांना वाहतुकीसाठी त्रास होत आहे. याकडे छत्रपती संभाजीनगर महापालिका, मजीप्रा व जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याची एकंदर त्रासदायक स्थिती पाहता स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी मुग गिळुन गप्प बसले आहेत का?, असा सवाल देखील टेंडरनामा पथकापुढे शेकडो प्रवाशांनी उपस्थित केला आहे. उपलब्ध असलेला केंद्र व राज्य सरकारचा निधी कसा संपवता येईल यावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, मजीप्रा व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे भांडण सुरू असल्याचेही एका विश्वसनीय सूत्रांने नाव न सांगण्याच्या अटीवर टेंडरनामा प्रतिनिधी व तज्ज्ञांसमक्ष सांगितले. नेमक्या भांडणाच्या वादामुळेच छत्रपती संभाजीनगर-पैठण महत्वाचा मागील शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या  रस्त्याचे रूंदीकरण होत असून त्याच्या दर्जाउन्नतीवर तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.

३० मीटर रूंदी असलेल्या या रस्त्याच्या पाइपलाइनसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने परवानगी ही रस्त्याच्या कॅंम्बरमधून अर्थात रस्त्याच्या मध्यभागातून ७ मिटर अंतरावर देण्यात आल्याचे टेंडरनामा तपासातून उघड झाले आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला १५ +१५ मीटर जागा शिल्लक राहते. त्यामुळे पाइपलाइनचे काम रखडल्याने जवळपास आठ किलोमीटरचे काम रखडलल्याचे टेंडरनामाने पाहणीत समोर आले आहे. पाइपलाइनमुळे भविष्यात हा रस्ता टिकणार की नाही, याची खात्री कोण करून देणार? कारण हा रस्ता चार पदरी होत असला तरी पाइपलाइनचे काम देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार पदरी होत असल्याचे दिसून आले आहे. भविष्यात या रस्त्यावरती पाइपलाइनची दुरूस्ती कशी करणार ? जागोजागी काही ठराविक मीटर अंतरावर एअर वाॅल कसे टाकणार? असे सर्वात मोठे प्रश्न तज्झांनी उपस्थित केले. या रस्त्याला पाइनलाइनमुळे गालबोट लागणार यामागचे तांत्रिक कारण म्हणजे या रस्त्याच्या खालुन पाइपलाइन केल्यानंतर रस्ता बनवणार, दरम्यान जो मुरुम टाकणार त्याची आय.आर.सीच्या  नियमाप्रमाणे एक मीटर जाडी असायला हवी. मात्र या नियमाला धाब्यावर ठेवत मुरुमाच्या जागी माती टाकली जात आहे. दुसरे तांत्रिक कारण म्हणजे पाइपलाइनवर रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण झाल्यावर त्याची रोलरने दबाई करणे अवघड जाणार आहे आणि त्यामुळेच रस्त्याचा दर्जा खालावणार असल्याची शंका उपस्थित होत आहे. याकामात सर्वच यंत्रणा ही चुक लपवत आहेत.

होत असलेल्या पाइपलाइन कामात दिरंगाईबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दखल घेत सर्वच यंत्रणांवर ताशेरे ओढले असताना सर्वच यंत्रणा व लोकप्रतिनिधी गप्प का बसले आहेत. पाइपलाइनचे काम अंत्यंत कासवगतीने होत असलेले काम पाहता डिसेंबर २०२४ पर्यंत छत्रपती संभाजीनगरकरांना डिसेंबर पर्यंत पाणी मिळण्याची शक्यता स्पष्ट होत नाहीए. पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा या रस्त्याप्रमाणेच पुन्हा छत्रपती संभाजीनगर - पैठण हा ४४ किमी पैकी काही तयार झालेल्या भागात पुन्हा खोदकाम जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून होणार का, याची चिंता देखील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पडली आहे. त्यामुळे जीव्हीपीआरच्या कंत्राटदारात व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलेच जुंपल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याला अडथळा न करता शासनाने दोन्ही बाजूंना भूसंपादन करूनच पाइपलाइन टाकणे आवश्यक होते. पाइपलाइनसाठी एका बाजुने ७ मीटर व दुसऱ्या बाजूला १० मीटर अशा एकुन १७ मीटर रस्त्याच्या खाली पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे केवळ १३ मीटर रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहणार आहे. त्यात १ मीटर फुटपाथ व १ मीटर शोल्डर व १ मीटरचा दुभाजक यामुळे केवळ १० मीटर रस्ता शिल्लक राहतो.दोन्ही बाजुला १३.५ + १३.५ मीटर मुख्य रस्त्याचे बांधकाम केले तरी खालुन गेलेली पाइपलाइन पाण्यामुळे थंड राहणार असल्याने डांबरी रस्त्याचा दर्जा खालावणार असल्याची शंक्यता तज्झांनी व्यक्त केली आहे. रस्ता चौपदरीकरणाचे कंत्राट बी. एम. दानवे हे जाॅईंट व्हेंचर असलेल्या ओजेएससी एव्हरस्काॅन या कंपनीला मिळाले आहे. इतर बारा कंपन्यांपेक्षा त्यांनी तब्बल ४१.२ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने हे काम त्यांच्या पदरात पडले आहे. रस्ता बांधकामाच्या एकूण ४९० कोटी एवढे टेंडर रकमेतून केवळ २८९ कोटीतून या रस्त्याचे काम मार्गी लागत आहे.मात्र होत असलेल्या रस्त्यातील अडथळे पाहता यातील एक भागीदार बी.एम. दानवे यांनी भागिदारीतून मागार घेतल्याचे दिसून आले आहे.