Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : फुलंब्रीतील चितेपिंपळगावात भूमिगत गटारीचे काम खोळंबले; ग्रामस्थांकडून उपोषण

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तालुक्यातील मौजे चितेपिंपळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत राहुलननगर या अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीत ग्रामपंचायतीच्या मार्फत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून, सदर काम गेल्या चार महिन्यांपासून रखडल्याने वस्तीत अनेक समस्या निर्माण झाल्याचा आरोप येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण म्हस्के यांनी केला आहे. या निकृष्ट कामाची तपासणी व काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोवर उपोषण सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह ग्रामविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यांनी ५ ऑगस्टपासून थेट ग्रामपंचायतीच्या ओट्यावर बसून रहिवाशांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मौजे चित्ते पिंपळगाव येथील वार्ड क्रमांक-३ येथील राहुलनगर ही अनुसुचित जाती व नवबौध्द वस्ती आहे. या वसाहतीत तीन वर्षांपूर्वी भुमिगत गटारीचे काम झाले होते. त्यानंतर पुन्हा याच गावातील रहिवासी व फुलंब्री मतदार संघाचे आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष तथा राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने ग्रामीन विकास अल्पसंख्याक आणि नगरविकास विभागाच्या धरतीवर शासन स्तरावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत काही अटी व शर्तीच्या अधीन राहुण समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी १५ लाखाचा निधी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना मंजुर करून दिला.त्यापाठोपाठ अजून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी १५ लाखाचा निधी मिळावा यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी पाठपुरावा करत आहेत. 

उपलब्ध निधीतून चितेपिंपळगाव येथील वार्ड क्रमांक - ३ येथील राहुलनगर या अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीत भुमिगत गटार व सेफ्टी टॅंकच्या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ४ मार्च २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता व निधी देखील वितरीत केला आहे.त्यानंतर पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांनी १४ लाख ९८ हजार ९६७ इतक्या रकमेस तांत्रिक मांन्यता दिली आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी कामाच्या टेंडरला व निधीला मांन्यता दिल्यानंतर ७ मार्च २०२४ मौजे चितेपिंपळगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंचांनी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना करारनामा सादर केला होता.‌त्यानंतर प्रशासकीय बाबी पुर्ण करून १५ मार्च रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. ग्रामपंचायतीमार्फत सदर काम छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अश्फाक पठाण यांना देण्यात आले होते. सदर कामात कंत्राटदाराने भुमिगत गटार योजनेचे काम केले. सेफ्टी टॅंकदेखील बांधला मात्र त्यावर स्लॅब टाकण्याचे काम बाकी राहीले. सदर कामात भुमिगत गटार योजनेतील पाण्याचा निचरा करण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने गटार योजनाच चोक्प झाली. दरम्यान वार्ड क्रमांक - ३ येथील राहुलनगर या अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीत भुमिगत गटार योजनेचे दुर्गंधीयुक्त पाणी किमान चारशे कुटुंबियांच्या घरांमध्ये शिरत आहे व अनेक ठिकाणी भुमिगत गटारीच्या मेनहोलवर ढापे न टाकल्याने त्यात वस्तीतील आकाश विजय जाधव यांच्या दोन वर्षाचा मुलगा पडला. त्यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य प्रवीण म्हस्के यांनी रहिवाशांच्या वतीने केला आहे. 

सदर भुमिगत गटारीचे काम तातडीने करावे, उघड्या मेनहोलवर ढापे बसवावेत व सेफ्टी टॅंकचे काम पूर्ण करून योग्य ठिकाणी दुषित पाण्याचा निचरा करावा, यासाठी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊन दिले. कामासाठी निधी मंजुर असताना गत चार महिन्यांपासून भुमिगत गटारीचे काम बंद का ठेवले आहे, असे अनेक सवाल निवेदनात नमुद केलेले असताना व  ग्रामपंचायत सदस्य या नात्याने वसाहतीच्या वतीने वारंवार काम सुरू करण्याची मागणी केली असताना ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांनी कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात ग्राम पंचायत सदस्यांनी जिल्हाधिकार्यांकडे देखील तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. जोपर्यंत मौजे चितेपिंपळगाव येथील राहुलनगर वार्ड क्रमांक - ३ येथील अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीतील भुमिगत गटारीचे दुषित पाणी गावाबाहेर काढत नाही व नव्याने सुरू असलेले भुमिगत गटारीचे काम पुर्ण करत नाहीत, तोंपर्यंत आमरण उपोषण ग्रामपंचायतीच्या पारावरून सोडणार नसल्याचा पवित्रा ग्रामपंचायत सदस्य प्रवीण म्हस्के यांच्यासह रवी चाबुकस्वार , रवी गिऱ्हे , संजय जाधव,  राहुल म्हस्के कैलास कर्डक , रवी शिंदे , आनंद बोर्डे , गणेश वाघमारे,  आकाश जाधव,  मिनाज सय्यद , अमर खरात , ज्ञानेश्वर गवळी , गौतम जाधव , विकास मूगदल व चितेपिंपळगाव  येथील महिलांसह ग्रामस्थांनी घेतला आहे.

काय म्हणाले सरपंच 

या उपोषणामागे केवळ राजकारण आहे. यापुर्वी राहुल म्हस्के हे सदस्य असताना त्यांनीच रामदास आठवले यांच्या निधीतून या वस्तीत भुमिगत गटारीचे काम केले होते. समंस्या खरी आहे, त्यात आमचे दुमत नाही. आम्ही सातत्याने बागडे नानांकडे पाठपुरावा केला. त्यांनी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. गावाच्या हितासाठी योजनेचे काम सुरू केले. केवळ २० छड्या टाकायचे काम बाकी आहे. त्यात गावातील एकाने जमीनीतून पाईप टाकण्यास अडथळा निर्माण केला आहे. दररोज वाद सुरू आहेत. आख्या पंचक्रोशीतील इतर गावात सुविधा नसताना आमच्या गावातील चिंत्ती नालालगत सेफ्टी टॅंक बांधला. याकामात कुठेही भ्रष्टाचार नाही. मी कुठेही मुजोरी केलेली नाही. मी स्वतः पाण्या पावसात उभे राहुत काम करून घेतले आहे. यासाठी पिंप्री राजाचा रोड फोडला. तिथून भुमिगत पाईप टाकुण रस्ताही दुरुस्ती केला. अधिकाऱ्यांचे व ग्राम विकास अधिकाऱ्यांचे कामावर बारकाईने लक्ष आहे. या योजनेत १५ लाख जरी मंजुर असले, तरी नियमानुसार केवळ तीन लाख खात्यात आले. वीस टक्के प्रमाणे तीन टप्प्यांत निधी वितरीत होतो. यासाठी जवळपास ३५ लाखाचा खर्च आहे. तरी कंत्राटदाराने बागडे नानांचा शंब्द राखुन पदरातुन खर्च केला. पुढील टप्प्यात निधी आल्यावर त्याला देऊ. आमचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित ग्रामपंचायतीच्या सदस्याला सगळी परिस्थिती माहित असताना उपोषण करणे अयोग्य असल्याचे मत चितेपिंपळगाव येथील सरपंच पांडुरंग सोनवने यांनी व्यक्त केले.