नांदेड (Nanded) : केंद्र सरकारने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियानाचे आयोजन केल्यानंतर राष्ट्रध्वजाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मागणी आणि पुरवठ्यातील गणित बिघडल्याने झेंड्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्णाम झाला होता. मागणी मोठी असल्याने अनेक पुरवठादारांनी दर्जाकडे दुर्लक्ष करत झेंड्यांची निर्मिती केली. त्याचे पडसाद अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर दर्जेदार झेंड्याच्या निर्मितीचा आपला वारसा नांदेड येथे असलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीने यंदाही जपला आहे. (Red Fort Tri Colour)
दिल्लीचा लाल किल्ला, मंत्रालय आणि देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयांवर स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जो तिरंगा डौलाने फडकताना दिसतो तो नांदेडमध्ये तयार होतो. देशभरात चार ठिकाणी खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती होत असून, त्यापैकी एक नांदेड आहे. शहरातील हिंगोली गेट येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे कार्यालय आहे. या समितीची सुरुवात १९५५ मध्ये झाली आणि १९६७ मध्ये संस्थेची नोंदणी झाली. या समितीच्या वतीने खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात येते. समितीचे अध्यक्ष शिवसांब चवंडा असून माजी आमदार ईश्वरराव भोसीकर सचिव आहेत.
यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे भोसीकर यांनी सांगितले. सध्या मागणी जवळपास चौपट झाली असल्याने राष्ट्रध्वजाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तरीदेखील आम्ही समितीतर्फे रात्रंदिवस काम करीत ध्वजनिर्मिती करीत असल्याचे ते म्हणाले. नांदेड येथे खादीच्या कापड्यापासून टेबलवरील झेंड्यापासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यासह मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर फडकविण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात येते. ६० रुपयांपासून ते २३ हजार रुपयांपर्यंत या राष्ट्रध्वजाची किंमत असल्याचे भोसेकर म्हणाले.
अशी होते राष्ट्रध्वजाची निर्मिती
खादीच्या कापडापासून राष्ट्रध्वज तयार होत असल्याची माहिती समितीचे लेखा अधीक्षक आर. के. स्वामी आणि निर्मितिप्रमुख सुरेश जोशी यांनी दिली. खादीच्या कापडाची निर्मिती उदगीर (जि. नांदेड) येथे होते. त्यानंतर हे कापड रंगरंगोटी करण्यासाठी अहमदाबाद (गुजरात) येथे पाठविण्यात येते. त्यानंतर नांदेडला त्यावर अशोक चक्र तयार करून शिलाई करण्यात येते.
चार शहरांत निर्मिती
भारतात खादीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती ही नांदेड (महाराष्ट्र), हुबळी (कर्नाटक) आणि मुंबई (महाराष्ट्र) या तीन ठिकाणी होते. गेल्या वर्षीपासून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे निर्मिती सुरू झाली असल्याची माहिती समितीचे संचालक व्यवस्थापक महाबळेश्वर मठपती यांनी दिली. मुंबईला खादी ग्रामोद्योग आयोग असून, त्या ठिकाणी सर्व खादी संस्था नोंदणीकृत आहे. या ठिकाणाहून नांदेडच्या समितीकडे राष्ट्रध्वजाची मागणी होते. त्यानुसार त्यांना राष्ट्रध्वज पुरविले जातात.