Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

गडकरीजी, कधी होणार 'या' राष्ट्रीय महामार्गाचे काम?; नागरिकांचा जीव

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : धुळे ते सोलापूर महामार्गावरील धुळे ते चाळीसगाव हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. तर पुढे कन्नड घाटाचा गुंता अद्याप न सुटल्याने या अरूंद रस्त्यावर दररोज तासनतास वाहतुकीचा चक्काजाम होत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकराना धुळ्याकडे जाताना आधी घाट जाम आहे का, याची खातरजमा करूनच पुढील प्रवासासाठी घरातून पाय काढावा लागतो. कन्नड घाटातील रस्ता अत्यंत अरुंद असल्याने प्रवास नकोसा होतो. त्यामुळे नागरिक केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे कधी होणार या रस्त्याचे काम असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

कन्नड  घाटात आधी बोगद्या तयार करायचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक कारणे पुढे करत तो रद्द करण्यात आला. नंतर आहे, त्याच रस्त्याचे रूंदीकरण करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यासाठी जागाच शिल्लक नसल्याचे कारण पुढे केले गेले. परिणामी घाट रूंदीकरणाची अंमलबजावणी झालीच नाही. पुढे कन्नड घाटाखालून कन्नड ते चाळीसगाव ते धुळे महामार्गाचे चौपदरीकरण अत्यंत संथगतीने सुरू आहे. आता पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम होऊ शकत नाही. परिणामी वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. जानेवारी २०२१ दरम्यान धुळ्याच्या केईसिल या कंत्राटदार कंपनीमार्फत एक हजार कोटीच्या या प्रकल्पाचे काम अडीच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भारतमाला परियोजनेतून हायब्रीड एन्युटीतंर्गत हे काम ९१० दिवस म्हणजेच अडीच वर्षात पूर्ण होईल, अशी माफक अपेक्षा होती. मात्र, सद्यःस्थितीत गरताडपासून पुढे बोढरे गावापर्यंत अनेक पॅचेस सोडून देण्यात आले आहेत. गिरणार नदीसह अन्य नदींवरील पुलांचे व उड्डाणपुलांचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. आता पावसाळ्यात काँक्रिटची कामे सुरू असली तरी डांबरीकरणाचे  काम स्थगित करण्यात आले आहे. मुदतीत कंत्राटदार कंपनीने हे काम पूर्ण केले असते तर धुळे ते चाळीसगाव हा दीड तासाचा प्रवास एक तासात पूर्ण करता आला असता.

धुळे ते सोलापूर महामार्गाच्या चौपदीकरणाचा शेवटचा टप्पा बोढरे (ता. चाळीसगाव) ते धुळ्यापर्यंत आहे. यापूर्वी कन्नडपासून पुढे चौपदरीकरणाचे काम देखील अपूर्ण आहे. बोढरे ते गावापासून चाळीसगावापर्यंतचे काम रखडले अनेक ठिकाणी रखडले आहे. धुळे ते चाळीसगाव हा रस्ता अरुंद असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी होती होती. त्यानूसार जानेवारी महिन्यापासून धुळे ते चाळीसगाव आणि पुढे बोढरेपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत गरताड गावापासून चाळीसगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्ताचे अनेक पॅचेसमध्ये काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात अर्धवट कामामुळे चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. याबाबत ठेकेदार कंपनीकडून कुठलीही  काळजी घेण्यात येत नसल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे. महामार्गावरील विंचूर येथील बोरी नदीवरील पूलाचे काम ५० टक्केही पुर्ण झालेले नाही. चाळीसगाव बायपास, मालेगाव बायपास येथील पुलांची देखील तीच रखडकथा आहे. मेहुणबारे बायपास, चाळीसगाव रोड-मालेगाव रोड, शिरूड चौफुली येथील अंडरपासचे काम देखील रखडले आहे. अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने त्यामुळे महामार्गावर अपघात होत आहेत.

विशेष म्हणजे हा रस्ता एखाद्या गावखेड्यातला नसून राष्ट्रीय महामार्ग आहे. याची कल्पना असताना चौपदरीकरण कामादरम्यान कुठेही सुरक्षा उपाय योजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर तरवाडे ते धुळे शहर या टप्प्यात मागील सहा महिन्यात ६८ अपघात झालेत. त्यात आठ ते दहा लोकांना जीव गमवावा लागला. चौपदरीकरणाच्या कासवगतीमुळे धुळे-चाळीसगाव हे ५५ किलोमीटरचे सव्वा तासाचे अंतर कापण्यासाठी आता दोन ते अडीच तास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अरुंद आणि खड्डेमय असलेला हा रस्ता आधीही त्रासदायक होता. चौपदरीकरण करताना इंडियन रोड काँग्रेसच्या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांकडे कंत्राटदार कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. या विषयीचा अहवाल महामार्ग पोलिसांनी संबंधित  जिल्हाधिकाऱ्यांना देखील दिला आहे. त्यावर संबंधितांकडून सुचना देऊनही अधिकार्यात सुधारणा झालेली दिसत नाही.

याउलट रस्त्यावर अपघात वाढले आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्याने आता शिरुड, विंचूर, दोंदवाड, बोरकुंड, मांडळ, जुनवणे, बोरविहीर, धामणगाव, बोधगाव, नाणे, सिताणे या गावातील नागरिक धुळे शहराकडे जाण्यासाठी आर्वी किंवा थेट मुकटीहुन येतात. ज्या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी सूचना व दिशादर्शक फलक नाही. ज्या ठिकाणी बॅरिकेट लावण्याची गरज आहे तेथे गोण्यांमध्ये वाळू भरून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

प्रवासी थांब्याची वाताहत

चौपदरीकरणामुळे सर्व प्रवासी थांब्याची वाताहत झाली आहे. पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे थांब्यावर थांबणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्यातही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महामार्गाच्या शेजारी असणारे शेत शिवारातील रस्तेही खराब झाले आहे. रस्ता चौपदरीकरण करताना अनेक ठिकाणी साईडपट्टी रस्त्यापेक्षा खाली गेली आहे एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील यादृष्टीने काम केले जात असल्याने मात्र पावसात किनार ढासळल्याने व साइडपट्टीच मुख्य रस्त्यापेक्षा खाली गेल्याने परिणामी अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

गरताड, तरवाडेबारीत अपघात जास्त

गरताडबारीत असलेला डोंगर पोखरुन रस्ता सरळ केला जात आहे. या ठिकाणी अलीकडे एका लहान पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या शेजारी कच्चा अरुंद रस्ता आहे. तशीच स्थिती तरवाडेबारीत आहे. तरवाडेबारीत सुरक्षेसाठी एकही उपाय उपाययोजना नाही. या दोन्ही ठिकाणी अपघात जास्त होत असल्याचे  दिसून आले आहे. शिरुड चौफुलीजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. बोरकुंडकडून शिरुडकडे जाणारे आणि येणाऱ्या नागरिकांना वळसा घालून पुढे जावे लागते. या ठिकाणी चाळीसगावकडून येणाऱ्या वाहन चालकांचा गोंधळ होतो. तशीच परिस्थिती जुनवणे गावात आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असून पश्चिमेकडून वळसा घालून पुढे जावे लागते. महामार्गावर रात्री काही ठिकाणी वाहन उभी असतात. ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथे रिफ्लेक्टर पुरेशा प्रमाणात लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्याचे लक्षात येत नाही. जवळ आल्यावर काम सुरू असल्याचे कळते. त्यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.