Aurangabad Tendernama
मराठवाडा

दौंड-उस्मानाबाद मार्गाचे काम रखडले; कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : दौंड ते उस्मानाबाद या राज्य मार्ग क्रमांक ६८ चे निकृष्ट आणि संथगतीने काम सुरू आहे. परिणामी जनतेचे कोट्यावधी रूपये पाण्यात मुरत आहेत. यासंदर्भात कंत्राटदारांला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी एका संघटनेने केली होती. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराला दंडात्मक कारवाईची नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र तो केवळ कारवाईचा फार्स ठरल्याने आज संघटनेच्या वतीने अकलुज येथील पीडब्लुडीच्ये कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बांगडी आंदोलन करण्यात आले.

पूर्व मराठवाड्याला जोडणाऱ्या दौंड-करमाळा-परांडा-बार्शी ते उस्मानाबाद या राज्य मार्ग क्रमांक ६८ या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. पीडब्लुडीमार्फत आरएसआयआयएल एनपी इन्फ्रा. प्रा. लि. या कंपनीला रस्ता बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे. कंत्राटदार कंपनीला २३ सप्टेंबर २०२० रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. टेंडरच्या अटी-शर्तीनुसार ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ५० टक्के काम पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु काम अत्यंत कासवगतीने व निकृष्टरित्या सुरू आहे.

तक्रारीत तथ्य, प्रतिदिवस साडेआठ लाखाचा दंड

यासंदर्भात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर अकलुज येथील कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्या आदेशाने करमाळा येथील उप विभागीय अभियंत्याने रस्त्याची पाहणी केली. त्यात तक्रारीत तथ्य असल्याचे सिध्द होताच १८ फेब्रुवारी २०२२ ते काम सुरू असे पर्यंत कंत्राटदाराला प्रतिदिवस साडेआठ रूपयाचा दंड लावला.तसे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग व जनशक्ति संघटनेचे पाटील यांना देखील कळविण्यात आले होते. 

आठ महिन्यांपासून अंमलबजावणी नाही

मात्र आठ महिन्यानंतर अतुल खुपसे पाटील यांनी करमाळा येथील उपविभागीय अभियंता व अकलुजच्या कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांना कंत्राटदारांकडून किती दंड वसुल केला अशी विचारणा केली असता पीडब्लुडीच्या या अभियंत्यांनी कंत्राटदाराला आठ महिन्यापूर्वी दिलेल्या पत्राचा विसर पडला आणि कोट्यावधीच्या दंड वसूलीची अंमलबजावणी केलीच नाही.

अखेर उपसले बांगडी मोर्चाचे हत्यार

पीडब्बुडीतील कारभाऱ्यांच्या फसव्या कारभाराने संतप्त झालेल्या जनशक्ती संघटनेने अखेर आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. याप्रकरणी आज शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी अकलूज येथील पीडब्लुडीचे  कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्या कार्यालयासमोर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्षा विनीता बर्फ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांसह बांगडी मोर्चा काढण्यात आला होता.

असे आहेत संघटनेचे आरोप

● या राज्यमार्गाच्या कामात कंत्राटदारामार्फत सुधारणा कमी आणि अनेक त्रुटी व उणिवा आहेत. त्यामुळे हा रस्ता धोकादायक स्थितीत असून निष्पाप जीवांचे बळी जात असल्याबाबत जनशक्ति संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील गेल्या दोन वर्षापासून लढा देत आहेत. निकृष्ट कामाचा दर्जा सुधारावा, अन्यथा  ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका अशी थेट मागणी त्यांनी बांधकाम विभागतील स्थानिक व वरिष्ठांपासून या खात्याचे मंत्री ते मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांच्या तक्रारींनतर  रस्त्यांच्या कामाला काही अधिकाऱ्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित स्थानिक आणि जबाबदार असलेले कार्यकारी आणि उप विभागीय अभियंता यांनी कंत्राटदारावर कारवाईबाबत  उदासीनता दाखवल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे

 ● रस्ता मुदतीत पूर्ण न केल्यामुळे आरएसआयआयएल-एनपी-इन्फ्रा प्रा. लि. कंट्रक्शन कंपनीला लाखो रुपयांचा दंड आकारल्याचे खोटे पत्र देऊन आमच्या जनशक्ती संघटनेची फसवणूक केली आहे. याच्या निषेधार्थ तसेच  कार्यकारी अभियंता-निरंजन तेलंग यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही शेकडो महिला घेऊन आज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय,अकलूज यांच्या कार्यालयासमोर बांगडी घेऊन आंदोलन केले आहे. कारवाई न झाल्यास यापुढे आक्रमक पवित्रा घेणार आहोत असे जनशक्ती शेतकरी महिला संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा विनीता बर्फे म्हणाल्या. 

● सदर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कंत्राटदाराला कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग हे पाठीशी घालत आहेत. दंडात्मक कारवाईचे पत्र देऊनही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे तेलंग त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी. तेलंग यांची पूर्व पार्श्वभूमी पाहता ते पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक देवाणघेवाणीतून कंत्राटदारांना टेंडरमधील अटी व शर्तींची पूर्तता न करता कामे दिलेले आहेत. तसेच बोगस बिले अदा करण्यात ते पटाईत आहेत. त्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत पुण्यातील विविध संघटनांनी देखील अनेक तक्रारी शासन दरबारी केल्या आहेत. त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा देखील संघटनेने केला आहे.

● वादग्रस्त अधिकारी तेलंग यांची एफडीए प्रकरणात अकलूज येथे बदली झालेली असून, त्यांनी अकलूज विभाग येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यातून मोठ्या प्रमाणात नामी-बेनामी संपत्ती जमवली आहे. त्यासाठी आम्ही लाचलुचपत विभागाकडे देखील तक्रार करणार आहोत असे जनशक्ती संघटनेचे म्हणणे आहे.