औरंगाबाद : महापालिकेने स्मार्ट सिटी (Smart City) योजनेच्या माध्यमातून सायकल ट्रॅकच्या निर्मितीसाठी २० किलोमीटर रस्त्यांची निवड केली, यासाठी जेम पोर्टलवरील टेंडर प्रक्रियेद्वारे नाशिकच्या स्वान इलेक्ट्रो मेक या कंपनीकडून २३ कोटी ९ लाख ४० हजार रुपये खर्च करुन ३० हजार बाॅलार्ड्स (रबरी खांब) खरेदी केले. आत्तापर्यंत यातील सहा हजार बाॅलर्ड्स लावण्यात आले आहेत. त्यासाठी आत्तापर्यंत ४ कोटी ७ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. अजूनही काही रस्त्यांवर हे काम सुरुच आहे. परंतु ज्या रस्त्यांवर हे काम पूर्ण झाले आहे त्या रस्त्यावरील सायकल ट्रॅकसाठी रोवण्यात आलेले बाॅलार्ड्स उखडून गेले आहेत. अनेक भागात ते सहा महिन्याच्या काळातच बेरंग झाले आहेत. यामुळे यावरचा खर्च वाया गेल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे. या विद्रूपीकरणाकडे मात्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे दुर्लक्ष आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत ज्या ज्या शहरांचा समावेश झाला, त्या शहरांना सरकारने शहराच्या काही भागांमध्ये सायकल ट्रॅक तयार करण्याची सूचना केली आहे. 'सायकल फॉर चेंज' असे नाव या उपक्रमाला देण्यात आले आहे. नागरिकांनी सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा. सायकल चालवणे आरोग्यासाठी व तंदुरुस्तीसाठी (फिटनेस) चांगले असते असा संदेश देत महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेची मदत घेत नव्यानेच झालेल्या दिडशे कोटीतील व काही जुन्या रस्त्यांवर हा उपक्रम राबवला. त्यात क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, सिडको ते हर्सूल टी पॉईंट, हर्सूल टी पॉइंट ते दिल्लीगेट, दिल्ली गेट ते बिबी का मकबरा , हॉटेल ताज ते सेव्हन हिल, कॅनाॅट प्लेस, सलीम अली सरोवर ते कलेक्टर ऑफिस, जालनारोड ते जीएसटी कार्यालय आदी रस्त्यांचा समावेश आहे.
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता पहिला ट्रॅक
त्यापैकी क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर रेल्वेस्टेशनकडे जाताना रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूने शहरातील पहिला सायकल ट्रक तयार केला.
२३ कोटी ९ लाख ४० हजार रुपयाचा प्रकल्प
औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या जनसंपर्क अधिकारी अर्पिता शरद यांनी दिलेल्या माहितीनुसार सायकल ट्रॅकसाठी स्मार्ट सिटी योजनेतून २३ कोटी ९ लाख ४० हजार रुपये खर्चून तब्बल ३० हजार बाॅलार्ड्सची खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
४ कोटी ७ लाख ४० हजार गेले वाया
वाहतूक शाखेच्या मागणीनुसार गोपाळ टी चौक, सोनी शोरूम, क्रांती चौक, मुकुंदवाडी सिग्नल, सिडको एन - १ प्रोझोन माॅल, हर्सुल टी पाॅईंट, मिलकाॅर्नर, आंबेडकरनगर, सेव्हनहील, गजानन महाराज मंदीर परिसर, शहानुर मिया दर्गा परिसर, विभागीय आयुक्त निवासस्थान परिसर, साई स्पोर्टस ॲथोरेटी ऑफ इंडिया आदी ठिकाणी मागणीप्रमाणे बाॅलार्ड्स दिल्याचे अर्पिता शरद यांनी सांगितले. आत्तापर्यंत सहा हजार बाॅलार्ड्सचे इनस्टाॅलेशन झाले असून यासाठी ४ कोटी ७ लाख ४० हजार रूपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; कोट्यवधींचा चुराडा
विशेष म्हणजे विविध भागात तयार करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचे उद्घाटन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२० रोजी करण्यात आले होते. वर्षभरातच या ट्रॅकची अवस्था बिकट झाली आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूने जुनाट फुटपाथच्याच बाजुला सुमारे अडीच ते तीन मीटर जागा सायकल ट्रॅकसाठी सोडण्यात आली असून अडीच ते तीन मीटर अंतरावर विशिष्ट प्रकारचे हे पोल लावण्यात आले आहेत. परंतु आता अनेक ठिकाणी हे पोल तुटल्याचे प्रत्येक रस्त्यावर पाहण्यास मिळते. त्यामुळे तुटक तुटक स्वरुपात या मार्गावर सायकल ट्रॅकचे दर्शन होत आहे. विशेष म्हणजे नव्यानेच लावलेल्या या बाॅलार्ड्सचे कलर देखील उडाले असून यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे.
कोट्यवधींची वसुली ; प्रशासकाला ठेंगा
महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटी सिईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार सायकल ट्रॅक विकसित करण्यासाठी निवड झालेल्या रस्त्यांवर मार्किंग करणे, सिम्बॉल लावणे, कलर कोडींग करणे त्यानंतर दुसऱ्या टप्यात गरज असेल तिथे मुरूम टाकणे, आरसीसी किंवा गठ्ठू बसविणे आणि शेवटच्या टप्यात साईन बोर्ड लावणे आदी कामे नमुद असताना या कामांना फाटा देत कोट्यवधींची बिले काढल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.